Tarun Bharat

पाणीटंचाई कामांसाठी संचारबंदी नियम नाही!

जिल्हाधिकाऱयांनी सांगितल्याचे प्रमोद जठार यांची माहिती :  पाणीटंचाई कामे न रखडण्याचे निर्देश : हायड्रोक्लोरोक्वीन गोळ्य़ांचा साठा प्रशासनाकडे उपलब्ध!

वार्ताहर / कणकवली:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना जिल्हय़ात अत्यावश्यक काम म्हणून पाणीटंचाईची मंजूर कामे करता येणार आहेत. या कामांसाठी संचारबंदीचा नियम लागू नाही. जिल्हाधिकाऱयांची गुरुवारी भेट घेतली असता, त्यांनी ही माहिती दिली. पाणीटंचाईच्या कामांना लागणारी बक्षिसपत्रं न घेता सरपंचांसमोर या कामाचे संमत्तीपत्र घ्या, अशीही मागणी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. जिल्हय़ातील पाणीटंचाईची कामे अडकता नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत, अशी माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.

येथील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत जठार बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू गांगण आदी उपस्थित होते.

जठार म्हणाले, भाजपतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन जिल्हय़ात कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रशासनाला आवश्यक बाबींची माहिती घेतली. ही माहिती प्रदेश भाजपच्या माध्यमातून केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक हायड्रोक्लोरोक्वीन या गोळ्य़ांचा साठा प्रशासनाकडे आहे मात्र या गोळ्य़ांची येत्या काळात आवश्यकता भासू शकते, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.

खातरजमा करून धान्य द्या!

डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबच्या माध्यमातून सर्दी, खोकला, ताप आदी रुग्णांना तपासणी करण्याची ग्वाही या संघटनेने दिली असल्याकडे जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधण्यात आले. रेशनकार्डधारकांना मोफत धान्य देण्याची व्यवस्था करण्यात आली मात्र ज्यांची रेशनकार्ड गहाळ झाली असतील, त्यांच्याकडे जर कार्डची झेरॉक्स असेल, तर त्याची खातरजमा करून धान्य देण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली, असे जठार यांनी सांगितले.

भाजपच्या माध्यमातून आंबा विक्री

जठार म्हणाले, भाजपच्या माध्यमातून पुणे, नाशिक, ठाणे आदी ठिकाणी 1 हजारपेक्षा जास्त आंब्याच्या पेटय़ा विक्री करण्यात यश आले. आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातूनही डी मार्ट व बिग बझारमध्ये आंबा विक्री सुरू करण्यात आली आहे. बागायतदारांना आंबा विक्री करायचा असल्यास माजी आमदार ऍड. अजित गोगटे व जयदेव कदम यांच्याशी संपर्क साधावा. काजूबीचा दर कमी करून काही ठिकाणी काजू बीची खरेदी सुरू आहे. मात्र, 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपले, तर तालुक्याच्या ठिकाणी काजू कारखानदारांना मोकळ्य़ा जागेत किंवा मैदानात काजू खरेदी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.

एक हजार पीपीई किट देणार

तेली म्हणाले, जि. प., ग्रा.पं., नगरपालिका, आरोग्य, स्वच्छता आदी कर्मचाऱयांचा 14 व्या वित्त आयोगांतर्गतच्या निधीतून विमा काढण्यास केंद्र शासनाने मुभा दिली आहे. त्याच्या अंमलबजावणीची मागणी करण्यात आली. गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील लोकांची यादी जिल्हाधिकाऱयांकडे सुपुर्द करण्यात आली. शुक्रवारपर्यंत खासदार नारायण राणे व आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून 1 हजार पीपीई किट जिल्हय़ात उपलब्ध होतील. 108 रुगणवाहिकेवरील कर्मचारी व कोरोनाविरुद्ध लढणाऱया डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आदींना हे किट प्राधान्याने देण्यात येणार आहे. यापेक्षा अजून किटची गरज भासल्यास ती उपलब्ध करून देण्यात येतील.

2021 पर्यंत कणकवलीत साखर कारखाना!

कोरोनामुळे देशभरात आर्थिक गणित बिघडले असून येत्या काळात रोजगार निर्माण होण्याच्यादृष्टीने ठोस प्रयत्न होण्याची गरज आहे. याबाबत खासदार नारायण राणे यांच्यासोबत चर्चाही करण्यात आली आहे. रोजगार निर्मितीच्यादृष्टीने भाजपतर्फे प्रस्तावीत असलेला साखर कारखाना कणकवली-कासार्डे येथे 2021 पर्यंत सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. नाणार येथे होणाऱया ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे दिड लाख लोकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पाबाबतही आता सरकारने विचार करावा, असे जठार यांनी सांगितले.

संचारबंदी शिथील करावी!

14 एप्रिलनंतर ज्या जिल्हय़ात कोरोनाबाबत गंभीर स्थिती नाही, तेथे जिल्हय़ाच्या लॉक केलेल्या सीमा एवढय़ात खुल्या करू नयेत व अटी-शर्तींवर जिल्हय़ांतर्गत संचारबंदी शिथील करून जनजीवन सुरळीत करण्यावर भर देण्याची मागणी केंद्र शासनाकडे व भाजपच्या प्रदेश पातळीवर करण्यात येणार आहे, असे जठार यांनी सांगितले.Related Stories

आरोग्य यंत्रणेमार्फत लसीकरण सर्वेक्षण

NIKHIL_N

अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

Patil_p

रक्तपेढीला पलंग बेडची देणगी

NIKHIL_N

किल्ले सिंधुदुर्गवर पुन्हा ‘जय भवानी…’ चा जयघोष

NIKHIL_N

दापोलीत ठाकरे-शिंदे गटात राडा

Patil_p

फक्त एकच हाती होतं, ‘देवाचा धावा’

NIKHIL_N