Tarun Bharat

पावनगडावर सापडले ४०० तोफगोळे

गोळे शिवकालीन असल्याचा अंदाज, आणखी ऐतिहासीक ठेवा सापडण्याची शक्यता

प्रतिनिधी / पन्हाळा

प्रतिपन्हाळगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावनगडावर मोठा शिवकालीन ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. दिशादर्शकाचे फलक लावत असताना ४०० हुन अधिक तोफगोळे सापडले असून अजूनही तोफगोळे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तोफगोळे सापडल्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, हे तोफगोळे शिवकालीनच असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

पावनगडावर सापडले तोफगोळे

पन्हाळा गडाच्या शेजारी चार किमी अंतरावर पावनगड आहे. हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. तो पन्हाळा गडाचा संरक्षक गड मानला जातो. रेडेघाट परिसरात तो असून वन विभागाच्या ताब्यात आहे. येथे वनविभाग आणि `टीम पावनगड’ या संघटनेच्यावतीने विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत महत्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे.

फलक लावण्यासाठी खड्डा खोदला जात असताना महादेव मंदिराशेजारी तोफगोळ्यांचा साठा सापडला. त्याचे मोजमाप केले असता चारशेवर तोफगोळे असल्याचे आढळून आले. १०० ते २५० ग्राम वजनाचे तोफगोळे आहेत. ते एकावर एक असे रचून ठेवले होते. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी दारूगोळ्याचे कोठार होते. या परिसरात आणखी तोफगोळे सापडण्याची शक्यता आहे. या भागात तोफगोळ्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात साठा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. तोफगोळ्यांचा इतका मोठा साठा पाहून शिवप्रेमीतून आनंद व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती दिली असून ते याबाबत पंचनामा करत आहेत. याठिकाणी भक्कम तटबंदी आहे. शिवाय बुरुजही आहेत. जखमी सैनिकांच्या जखमा भरून येण्यासाठी त्याकाळी गायीच्या जुन्या तुपाचा वापर केला जात असे. या तुपाच्या साठवणुकीची विहीर आजही पावनगडावर आहे. गड बांधताना बांधलेली दोन सुंदर दगडी मंदिरेही आज पाहायला मिळतात.

आणखी उत्खननासाठी प्रयत्न

पावनगडावर सापडलेले तोफगोळे हे पुरातत्व विभागाने ताब्यात घेतले आहेत. ज्या ठिकाणी हे तोफगोळे सापडले आहेत, तो परिसर आरक्षित केला आहे. तसेच याठिकाणी आणखी उत्खनन करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न होणे आवश्यक आहे.

– विजय चव्हाण, पुरातत्व विभाग अधिकारी, पन्हाळा विभाग.

Related Stories

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर

Archana Banage

गोकुळची निवडणूक होणारच!

Archana Banage

महापालिकेच्या उपायुक्तांकडे सापडले एक कोटींचे घबाड

datta jadhav

दिव्यांगांनो बोगस ओळखपत्रे घेऊ नका!

Abhijeet Khandekar

वादळी पावसाने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे त्वरित पूर्ण करा : आ . पी.एन.पाटील

Archana Banage

महाराष्ट्र : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar