Tarun Bharat

पाण्यासाठी महिलांचा प्राधिकरण अधिकाऱयाला घेराव

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरालगत असलेला शाहूनगर परिसरातील अयोध्यानगरी, जगतापवाडीतील एक, दोन कॉलनीत गेली दोन वर्षांपासून पुरेशा दाबाने पाणी येत नाही. वारंवार विनंती, तक्रारी करुन देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक मारली. या भागाशी संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी जाधव यांच्या केबिनमध्ये त्यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

शाहूनगर हा त्रिशंकू भाग आहे. आता तो हद्दवाढीत नगरपालिकेत आला असला तरी अद्यापही मूलभूत सुविधांपासून अनेक नागरिक वंचित आहेत. त्यातच जगतापवाडीत राहणाऱया एक कॉलनीतील नागरिकांना गेल्या दोन वर्षांपासून कमी दाबाने पाणी मिळत आहे. तर त्यांच्याच समोर असलेल्या दुसऱया कॉलनीत नागरिकांना चार चार तास पाणी सोडले जात आहे.

काही कॉलनीतील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने याबाबत वारंवार तक्रारी झाल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्राधिकरणाचे अधिकारीच आमच्या हातात काही नाही, लोकसंख्या वाढलीय अशी उत्तरे देत होते. सध्या तर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिक व महिला वैतागल्या आहेत.

शेवटी सोमवारी कमी दाबाने पाणी येणाऱया कॉलनीमधील महिलांनी थेट प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक मारली. तिथे या भागाशी संबंधित अधिकारी जाधव यांच्या केबिनमध्ये जावून त्यांना घेराव घालत आंदोलन सुरु केले. महिलांच्या आक्रमक पावित्र्याने अधिकारी, कर्मचारी गांगारुन गेले होते. शेवटी महिला व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अधिकारी जाधव यांनी त्यांना दोन दिवसांत पाणी प्रश्न सोडवून मुबलक पाणी देण्याचे आश्वासन दिले.

या आश्वासनानंतर मग नागरिक व महिलांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर अयोध्यानगरी व जगतापवाडीतील या नागरिक व महिलांनी पुन्हा प्राधिकरणावर धडक मारुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अधिकाऱयांना दिला आहे.

Related Stories

पोलिसांच्या तत्परतेवर समाधान अ‍ॅपची नजर

Archana Banage

यवतमाळ : दारूची तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझरचे प्राशन; 7 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

राजीव सातव यांच्यासाठी राहुल गांधींनी केला डॉक्टरांना फोन

Archana Banage

Sangli; जिल्हय़ातील ५० घरफोड्या उघडकीस

Abhijeet Khandekar

इतिहासात प्रथमच भाजपच कार्यालय राजभवनातून चालतंय ; नाना पटोलेंची खोचक टीका

Archana Banage

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव असावे : राज ठाकरे

Tousif Mujawar