ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रसार दुसऱ्या लाटेत अधिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच मेडिकल सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागत आहे. या लाटेत रूग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय ऑक्सिजनची मोठी गरज आहे. पीएम केअर फंड अंतर्गत राज्यांना व्हेंटिलेटर देण्यात आले होते, परंतु व्हेंटिलेटरमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे डॉक्टरांनी हात वर केल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.


राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बरीच समानता आहे. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात – हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात – दोघांनाही सापडणे कठीण आहे. अशा शब्दात निशाणा साधला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये केंद्राकडून व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते. मात्र, काही सुटे भाग न आल्यामुळे हे व्हेंटिलेटर्स पडून होते. या मुद्द्यावरून भाजपा आणि सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना आता काँग्रेसकडून या एकूणच व्हेंटिलेटर पुरवठा प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला होता.