Tarun Bharat

पिछाडीवरून मुंबई सिटीची विजयी झेप

Advertisements

इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धा : केरळ ब्लास्टर्सविरुद्ध 2-1 फरकाने बाजी, 15 सामन्यातील 10 वा विजय, बिपिन-ऍडमचा प्रत्येकी 1 गोल

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

आयएसएल शील्ड मिळविण्याच्या दिशेने मुंबई सिटी एफसीने आणखी एक भक्कम पाऊल टाकताना आपल्या दहाव्या विजयाची नोंद केली. बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात आरंभीच्या पहिल्या सत्रातीत एका गोलच्या पिछाडीनंतर मुंबई सिटी एफसीने केरळ ब्लास्टर्सचा 2-1 गोलांनी पराभव केला.

मुंबई सिटी एफसीसाठी बिपीन सिंग आणि ऍडम फाँड्राने तर केरळ ब्लास्टर्सचा एकमेव गोल विसेंत गोमीझने केला. या विजयाने मुंबई सिटी एफसीला 3 गुण प्राप्त झाले. पंधराव्या सामन्यातील त्यांचा हा दहावा विजय. तीन बरोबरी आणि दोन पराभवाने त्यांचे आता 33 गुण झाले असून ते अजुनही पहिल्या स्थानावर आहेत. दुसऱया स्थानावर असलेल्या एटीके मोहन बागानचे 27 गुण झाले असून त्यानी मुंबई पेक्षा एक सामना कमी खेळला आहे. पराभूत केरळ ब्लास्टर्सचे सोळा सामन्यांतून तीन विजय, सहा बरोबरी आणि सात पराभवाने 15 गुण झाले असून ते नवव्या सथानावर आहेत.

नेहमीप्रमाणे या सामन्यातही केरळ ब्लास्टर्सने प्रथम आघाडी घेतल्यानंतर सामना गमावला. सामनावीर बनलेल्या मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंगही केरळ ब्लास्टर्सच्या विजयाच्या आड आला. त्याने आपल्या संघावर होणारे किमान तीन गोल उत्कृष्ट गोलरक्षण करून वाचविले. सामन्याच्या तिसऱयाच मिनिटाला मुंबई सिटीची गोल करण्याची संधी हुकली. यावेळी गोडार्डने दिलेल्या पासवर रेनियर फर्नांडिसचा फटका क्रॉसबारवरून गेला.

त्यानंतर सामन्यावर पूर्णपणे केरळ ब्लास्टर्सचे वर्चस्व आढळून आले. प्रथम 13व्या मिनिटाला योंड्रेमबाम देनेचंद्राच्या पासवर बाकारी कोन आणि नंतर 25व्या मिनिटाला राहुल के. पी. यांचे गोलमध्ये जाणारे फटके मुंबई सिटी एफसीचा गोलरक्षक अमरेंदर सिंगने अडविले. गोल करण्याचे दोन यत्न अमरींदरने थोपविल्यानंतर 27व्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्सने गोल करून आघाडी घेतली. सहाल अब्दुल समदने घेतलेल्या कॉर्नरवर विसेंत गोमीझने यावेळी एका जबरदस्त हेडरवर अमरींदर सिंगला भेदले व चेंडू जाळीत टोलविला.

दुसऱया सत्रातील सामना सुरू झाल्यानंतर विसाव्या सेकंदालाच मुंबई सिटी एफसीने गोल करून सामना बरोबरीत आणला. गोडार्ड याच्याकडून मिळालेल्या पासवर बिपीन सिंगने गोलरक्षक आल्बिनो गोम्सला भेदले आणि गोल केला. या गोलनंतर मुंबई सिटीने खेळावर आपलं वर्चस्व राखले. सामन्याच्या 60व्या मिनिटाला सहाल अब्दुल समदच्या पासवर के. पी. राहुलचा फटका अमरींदर सिंगने अडविल्याने ब्लास्टर्सची परत एकदा आघाडी घेण्याची संधी हुकली.

65व्या मिनिटाला मुंबईने पेनल्टीवर गोल केला. ब्लास्टर्सचा कप्तान कॉस्ताने मुंबईच्या खेळाडूला बॉक्समध्ये पाडल्याबद्दल मिळालेल्या पेनल्टीवर ऍडम फाँड्राने आल्बिनोला भेदले व विजयी गोल केला.

Related Stories

गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात ऊसाला दर द्यावा

Patil_p

आता जीव्हीएम सर्कलजवळ वाहनांचा गोंधळ व धोका..

Patil_p

उद्योगांमध्ये आता 12 तास काम

Patil_p

खाण, पर्यटन सुरू करण्यास मान्यता द्यावी

Omkar B

गौरव आर्य आज ‘इडी’समोर हजर राहणार

Patil_p

डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

Amit Kulkarni
error: Content is protected !!