Tarun Bharat

पिंपरीत नदीपात्र बुजविण्याचा प्रकार

नदीपात्रातील भरावामुळे पावसाळय़ात गंभीर पूरस्थिती, पालिकेचे दुर्लक्ष

 पिंपरी / प्रतिनिधी :

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱया नद्यांची पात्रे बुजविल्यामुळे अत्यंत अरुंद झाली आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाळय़ात त्याचा प्रत्ययही आला. त्यानंतरही शहरातून वाहणाऱया पवना नदीचे पात्र बुजविण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू असताना पालिका प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नदीचे पात्र आणखी कमी झाल्यास पुराची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्या वाहतात. शहरातून वाहणारी पवना ही सर्वाधिक लांबीची नदी आहे, तर मुळा व इंद्रायणी या महापालिकेच्या हद्दीतून वाहणाऱया कमी लांबीच्या नद्या आहेत. चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, कासारवाडी, सांगवी, दापोडी परिसरातून पवना नदी वाहते. या नदीच्या पात्रात ठिकठिकाणी मातीचे ढिगारे टाकून नदीपात्र अरुंद करण्यात आले आहे. त्यामुळे मावळात पाऊस पडल्यानंतर नदीपात्राच्या कडेला पुराचा धोका निर्माण होतो. त्यातच नदीपात्रालगत मोठय़ा प्रमाणात झोपडपट्ट्या वाढल्या आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये पवना नदीला मोठा पूर आल्याने दहा हजारांहून अधिक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले होते. नदीचे पात्र अरुंद झाल्यानेच पूर आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.

त्यावेळी राडारोडा टाकणाऱयांवर कारवाई करण्याबरोबरच अतिक्रमणे हटविण्याबाबत पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची भूमिका घेतली होती. मात्र पूर ओसल्यानंतर पालिका प्रशासनाला आपल्या भूमिकेचाही विसर पडला आहे. शहरात पुन्हा ठिकठिकाणी नदीपात्र बुजविण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू झाला असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या प्रकारात वाढ झाली आहे.

चिंचवड ते काळेवाडी दरम्यान वाहणाऱया पवना नदीपात्राच्या लगत महिनाभरापासून राडारोडा आणून टाकण्यात येत आहे. रविवारपासून हा राडारोडा जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रात लोटला जात आहे. या ठिकाणी असलेले महापालिकेचे बीट निरीक्षक, अभियंते, उपअभियंत्यांसह कार्यकारी अभियंत्यांचेही आर्शिवाद नदीपात्र बुजविणाऱयांवर असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

तात्काळ गुन्हा दाखल करा – ऍड. झुळुक

शहरातील नद्यांपात्रांवर अतिक्रमणे करणे, टपऱया भाडे उकळणे असे प्रकार सुरू आहेत. महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी तसेच गुन्हा दाखल करावा अन्यथा न्यायालयात दावा दाखल केला जाईल, असा इशारा ऍड. दत्ता झुळुक यांनी दिला आहे.

Related Stories

सोलापूर : बंद दुकानचे शटर तोडून ३२ हजार लंपास

Archana Banage

सोलापुरात ऊसतोड कामगाराकडून पत्नीचा खून

Archana Banage

पत्रकारांनी वास्तवतेचे भान ठेवत लिखाण करणे गरजेचे – छत्रपती संभाजीराजे

Archana Banage

मोटार सायकल अपघातात दोन ठार

Archana Banage

सोलापूर : आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज, तर शहरात नव्याने ५४ पॉझिटिव्ह

Archana Banage

सोलापूर : माढा तालुक्यात आज १९ कोरोना रुग्णांची वाढ ; एकूण आकडा ५०५

Archana Banage