Tarun Bharat

पाटणा पायरेट्सची तेलुगू टायटन्सवर निसटती मात

सचिनने मिळविला निर्णायक गुण, बंगाल वॉरियर्सकडून जयपूर पिंक पँथर्स पराभूत

मनिंदर सिंग व अष्टपैलू मोहम्मद नबिबक्ष यांच्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सने प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा 31-28 अशा गुणांनी पराभव केला. दुसऱया सामन्यातील शेवटच्या चढाईत सचिनने गुण मिळविल्याने पाटणा पायरेट्सला तेलुगू टायटन्सवर 31-30 असा केवळ एका गुणाने निसटता विजय मिळवित विजयी घोडदौड कायम राखता आली.

बंगालच्या मनिंदरने 13 तर नबिबक्षने 10 गुण मिळविले. त्यात शेवटच्या मिनिटाला केलेल्या सुपर टॅकलचा समावेश आहे. कडवी टक्कर दिलेल्या जयपूर पिंक पँथर्ससाठी अर्जुन देशवालने एकाकी लढत देताना एकूण 16 गुण मिळविले. त्यात आणखी एका सुपर 10 चा समावेश आहे. मात्र त्याने शेवटच्या मिनिटाला केलेल्या प्रयत्नाला अपयश आल्याने जयपूरची विजयाची संधी हुकली.

दोन्ही संघांचा टॅकलिंगचा स्ट्राईकरेट फारसा चांगला नाही. त्यामुळे दोन्ही संघांच्या रायडर्सनीच प्रारंभीच्या खेळावर वर्चस्व राखले होते. बंगालचा मनिंदर पूर्ण बहरात होता तर नबिबक्षकडून त्याला उत्तम साथ मिळाली. सहाव्या मिनिटाला दोघांनीही पाठोपाठ अनेक गुण मिळवून देणाऱया चढाया केल्या आणि सातव्या मिनिटाला जयपूरला ऑलआऊट करीत 5 गुणांची आघाडी घेतली. जयपूरसाठी अर्जुन देशवालनेही प्रभावी कामगिरी केली. त्याने महत्त्वाच्या वेळी गुण मिळविल्याने बंगालला त्यांनी फार मोठी आघाडी घेऊ दिली नव्हती. मध्यंतराला बंगालने 18-14 अशी चार गुणांची आघाडी मिळविली होती.

उत्तरार्धातही दोन्ही संघांच्या रायडर्सनीच गुण मिळविण्याचे काम केले. मनिंदर व अर्जुन देशवाल यांनी सुपर 10 गुण मिळविले. देशवालचे हे पाच सामन्यात मिळविलेले पाचवे सुपर 10 होते. मात्र जयपूरच्या इतर खेळाडूंकडून त्याला पुरेशी साथ मिळाली नाही. कर्णधार दीपक हुडाही अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. 9 व्या मिनिटाला जयपूरने मनिंदरला यशस्वी टॅकल केल्यानंतर त्यांना थोडीशी संधी मिळाली होती. यावेळी पंचांशी हुज्जत घातल्यामुळे बंगालचा बचावपटू अबोझर मिघानी याला पिवळे कार्ड मिळाले. मात्र बंगालने टॅकलिंगचे गुण मिळवित आपली आघाडी राखण्याचा प्रयत्न चालू ठेवला. शेवटची पाच मिनिटे असताना ते फक्त 3 गुणांनी आघाडीवर होते. जयपूरने मनिंदरची यशस्वी पकड केल्याने हे अंतरही नंतर कमी झाले. नबिबक्षने चढाईचे 2 गुण मिळविले. पण शेवटच्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सला यशस्वी टॅकल करता न आल्याने केवळ एका गुणावर सामना आला. त्यानंतर शेवटच्या मिनिटाला नबिबक्षने अर्जुन देशवालचे यशस्वी सुपर टॅकल करीत बंगालचा विजयही निश्चित केला.

पाटणासाठी मोनू, सचिनची उत्तम कामगिरी

पाटणा पायरेट्सने आपली विजयी घोडदौड पुढे चालू ठेवताना तेलुगू टायटन्सचा केवळ एका गुणाने पराभव केला. मोनू गोयत व सचिन यांच्या कामगिरीच्या बळावर पायरेट्सने मिळविलेला हा सांघिक विजय होता. मोनूने 7 तर सचिनने 6 गुण मिळविले. सामना संपण्यास काही सेकंद असताना अंकित बेनिवालने गुण मिळविल्यानंतर सामना टाय केलाय असेच टायटन्सला वाटले होते. पण सचिनने शेवटच्या चढाईत संयम राखत पाटणाला सर्व पाच गुण मिळवून दिले. बेनिवालने टायटन्ससाठी सुपर टेन मिळविले असले तरी त्यांना अजून एकही विजय मिळविता आलेला नाही.

पूर्वार्धातील खेळावर पाटणाचेच वर्चस्व राहिले. त्यांचे रायडर्स प्रशांत कुमार व सचिन यांनी सहजतेने गुण मिळविले. पाचव्या मिनिटाला प्रशांतने सुपर रेडमध्ये 3 गुण मिळविल्याने सामना पाटणाच्या बाजूने फिरला. तीन वेळचे चॅम्पियन्स असलेल्या पाटणाने नंतर टायटन्सला ऑलआऊट करण्यात फारसा वेळ घालविला नाही. 10 व्या मिनिटाला त्यांनी 5 गुणांची आघाडी मिळविली होती. टायटन्सच्या रायडर्सना झगडावे लागत असले तरी मोहम्मदरेझा चियानेह व साजिन सी. यांनी बचावात उत्तम कामगिरी केली. रायडर सिद्धार्थ देसाईच्या गैरहजेरीत राकेश गौडा व अंकित बेनिवाल या युवा रायडर्सवर बराच दबाव आला होता. पण पायरेट्सची चपळता आणि भक्कम बचाव यांची ते बरोबरी करू शकले नाहीत. मध्यंतराला पाटणाने 18-13 अशी आघाडी घेतली होती.

उत्तरार्धात मात्र टायटन्सने थोडा जोर केला. आठ मिनिटे असताना बेनिवालने 3 गुणांचा सुपर रेड टाकत आपल्या संघाला 24-24 अशी बरोबरी साधून दिली. मोनू गोयतने टॅकलिंगमध्येही सुपर टॅकल करीत पाटणाला बढत मिळवून दिली. पण बेनिवालने शेवटची चढाई बाकी असताना टायटन्सला पुन्हा बरोबरी साधून दिली. पायरेट्सचा रायडर सचिन हा एकमेव खेळाडू मॅटवर होता. त्याने संदीप कंडोलाने केलेल्या चुकीचा लाभ उठवित पायरेट्सला विजय मिळवून दिला.

आजचे सामने

1) पुणेरी पलटन वि. गुजरात जायंट्स

वेळ ः रात्री 7.30 वा.

2) दबंग दिल्ली वि. तेलुगू टायटन्स

वेळ ः रात्री 8.30 वा.

थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स वाहिनी, डिस्ने हॉटस्टार.

Related Stories

श्रीहरी नटराजची तिसरी सर्वोत्तम भारतीय वेळ

Patil_p

विराटच्या निर्णयाचा विपरित परिणाम होणार नाही

Patil_p

इंग्लंडचा अल्बेनियावर एकतर्फी विजय

Patil_p

ओडिशा महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

न्यूझीलंड-पाक दुसरी कसोटी आजपासून

Patil_p

अभिषेक वर्मा-ज्योती अंतिम फेरीत

Patil_p