Tarun Bharat

पावसामुळे हिरवी मिरची झाली लाल, बळीराजा बनला कंगाल

मिरचीला मिळतोय कवडीमोल दर : वाहतूकदारांसह एजंट मात्र मालामाल ; पण, संतापाने शेतकऱयांचे डोळे झाले लालेलाल

पिराजी कुऱहाडे / चापगाव

गेल्या दोन वर्षात कोरेना महामारीने थैमान घातल्यामुळे उन्हाळी पिकांवर मोठी कुऱहाड कोसळली आहे. गेल्या दोन वर्षात ऐन उन्हाळी हंगामातच कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढल्याने उत्तम प्रकारे पिकलेल्या पिकात नांगर फिरविण्याची वेळ खानापूर तालुक्मयातील शेतकऱयांवर आली आहे. मागील वषी मार्च अखेरला उन्हाळी मिरची पिकाला जोर आला असतानाच संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये अडकला. सर्व बाजारपेठा थंडावल्या. त्यामुळे शेतकऱयांना मोठे नुकसान सोसावे लागले. यावर्षीही दुसऱया लाटेने थैमान घातले असतानाच वळीव आणि वादळी पावसाच्या दणक्याने उन्हाळी मिरची पिकून शेतातच लाल होत आहे. सखल भागातील अनेक मिरची पिके वादळी पावसाने उन्मळून नुकसान झाल्याने शेतकऱयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

मागील वर्ष नुकसानीत गेले ते गेले या वषी तरी उन्हाळी पिकाला भाव मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱयांनी पारंपरिक उन्हाळी मिरची पीक केले. मात्र, यंदाही लॉकडाऊनचा फटका शेतकऱयांना बसला अन् यंदाही उभ्या पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.

तालुक्मयातून जवळपास 25 ते 30 टेम्पो भरून ओली मिरची दररोज बेळगावसह विविध बाजारपेठेत नेली जाते. पण दर नसल्याने शेतकऱयांना मोठय़ा नुकसानीची वेळ आली आहे. दहा किलोला 50 ते 80 रुपये भाव मिळाला. आता तर लॉकडाऊनमुळे पन्नास किलोच्या पोत्याला शंभर रुपये दर दिला जात आहे.  दोन आठवडय़ांपासून लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मिरचीचा भाव गडगडला असून ‘शेतात पीक आणि घरात भीक’ अशी परिस्थिती झाली आहे. एकीकडे दर नाही, बाजारपेठेत मालाची उचल नाही. दुसरीकडे कोरोनामुळे कामधंदा, रोजगार नसल्यामुळे आता जगावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील वषी राज्य शासनाने प्रति हेक्टरी 15 हजार रुपये मिरची पिकासाठी नुकसानभरपाई जाहीर केली होती. परंतु या वषी अद्याप कोणतीच नुकसानभरपाई अथवा सहकार्य करण्याचे घोषित केले नाही.

लॉकडाऊनमुळे भाजीपाला, फळे शेतातच कुजून जात आहेत. बहुतांश शेतकऱयांवर मिरचीच्या पाठीमागे लागून कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

शेतातील हिरवी मिरची झाली लाल झाल्याने शेतकऱयांच्या डोळय़ात आले पाणी

यावषीदेखील लॉकडाऊनमुळे उन्हाळी हिरवी मिरची पिकाला उत्तम बाजारपेठ मिळाली नसल्याने बहुतांश शेतकऱयांनी शेतवडीतील मिरची काढण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उन्हाळी हिरवी मिरची शेतातच पिकली असून बहुतांश शेतकऱयांनी आपल्या पावसाळय़ातील लाल मिरची तिखटाचा थोडाफार भार कमी केला आहे. बाजारपेठेत उन्हाळी हिरवी मिरचीला कवडीमोल दर मिळाल्याने शेतकऱयांनी शेतातील उत्तम लागवड झालेली मिरची काढणीकडे दुर्लक्ष केले. कारण मिरची काढणीनंतर मजुरीचा खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकऱयांनी मिरची तोडणीकडे दुर्लक्ष केले. बहुतांश शेतकरी उभे असलेले मिरची पीक खरीप भात पेरणीपूर्वी काढून शेती मशागतीची कामे करणे अत्यंत आवश्यक असतानाही बहुतांश शेतकरी शासनाच्या बागायती पीक सर्वेक्षणाची वाट पाहत आहेत. पण याबाबत खात्याकडून कोणत्याच हालचाली नसल्याने शासनाची ही घोषणा पोकळ ठरणार की काय, असा प्रश्न शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.

पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ

एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे वळीव आणि वादळी वाऱयासह पावसाचा दणका बसल्याने उतमरीत्या आलेली मिरची झाडे उन्मळून खराब होत आहेत. आज नाहीतर उद्या लॉकडाऊन उठेल व दर मिळेल या आशेने जगणाऱया शेतकऱयांना आता मिरची पिकावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.

लुबाडणारे वाहतूकदार आणि एजंटांवर कारवाई करण्याची मागणी

बेळगावसह सर्व बाजारपेठा थंडावल्याने मिरची भरणारे एजंट गावागावात येऊन वाहतूकदार टेम्पोधारकांना हाताशी धरून शेतकऱयांना लुबाडत आहेत. वास्तविक बेळगावसह प्रमुख बाजारपेठेमध्ये मिरची विक्रीसाठी गेल्यास दरात चढ-उतार होऊन चांगला दर मिळू शकतो. पण अनेक एजंट गाव पातळीवर मिरची भरत आहेत. दरात कपात करून शेतकऱयांना लुटत आहेत. त्यामध्ये अनेक वाहतूकदार टॅम्पोधारक सामील असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव व अन्य ठिकाणी वाहतुकीसाठी एका पोत्याला साठ ते सत्तर रुपये भाडे आकारले जाते. परंतु सदर टेम्पोधारक गावाजवळच एजंटांना बोलावून त्या ठिकाणी मिरची पुरवठा करत आहेत. पण शेतकऱयांकडून घेणारे भाडे मात्र कमी नाही. शिवाय त्या एजंटांकडून भाडेव्यतिरिक्त कमिशन वेगळे घेत मालामाल होत आहेत. दरासंदर्भात कोणीही भांडायचे नाही अशा पद्धतीने मिरची विक्रीचा धंदा सुरू असून यामध्ये शेतकरी मात्र कंगाल होत आहेत. एखाद्या शेतकऱयाने स्वतःहून गावात येणाऱया मिरची एजंटकडे पुरवठा केल्यास त्यांना वाहतूकदार टेम्पोधारक दम देऊन दुसऱयांदा मिरची पुरवठा करण्यास मज्जाव करत आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱयांची परिस्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाल्याने या वषीच्या मिरची पिकांवर मात्र नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. यासाठी अशा शेतकऱयांना लुबाडणाऱया वाहतूकदार व एजंटांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

रेबीज लसच उपलब्ध नसल्याने संताप

Patil_p

सांबरा विमानतळावर आणखी एक इंधन स्टेशन

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक येथे 95 रिंगणात, 7 बिनविरोध

Patil_p

लोकमान्य ग्रंथालयातर्फे अशोक याळगी यांना श्रद्धांजली

Omkar B

वाहनांना अडवून लूटणाऱया टोळीला अटक

Patil_p

विमुक्त भटक्या समाज कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Patil_p
error: Content is protected !!