नॅकचे संचालक प्रा. एस. सी. शर्मा यांचे प्रतिपादन : चन्नम्मा विद्यापीठाचा 8 वा पदवीदान समारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
राष्ट्र निर्मितीच्या काळात राष्ट्रवादाची भूमिका महत्त्वाची असते. नवीन पदवीधारक हे सायकलप्रमाणे हे या प्रक्रियेचे भाग आहेत. त्यांची यापुढे देशाच्या विकासात प्रमुख भूमिका असणार आहे. शिक्षणाचे आधुनिकीकरण झाले पाहिजे, परंतु पाश्चात्यीकीकरण म्हणजे आधुनिकीकरण नाही असे प्रतिपादन नॅक बेंगळूरचे संचालक प्रा. एस. सी. शर्मा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.
राणी चन्नम्मा विद्यापिठाचा आठवा पदवीदान समारंभ सोमवारी हालगा येथील सुवर्णसौधच्या सभागृहात पार पडला. या पदवीदान समारंभात ते बोलत होते. व्यासपिठावर राज्याचे राज्यपाल व कुलपती वजुभाई वाला, कुलगुरू प्रा. एम. रामचंद्रगौडा, फायनान्स अधिकारी प्रा. डी. एन. पाटील, मूल्यमापन विभागाचे रजिस्टार प्रा. एस. एम. हुरकडली, रजिस्टार प्रा. बसवराज पद्मशाली उपस्थित होते.


तिघांना डॉक्टरेट पदवी प्रदान
या पदवीदान समारंभात एकूण 33,974 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यासह समाजात उल्लेखनिय कार्य करणाऱया तीन व्यक्तींना डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आले. क्रीडा व समाज क्षेत्रातील कार्याबद्दल गोविंदराज औद्योगिक क्षेत्रासाठी पद्मश्री मोहनदास पै व शिक्षण समाजसेवा कार्यासाठी हुबळी येथील जगद्गुरू निरंजन स्वामी यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. यावषी 79 विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली. पदवीदान समारंभात राज्यपालांच्या हस्ते काही निवडक स्नातक व स्नातकोत्तर 22 सुवर्ण पदके देण्यात आली.
विद्यार्थ्यांची अनुपस्थिती
यावषी कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे त्याचा परिणाम हा पदवीदान समारंभावेळी देखील दिसून आला. काही निवडक विद्यार्थ्यांनाच पदवीदान सोहळय़ाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्यासाठीही कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली. दरवषी पदवीदान समारंभ हा व्हीटीयूच्या सभागृहात होतो. परंतु यावषी तो हालगा येथील सुवर्ण विधानसौधमध्ये घेण्यात आला. कोरोना चाचणीची सक्ती व कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे पदवी धारकांची अनुपस्थिती जाणवली.