Tarun Bharat

पालकमंत्र्यांसमोर भाजपला थोपविणे, संघटना वाढीचे आव्हान

नारायण राणे यांच्या प्रवेशाने ताकद वाढलेल्या भाजपला थोपविण्यासाठी उदय सामंत यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री केल्याचे बोलले जाते. त्यादृष्टीने त्यांनीही पावले टाकत पहिल्याच जिल्हा दौऱयात आपली भूमिका स्पष्ट केली. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱयाची मात्र तूर्त प्रतीक्षाच आहे. नव्या पालकमंत्र्यांना भाजपला थोपविणे व संघटना वाढविणे यावर प्रामुख्याने भर द्यावा लागणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर रत्नागिरीला अनिल परब आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ाला उदय सामंत हे पालकमंत्री मिळाले आहेत. उदय सामंत यांनी लगेचच कामाला सुरुवात केली असून सिंधुदुर्गात दमदार एन्ट्री करत दोन दिवसांच्या जिल्हा दौऱयात विकासकामांच्या आढावा बैठकांबरोबरच शिवसेनेमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले आहे. मात्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रवेशामुळे ताकद वाढलेल्या भाजपला थोपविणे आणि संघटनात्मक वाढीचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील आठपैकी सहा आमदार शिवसेनेचे आहेत. परंतु, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारमुळे दोन्ही जिल्हय़ांना एकच मंत्रिपद मिळाले आणि पालकमंत्री नेमताना रत्नागिरीचे उदय सामंत यांना सिंधुदुर्गचे तर मुंबईचे अनिल परब यांना रत्नागिरीचे पालकमंत्रीपद मिळाले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रवेशाने ताकद वाढलेल्या भाजपला थोपविण्यासाठी उदय सामंत यांना रत्नागिरीऐवजी सिंधुदुर्गचे पालकमंत्री केल्याचे बोलले जाते. त्यादृष्टीने त्यांनीही पावले टाकत पहिल्याच जिल्हा दौऱयात आपली भूमिका स्पष्ट केली. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱयाची मात्र तूर्त प्रतीक्षाच आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गेल्या काही काळात शिवसेनेने चांगलेच बस्तान बसविले आहे. रत्नागिरीतील त्यांचे संघटनात्मक वर्चस्व कायम आहे. मात्र राणेंच्या भाजप प्रवेशाने सिंधुदुर्गात शिवसेनेला धक्के बसू लागले आहेत. गेल्या महिनाभरात सरकार स्थापनेनंतर झालेल्या तीन पोटनिवडणुका शिवसेनेने गमावल्या. यात माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचा गड असलेल्या सावंतवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. हे धक्के शिवसेनेच्या कमजोर संघटनात्मक बळामुळेच बसले.

राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर सिंधुदुर्गात हा पक्ष पूर्णत: शक्तीहीन झाला होता. तत्कालीन विधान परिषद आमदार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गच्या राजकारणात लक्ष घातल्यानंतर शिवसेना पुन्हा उभारी घेऊ लागली. नवे कार्यकर्ते, पदाधिकारी या पक्षाकडे येऊ लागले. याच दरम्यान नारायण राणेंच्या विरोधात नाराजी वाढू लागली आणि नाराजीचे बळ मतपेटीतून शिवसेनेला मिळू लागले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून विनायक राऊत यांनी नीलेश राणे यांचा मोठय़ा फरकाने पराभव केला. पुढच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर सावंतवाडीतून दीपक केसरकर, कुडाळमधून वैभव नाईक विजयी झाले. त्यानंतर पालकमंत्रीपद केसरकरांकडे आले. मात्र अनुकूल स्थिती असूनही पुढील पाच वर्षे सत्ता असताना संघटनात्मकदृष्टय़ा अपेक्षित काम झाले नाही. जिल्हा प्रमुख असलेल्या आमदार नाईक यांनी मालवण व कुडाळ तालुक्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघापलीकडे फारसे लक्ष दिले नाही. केसरकर यांच्याकडे मंत्रिपद असल्यामुळे त्यांना मतदारसंघातही संघटनात्मक कामाकडे फारसे लक्ष देता आले नाही. युतीच्या जागा वाटपात कणकवली मतदारसंघ नेहमीच भाजपकडे राहिला. त्यामुळे शिवसेनेला तिकडे फारसे लक्ष देता आले नाही.

खरं तर शिवसेनेने लोकसभा व विधानसभा यासारख्या मोठय़ा निवडणुका जिंकल्या. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळविण्यात त्यांना फारसे यश आले नाही. शिवसेनेचे संघटनात्मक नेटवर्क येथे कमी पडले. आता तर राणेंच्या भाजप प्रवेशामुळे गणिते बदलली आहेत. भाजपची मते शिवसेनेकडून वजा होऊन राणेंकडे गेली आहेत. संघटनात्मक ताकद मजबूत न झाल्यास शिवसेनेला सिंधुदुर्गात पुढच्या निवडणुका जड जाऊ शकतात. यासाठीच शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद निर्माण करावी लागणार आहे. हे करण्यासाठी पालकमंत्री आणि संघटनात्मक बांधणीशिवाय पर्याय नाही. पालकमंत्रीपद उदय सामंत यांना देताना कदाचित शिवसेनेने हाच विचार केला असावा. सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांची नावे चर्चेत होती. मात्र मुंबईतून नव्या नेतृत्वाला येथील संघटना हाताळणे तितकेसे सोपे नव्हते. रत्नागिरीत शिवसेना मजबूत आहे. त्यामुळे सामंत यांना मूळ जिल्हा न देता सिंधुदुर्गची जबाबदारी दिली गेल्याचे बोलले जाते.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री होताच उदय सामंत यांनी तात्काळ कामाला सुरुवात केली. त्यांनी दोन दिवसांचा जिल्हा दौरा केला. त्यांचे जोरदार स्वागत झाले. त्यामुळे पोटनिवडणुकात पराभवाने काहीशा बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या दौऱयात पहिल्या दिवशी माजी पालकमंत्री केसरकर अलिप्त होते, मात्र दुसऱया दिवशीच्या दौऱयात उपस्थित होते. मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या चेहऱयावर स्पष्ट नाराजी दिसत होती. त्यामुळे नवे पालकमंत्री माजी पालकमंत्र्यांसोबत कसे जमवून घेतात, हे पहावे लागेल. पारंपरिक मच्छीमारांचे नेते रविकिरण तोरसकर यांनी नवे पालकमंत्री पर्ससीननेट धारक ट्रॉलर धार्जिणे असल्याचे सांगत भीती व्यक्त केली होती. त्यामुळे मच्छीमारांचा प्रश्नही उदय सामंत कसे हाताळतात, हे पाहणेही औत्सुक्याचे आहे. जिल्हा बँकेची निवडणूक मे 2020 मध्ये होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठीही तयारी करावी लागणार आहे. एकूणचे नव्या पालकमंत्र्यांसमोर अनेक आव्हाने असून भाजपला थोपविणे व संघटना वाढविणे यावर त्यांना प्रामुख्याने भर द्यावा लागणार आहे.

संदिप गावडे

Related Stories

बँकिंग-ऊर्जा क्षेत्राच्या प्रभावाने बाजार घसरला

Patil_p

विविध क्षेत्रात महिंद्राची मोठी गुंतवणूक

Patil_p

पत्र लिहिते तुजला…

Patil_p

जे अवतरले अमरकार्या

Patil_p

फ्रॉम रशिया विथ लव्ह

Patil_p

कोकणावर ओल्या दुष्काळाचे सावट

Patil_p