Tarun Bharat

पाज-शिरोडा गावाला चिंता पाणी टंचाईची

वार्ताहर / दाभाळ

 पाज-शिरोडा गावातील नागरिकांना मागील तीन चार महिन्यापासून नळाद्वारे व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याने मिळेल तेथून पाणी आणून दैनंदिन गरज भागवावी लागत आहे. सरकारच्या आडमुठय़ा धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मागील कित्येक वर्षांपासून हे गाव प्राथमिक सुविधांपासून दुर्लक्षित राहिले आहे. दरवर्षी उन्हाळय़ात लोकांना पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत. सुमारे 80 ते 90 घरांची लोकवस्ती असलेल्या पाज गावाची लोखसंख्य़ा नऊशेच्या आसपास आहे. 16 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे गावात एक विहिर खोदून त्यावर पंप बसवून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना आखली होती. परंतु ती पूर्णपणे यशस्वी झाली नाही. नळांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थानीं घरात नळ जोडणी घेण्यात नकार दर्शविला. जेमतेम अर्धातास येणाऱया पाण्यासाठी बिलाचे पूर्ण पैसे मात्र सक्तीने फेडावे लागतील. या विचाराने आधी मुबलक पाण्याच्या पुरवठय़ाची व्यवस्था करा व घरात नळ घेऊ अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. तेव्हापासून सार्वजनिक नळ जागोजागी बसवून गावातील लोकांना पाणी पुरवठा केला जातो. दुर्दैव असे की, या सार्वजनिक नळानांही अर्धा – एक तास पाणी पुरवठा होतो. या मोजक्याच वेळेत गावातील अनेक कुटुंबाना त्या त्या सार्वजनिक नळावर पाणी भरुन घ्यावे लागते. अर्धातासच पाणी मिळत असल्याने ते मिळवण्यासाठी लोकांना धावपळ करावी लागते. त्यातून भांडणेही उद्भवतात.

 गेल्या अनेक वर्षांपासून येथील लोकप्रतिनिधींनी पाज गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कोणतेच स्वारस्य दाखविलेले नाही. प्रत्येक निवडणुकीत मात्र या विषयाचे भांडवल करून मते मिळविली जातात. पण पाण्याची समस्या काही सोडवली जात नाही.

  नवविवाहितांच्या संसारात तणाव

 पूर्वीपासून येथे वास्तव्यास असलेल्या मूळ पाजवासियांना या परिस्थितीची आता सवय झाली आहे. परंतु नवीन लग्न होऊन गावात येणाऱया मुली या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत. त्यांना दूरवरुन पाणी आणण्याचे श्रम झेपत नाहीत. त्यामुळे नव्याने संसार सुरु केलेल्या गावातील तरुणांवर ‘पाण्याची व्यवस्था करा, नाही तर माहेरी निघून जाऊ असा दबाव वाढत आहे.  विहिरीतील पाणी उन्हाळय़ात आटत चालल्याने पंप जेमतेम पाऊण किंवा एक तास चालतो. त्यामुळे काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. हे टँकरही बेभरवशाचे झाल्याने नागरिकांना त्याची वाट पाहत थांबावे लागते. म्हैसाळ धरणाचा पाणी पुरवठा या भागात केला तर येथील नागरिकांचा कायमचा प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी सरकार दरबारी येथील लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करायला हवेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Related Stories

गोव्याच्या प्राचीन साहित्यावर संशोधन होणे गरजेचे

Amit Kulkarni

साबांखामंत्री काब्राल यांची नावेली मतदारसंघाला भेट

Amit Kulkarni

श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराज वृंदावनस्थ

Amit Kulkarni

रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक खोळंबली

Amit Kulkarni

शापोरा येथील मच्छीमारांना सहकार्य करण्याची मागणी

Omkar B

राज्यात जोरदार पाऊस

Amit Kulkarni