Tarun Bharat

पाकचे सहा खेळाडू नव्या चाचणीत ‘निगेटिव्ह’

इंग्लंड दौऱयावर जाण्याचा मार्ग मोकळा

वृत्तसंस्था/ लाहोर

इंग्लंड दौऱयावर जाण्यापूर्वी गेल्या आठवडय़ात पाकचे सहा खेळाडू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले होते. पण गेल्या तीन दिवसांत दुसऱयांदा घेण्यात आलेल्या चाचणीत ते निगेटिव्ह आढळल्याने इंग्लंड दौऱयावर जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पाक संघातील उर्वरित खेळाडू याआधीच इंग्लंडला रवाना झाले आहेत.

फखर झमान, मोहम्मद हसनेन, मोहम्मद हाफीझ, मोहम्मद रिझवान, शदाब खान व वहाब रियाझ हे सहा खेळाडू पाक क्रिकेट मंडळाने घेतलेल्या नव्या चाचणीत निगेटिव्ह आढळले आहेत. ‘26 जून रोजी चाचणी घेतल्यानंतर सोमवारी 29 रोजी दुसऱयांदा चाचणीत घेण्यात आली, त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे,’ असे पीसीबीने निवेदनाद्वारे सांगितले. यापैकी हाफीझच्या चाचणीनंतर बराच गदारोळ निर्माण झाला होता. पीसीबीने पहिल्यांदा चाचणीत घेतली, त्यात तो पॉझिटिव्ह आढळला होता. पण हाफीझने स्वतंत्रपणे खासगी हॉस्पिटलमध्ये चाचणी करवून घेतली, त्यात त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता.

स्पिनर काशिफ भट्टी, वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ व इम्रान खान ज्युनियर, फलंदाज हैदर अली हे अद्याप क्वारंटाईनमध्ये आहेत. शनिवारी पाक संघ इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी संघातील एकूण 10 खेळाडू पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते. आता निगेटिव्ह अहवाल आलेले सहा खेळाडू पाक संघात सामील होण्यास पात्र ठरले आहेत. पाक संघ सध्या वोर्सेस्टरशायर येथे असून सहा खेळाडूंच्या प्रयाणाची तयारी लवकरच करण्यात येणार असल्याचे पीसीबीने सांगितले. या मालिकेत इंग्लंड-पाक यांच्यात तीन कसोटी व तीन टी-20 सामने होणार आहेत. पीसीबीने संघातील वरिष्ठ खेळाडू शोएब मलिकला जुलैच्या अखेरपर्यंत संघात सामील होण्याची परवानगी दिली आहे. शोएबने कुटुंबियांसमवेत काही काळ घालविण्यासाठी पीसीबीकडे युएईला जाण्याची परवानगी मागितली होती.

Related Stories

कॅम्प येथील महिला दोन महिन्यांपासून बेपत्ता

Tousif Mujawar

सज्जता नाताळ सणासाठीची

Patil_p

स्मार्ट सिटीची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी

Amit Kulkarni

इंग्लंड महिला कसोटी संघ घोषित

Patil_p

बीसीसीआयला 4,669 कोटीची कमाई

Patil_p

सराव सामन्यात भारत अ विजयी

Patil_p