Tarun Bharat

पालिकांमधील सत्तासंघर्ष सुरु

पणजी मनपासह 11 पालिकांसाठी 20 रोजी मतदान : सांखळी नगरपालिका वार्ड नं. 9 पोटनिवडणूक,नावेली जिल्हा पंचायत, विविध पंचायतींची पोटनिवडणूक

प्रतिनिधी / पणजी

राज्य निवडणूक आयोगाने पणजी महानगरपालिकेसह 11 नगरपालिका यांची निवडणूक तसेच सांखळी पालिकेचा वार्ड नं. 9, नावेली जिल्हा पंचायत आणि विविध पंचायतींचे 22 वॉर्ड यांची पोटनिवडणूक शनिवार 20 मार्च रोजी होणार आहे. मतमोजणी व निकाल सोमवार 22 मार्च रोजी होणार असून निवडणुकीची आचारसंहिता देखील काल सोमवारपासून लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी काल सोमवारी पत्रकार परिषदेत निवडणूक मतदानाचा सविस्तर तपशील घोषित केला. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 20 मार्च रोजी मतदान होणार असून सायंकाळी 4 ते 5 ही वेळ कोरोना रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया चालू असताना मतदानाच्या तसेच मतमोजणीच्या वेळी कोरोना नियम, अटी व मार्गदर्शक तत्वे यांचे सर्वांनी पालन करावे आणि कोरोनाचा संसर्ग रोखावा, असे आवाहन गर्ग यांनी केले.

निवडणूक कार्यक्रम

अर्ज भरण्याचा कालावधी 25 फेब्रुवारी ते 4 मार्च असा आहे. म्हणजेच गुरूवार ते गुरूवार असा पूर्ण आठवडा त्यासाठी देण्यात आला असून रविवारी 28 फेब्रुवारी रोजी सुट्टी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सकाळी 10 ते दुपारी 1 अशी अर्ज सादर करण्याची वेळ असून 5 मार्च (शुक्रवार) रोजी अर्जाची छाननी सकाळी 10 पासून सुरू होणार आहे. शनिवार 6 मार्च रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून त्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 3 अशी वेळ देण्यात आली आहे. त्याच दिवशी सायंकाळी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

निर्वाचन अधिकाऱयांची नियुक्ती

निवडणुका होणार असलेल्या पणजी महापालिका इतर पालिका-वॉर्ड, जिल्हा पंचायत मतदारसंघ क्षेत्रातील संबंधित उपजिल्हाधिकारी, तालुका मामलेदार यांना निर्वाचन अधिकारी, सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून आयोगाने नियुक्त केले असून इच्छुक उमेदवारांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे.

या निवडणुकांसाठी 21 निर्वाचन अधिकारी, 22 सहाय्यक निर्वाचन अधिकारी, 22 सर्वसाधारण निरीक्षक तर 24 जणांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीबाबत कोणत्याही तक्रारी असतील तर त्या संबंधित निर्वाचन अधिकारी, निरीक्षकांकडे नोंदवाव्यात. ते त्यांची चौकशी करून तक्रारीची दखल घेतील व त्यावर योग्य ती कार्यवाही करतील अशी माहिती गर्ग यांनी दिली.

निवडणूक आचारसंहिता संपूर्ण राज्यासाठी नाही

निवडणूक आचारसंहिता संबंधित वॉर्ड, पालिका जिल्हा पंचायत क्षेत्रापुरतीच मर्यादित असून ती संपूर्ण गोवा राज्यासाठी नाही असा खुलासा गर्ग यांनी केला. चालू असलेली विकासकामे करता येतील तथापि नवीन कामे मात्र घेता येणार नाहीत, असे ते म्हणाले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 1 जानेवारी 2021 या संदर्भ तारखेसह तयार करण्यात आलेली मतदार यादी सदर निवडणुकीस ग्राहय़ धरण्यात येणार असून सर्व निवडणुकांसाठी मिळून एकूण 3,10,995 मतदार मतदानासाठी पात्र आहेत.

पणजी महापालिका 32041 मतदार, उमेदवार खर्च मर्यादा रु.2.50 लाख आहेत. 11 नगरपालिका 2,50,470 मतदार, खर्च मर्यादा रु. 2 लाख, सांखळी वॉर्ड नं 9 (एक वॉर्ड), 584 मतदार खर्च मर्यादा 2 लाख, नावेली जिल्हा पंचायत – 15566 मतदार, खर्च मर्यादा रु. 5 लाख, 22 पंचायत वॉर्ड – 12334 मतदार, खर्च मर्यादा रु. 40,000 वरील खर्च मर्यादा प्रति उमेदवारांसाठी आहे. मतमोजणी केंदे व संवेदनशील केंद्रे याचा तपशील मागाहून नंतर अधिसूचित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले, पत्रकार परिषदेला आयोगाचे इतर पदाधिकारी सागर गुरव, मेल्विन वाझ, आशुतोष आपटे व दुर्गाप्रसाद उपस्थित होते.

पणजी महानगरपालिकेसाठी मतदान यंत्र तर इतरांसाठी मतपत्रिका पणजी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान यंत्रांचा (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) इव्हीएम वापर केला जाणार आहे तर इतर पालिका निवडणूक व पोटनिवडणुकीसाठी मतपत्रिका वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे पणजी मनपा निवडणूक निकाल झटपट मिळणार असून नावेली जिल्हा पंचायत, सांखळी पालिका वॉर्ड नं. 9 व 22 वॉर्ड पंचायत निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पणजी शहर असल्यामुळे तेथील निवडणूक मतदान यंत्रांद्वारे तर इतर पालिका, जिल्हा पंचायत व पंचायत वॉर्ड येथील निवडणुका निमशहरी-ग्रामीण भागात असल्याने पारंपारिक मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाणार आहेत.

पालिका निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम

  • अर्ज भरण्याची मुदत . 25 ते 4 मार्च
  • अर्जांची छाननी …….. 5 मार्च
  • अर्ज मागे घेण्याचा दिवस           6 मार्च
  • उमेदवारांची अंतिम यादी          6 मार्च
  • मतदान……………….. 20 मार्च
  • मतमोजणी       22 मार्च

Related Stories

सरकारी कार्यालये आता 20 पासून कार्यान्वित

Omkar B

खाण कंपन्यांनी खंदकातील पाण्याचा निचरा करावा

Amit Kulkarni

गोव्यातही मंदिर पुर्ननिर्माणासाठी न्यायालयीन लढा उभारणार

Amit Kulkarni

भाऊसाहेबांना भारतरत्न मिळायला हवे

Amit Kulkarni

मडगाव भाजपच्या वैद्यकीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

सावर्डेतील अपघातात मुलाचा मृत्यू

Patil_p