Tarun Bharat

पाक संघाकडून झिंबाब्वेला ‘फॉलोऑन’

वृत्तसंस्था/ हरारे

दुसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशी पाक संघाकडून झिंबाब्वेला ‘फॉलोऑन’ स्वीकारावा लागला. पाकने आपला पहिला डाव 8 बाद 510 धावांवर घोषित केल्यानंतर झिंबाब्वेचा पहिला डाव पाकने 132 धावांत गुंडाळला. त्यानंतर शेवटची बातमी आली तेव्हा झिंबाब्वेने दुसऱया डावात 2 बाद 115 धावा जमविल्या होत्या. पाकच्या हसन अलीने झिंबाब्वेच्या पहिल्या डावात आपल्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना 27 धावांत 5 गडी बाद केले.

या मालिकेतील पहिल्या कसोटीत पाकचा वेगवान गोलंदाज हसन अलीने हरारेच्या मैदानावर 89 धावांत 9 बळी घेत ‘सामनावीर’ बहुमान पटकाविला होता. हसन अली पुन्हा दुसऱया कसोटीत पाकचा प्रभावी गोलंदाज ठरला आहे. या दुसऱया कसोटीतील  रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशी उपाहारापर्यंतच्या वाढविण्यात आलेल्या कालावधीतील पहिल्या सत्रात झिंबाब्वेने पहिल्या डावात 80 धावांत 6 गडी गमविले. उपाहाराची वेळ झाली त्यावेळी झिंबाब्वेचे 9 गडी बाद झाले होते. त्यानंतर झिंबाब्वेची शेवटची जोडी रिचर्ड निगेरेव्हा आणि मुझारबनी यांनी 22 धावांची भर घातली आणि शेवटी मुझारबनी 7 धावांवर धावचीत झाला.

झिंबाब्वेने 4 बाद 52 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा पहिला डाव 60.4 षटकांत 132 धावांत संपुष्टात आला. झिंबाब्वेच्या पहिल्या डावात चकब्वाने 5 चौकारांसह 33, टिर्पेनोने 4 चौकारांसह 23, जाँग्वेने 3 चौकारांसह 19, निगेरेव्हाने 3 चौकारांसह नाबाद 15 आणि रॉय केयाने 1 चौकारांसह 11 धावा जमविल्या. पाकतर्फे हसन अलीने 5 तर साजीद खानने 2, शाहीन आफ्रिदी आणि तबीश खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाकने पहिल्या डावात 378 धावांची आघाडी घेतल्याने त्यांनी झिंबाब्वेला ‘फॉलोऑन’ दिला.

फॉलोऑन स्वीकारल्यानंतर झिंबाब्वेने दुसऱया डावात 32 षटकांत 2 बाद 115 धावा जमविल्या होत्या. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी आहेत. झिंबाब्वेचा संघ अद्याप 263 धावांनी पिछाडीवर असून पाकचा संघ पुन्हा मोठा विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. झिंबाब्वेच्या दुसऱया डावात चकब्वा आणि कर्णधार टेलर यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 52 धावांची भागिदारी केली होती. चकब्वा 2 षटकार आणि 9 चौकारांसह 58 धावांवर तर टेलर 5 चौकारांसह 26 धावांवर खेळत होते. सलामीच्या केसुझाने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22 तर मुसाकेंदाने 1 चौकारांसह 8 धावा जमविल्या. पाकतर्फे नौमन अली आणि शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे.

संक्षिप्त धावफलक

पाक प. डाव-8 बाद 510 डाव घोषित, झिंबाब्वे प. डाव- 60.4 षटकांत सर्वबाद 132 (चकब्वा 33, टिर्पेनो 23, जाँग्वे 19, निगेरेव्हा नाबाद 15, केया 11, हसन अली 5-27, साजीद खान 2-39, शाहीन आफ्रिदी 1-34, तबीश खान 1-22), झिंबाब्वे दु. डाव 32 षटकांत 2 बाद 115 (चकब्वा खेळत 58, टेलर खेळत आहे 26, केसुझा 22, मुसाकेंदा 8, शाहीन आफ्रिदी 1-18, नौमन अली 1-29).

Related Stories

फेडररचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त

Patil_p

थाळीफेकपटू सीमा पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र

Patil_p

प्रशिक्षकाच्या भूमिकेत झळकणार राहुल द्रविड!

Amit Kulkarni

रशियातील फुटबॉलपटूला कोरोनाची बाधा

Patil_p

भारत, कंबोडिया, हाँगकाँग, अफगाण एकाच गटात

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियाच्या सॉफ्टबॉल संघाचे जपानमध्ये आगमन

Amit Kulkarni