थायलंड खुली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा
वृत्तसंस्था/ बँकॉक
थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या पी.व्ही. सिंधुने एकेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. ऑलिम्पिक चॅम्पियन आणि महिला बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीत चौथ्या स्थानावर चीनच्या चेन यु फेईने पी.व्ही. सिंधूचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
थायलंड खुल्या सुपर 500 दर्जाच्या या बॅडमिंटन स्पर्धेत शनिवारी महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात चीनच्या चेन फेईने सिंधुचा 43 मिनिटांच्या कालावधीत 21-17, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला.
सहावी मानांकित आणि चेन फेई यांच्यात आतापर्यंत दहा सामने झाले असून त्यामध्ये सिंधुने सहा तर फेईने चार सामने जिंकले आहेत. 2019 साली विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या झालेल्या विश्व टूर बॅडमिंटन स्पर्धेचे अंतिम सामन्यात चीनच्या चेनने सिंधूचा पराभव केला होता. सिंधूने यापूर्वी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय तसेच स्वीस खुल्या अशा दोन सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद त्याचप्रमाणे अशिया चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक मिळविले होते. सिंधू आता जकार्तामध्ये 7 ते 12 जून दरम्यान होणाऱया इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे.