Tarun Bharat

पावसाची भीषण खेळी, घेतला 7 जणांचा बळी

Advertisements

बडाल अंकलगी येथे भिंत कोसळून मोठी दुर्घटना : एकाच कुटुंबातील 6 जणांचा समावेश, दोघे जण बचावले : परिसरात हळहळ

प्रतिनिधी /बेळगाव

परतीच्या पावसामुळे घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 6 जणांसह आणखी एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी रात्री बडाल अंकलगी (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली असून मृतांमध्ये एक पुरुष, तीन महिला, तीन मुलींचा समावेश आहे. ऐन सणात घडलेल्या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

बुधवारी रात्री 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून घटनेची माहिती समजताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान व एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पाचजण ढिगाऱयाखाली सापडून जागीच दगावले तर लक्ष्मी व तिचे वडील अर्जुन यांना गंभीर जखमी अवस्थेत हिरेबागेवाडी येथील सरकारी इस्पितळात हलविताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

गंगव्वा भीमाप्पा खनगावी (वय 50), सत्यव्वा अर्जुन खनगावी (वय 45), पूजा अर्जुन खनगावी (वय 8), सविता भीमाप्पा खनगावी (वय 28), काशव्वा विठ्ठल होळेप्पण्णावर (वय 8), लक्ष्मी अर्जुन खनगावी (वय 15), अर्जुन हणमंत खनगावी (वय 45, सर्व रा. बडाल अंकलगी, ता. बेळगाव) अशी दुर्दैवींची नावे आहेत.

मृत शेतकरी कुटुंबातील आहेत. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर याही घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री सर्व मृतदेह ढिगाऱयातून बाहेर काढण्यात आले. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर, अग्निशमन दलाचे व्ही. एस. टक्केकर आदी अधिकारी रात्री उशिरापर्यंत बडाल अंकलगी येथे तळ ठोकून होते.

घराशेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये कुटुंबीयाचे होते वास्तव्य

भीमाप्पा खनगावी यांच्या जुन्या घराला नवे छत बसविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे छत काढले होते. या घराशेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये सध्या कुटुंबीयाचे वास्तव्य होते. दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे भिंत कोसळून कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भीमाप्पा व त्यांचा मुलगा देवराज हे दोघे बचावले आहेत. काशव्वा ही शेजारच्या घरातील मुलगी असून या घटनेत तिचाही मृत्यू झाला आहे. ऐन दसरोत्सवात घडलेल्या या घटनेमुळे केवळ बडाल अंकलगीच नव्हे तर संपूर्ण तालुका हादरला आहे. रात्री उशिरापर्यंत ढिगारा हटविण्याचे काम सुरू होते. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

मुख्यमंत्र्यांना वर्दी

या घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बडाल अंकलगीला धाव घेतली. मुख्यमंत्री एस. आर. बोम्माई यांनी स्वतः आपल्याशी संपर्क साधून मदतकार्य हाती घेण्याची सूचना केली आहे. कुटुंबीयांना तातडीने भरपाई देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे. ही घटना कशी घडली? याची माहिती मिळविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

अभ्यासासाठी गेलेल्या काशव्वावर घाला

या घटनेत मृत्युमुखी पडलेली काशव्वा कोळेप्पन्नावर ही आठ वषीय बालिका आपल्या मैत्रिणींच्या घरी अभ्यासासाठी येत होती. ढिगाऱयाखाली सापडून तिचाही मृत्यू झाला आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची भरपाई

पालकमंत्री गोविंद कार्जोळ हे गुरुवारी घटनास्थळी भेट देणार आहेत. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदतकार्य हाती घेण्याची सूचना त्यांनी केली असून गुरुवारी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई देणार आहेत.

Related Stories

बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्व पटवून दिले

Patil_p

जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळजोडणीच्या नावाने रस्त्याची दुरवस्था

Amit Kulkarni

‘ते’ दोन्ही विद्यार्थी कोरोनाबाधित

Amit Kulkarni

महिला आघाडी को-ऑप.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

Amit Kulkarni

कळसा-भांडुरासाठी शेतकऱयांचे पुन्हा आंदोलन

Patil_p

बीएससी, सीसीआय, विजया बेळगाव, कोल्ट संघाची विजयी सलामी

Amit Kulkarni
error: Content is protected !!