Tarun Bharat

पादुकांची एसटीतून ‘पंढरीची वारी’

Advertisements

ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांसमवेत केवळ 20 वारकऱयांना परवानगी, नियोजनाकरिता इन्सिडेंट कमांडरची नेमणूक

पुणे, पिंपरी / प्रतिनिधी

आषाढी वारीसाठी येत्या 30 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरला एसटी बसमधून नेण्यात येणार असून, यासंदर्भातील नियोजनाकरिता इन्सिडेंट कमांडरची नेमणूक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी येथे दिली. दरम्यान, यासाठी 20 जणांनाच परवानगी मिळाली असून, सहभागी होणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना तपासणी केली जाणार आहे.

 कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यंदा वारकरी संप्रदायाने आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आषाढी वारीसाठी विविध संतांच्या पालख्या पंढरीस येतात. यंदा संतांच्या पादुका 30 जूनला दशमीच्या दिवशी दुपारी वाखरीत येतील. तेथून सर्व पालख्या पंढरपूमध्ये प्रवेश करणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पादुका 30 जूनला पहाटे सहाच्या सुमारास 20 वारकऱयांसह पंढरपूकडे रवाना होणार आहेत. त्यासोबतच सासवडमधून संत सोपानदेव महाराज व संत चांगवटेश्वर महाराजांची पालखीही मार्गस्थ होणार आहे. यासाठी शासनाने बसची व्यवस्था केली आहे.

मास्क बंधनकारक, दर्शनास बस थांबविण्यास मनाई

 संतांच्या पादुकांसोबत जाणाऱया सर्व व्यक्तींनी मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. तसेच प्रवासादरम्यान दर्शनाला कुठेही बस थांबवू नये. नेमणूक करण्यात आलेल्या इन्सिडेंट कमांडरनी प्रारंभापासून ते परतीचा प्रवास पूर्ण होईपर्यंत पालखी सोहळय़ासोबत राहणे आवश्यक आहे. त्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी व संस्थानच्या प्रमुखांशी विचारविनिमय करून मार्ग निश्चित करावा व पालखी घेऊन जाणाऱया बसेस पंढरपूर येथे रात्री अकराच्या सुमारास पोहोचतील, याबाबत योग्य ते नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी या वेळी केल्या.

बसला फुलांची सजावट

 संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पालखी मार्गाने जाणार असून, बसला फुलांची सजावट करण्यात येणार आहे. कापूर ओढय़ाजवळ असलेल्या अनगडशहा वली दर्ग्याजवळील पादुकांच्या ठिकाणी पहिली अभंग आरती होईल. यानंतर दुसरी अभंग आरती चिंचोलीत होईल. ही आरती झाल्यानंतर पादुका सोहळा पुढे जाईल. रोटी घाटात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोहळा तिसऱया अभंग आरतीसाठी काही वेळ थांबेल. तेथून हा सोहळा वाखरी येथे दुपारी बाराला पोहोचेल.

वाखरीत संतांची भेट

 वाखरीत संत भेट, चौथी अभंग आरती होईल. संस्थानच्या वतीने नैवेद्यप्रसाद दाखविण्यात येईल. त्यानंतर हा सोहळा पंढरपुरात पोहोचेल. थोरल्या पादुका येथे पाचवी अभंग आरती होईल. येथून नगरप्रदक्षिणा घालण्यात येईल. त्यानंतर पादुका मुक्कामस्थळी नेण्यात येतील. एकादशीदिवशी 1 जुलैला सकाळी 7 ला नगर प्रदक्षिणा, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पादुकांना परंपरेप्रमाणे चंद्रभागा स्नान घालण्यात येईल व पादुका तेथील पुंडलिक महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात येतील.

बसनेच पुन्हा परतीचा प्रवास

 पुंडलिक महाराजांचे दर्शन झाल्यानंतर पादुका वैष्णव देवता पांडुरंगाच्या द्वारदर्शनासाठी महाद्वारात नेण्यात येणार आहे. तेथे सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी हा अभंग होईल. यानंतर पादुका संत तुकाराम महाराज मठामध्ये पाच दिवसांसाठी विसावतील. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरा येथे काल्याचे कीर्तन व काल्याच्या महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडेल. यानंतर पादुका नगरप्रदक्षिणा करून पुन्हा संत तुकाराम महाराजांच्या मठामध्ये नेण्यात येतील व दुपारी तीनच्या सुमारास पादुका दर्शन सोहळा पुन्हा बसने परतीच्या प्रवासाला निघेल.

Related Stories

पुण्यात राजपूत सभेतर्फे तृतीयपंथीयांना धान्य किट

Tousif Mujawar

डोंबिवली मिलापनगर मध्ये घरफोडीचे सत्र

Tousif Mujawar

बंडखोर आमदारांच्या राजकीय संन्यासाला सुरुवात

datta jadhav

दिपक केसरकरांच्या पत्रकार परिषदेतील १० मुद्दे; जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Khandekar

आरे कारशेडविरोधातील आंदोलनात आता ‘वंचित आघाडी आणि आप’ ची उडी

Abhijeet Khandekar

आमच्यावर टाकायला निघालेला बॉम्ब त्यांच्याच हातात फुटला; राऊतांचा भाजपवर निशाणा

Archana Banage
error: Content is protected !!