Tarun Bharat

पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत

Advertisements

थायलंड ओपन बॅडमिंटन ः जपानच्या यामागुचीवर मात

वृत्तसंस्था/ बँकॉक

दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱया भारताच्या पीव्ही सिंधूने जपानची जागतिक अग्रमानांकित अकाने यामागुचीला पराभवाचा धक्का देत येथे सुरू असलेल्या थायलंड ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले.

सहावे मानांकन मिळालेल्या सिंधूने यामागुचीवर तीन गेम्सच्या लढतीत 21-15, 20-22, 21-13 असा विजय मिळवित आगेकूच केली. यामागुचीला येथे दुसरे मानांकन मिळाले होते. चीनची ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेईविरुद्ध सिंधूची उपांत्य लढत होणार आहे. सिंधू-यामागुची यांच्यात बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत शेवटची गाठ पडली होती. त्या लढतीत सिंधूने वेळ काढण्याचे धोरण ठेवल्याचा ठपका ठेवत पंचांनी तिला वादग्रस्तरीत्या एका गुणाचा दंड केला होता. सिंधू-यामागुची यांच्यात याआधी 22 लढती झाल्या असून सिंधूने त्यापैकी 13 व विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन यामागुचीने 9 लढती जिंकल्या होत्या. सिंधूने येथील सामन्यात पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन करीत तिच्यावरील 14 वा विजय नोंदवला.

या लढतीत दोघींनी प्रारंभापासूनच तोडीस तोड खेळ केला. सिंधू क्रॉस कोर्ट स्लाईसेस व ड्रॉप्सचा जास्त वापर करून यामागुचीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत होती. यामागुचीने प्रारंभी 3 गुणांची आघाडी मिळविली होती. पण तिला ती टिकविता आली नाही आणि सिंधूने ब्रेकपर्यंत 11-9 अशी मजल मारली. यामागुचीने नंतर पाच पॉईंट्स मिळविले, पण सिंधूने त्यानंतर सात पॉईंट्स मिळवित 19-14 अशी आघाडी घेतली. पाच गेमपॉईंट्स मिळविण्याआधी सिंधूने एक लांबवर फटका मारला होता. यामागुचीचा परतीचा फटका मारताना तोल गेल्याने शटल नेटला लागल्यावर सिंधूने हा गेम जिंकला. दुसऱया गेममध्ये यामागुचीच्या हालचाली मंदावल्यासारख्या वाटत होत्या आणि तिच्याकडून चुकाही होऊ लागल्याने सिंधूने ब्रेकवेळी 11-5 अशी आघाडी घेतली. यातील 11 पैकी 10 गुण तिने आरामात जिंकले होते. सिंधूने नंतर क्रॉस कोर्ट फटक्यावर अनेक गुण मिळविले. पण तिच्याकडून एकदा सर्व्हिस फाऊल झाल्यानंतर यामागुचीने जोरदार मुसंडी मारत 11-13 आणि नंतर 16-16 वर तिला गाठले. जलद स्मॅश व अचूक परतीच्या फटक्यानंतर यामागुचीला दोन गेमपॉईंट मिळाले. सिंधूने ते वाचवले. पण सिंधूने आपल्या सर्व्हिसवर लांब फटका मारल्याने यामागुचीने हा गेम जिंकत बरोबरी साधली.

निर्णायक गेममध्ये सिंधूने ब्रेकपर्यंत सहा गुणांची आघाडी घेतली. यामागुचीला पाठीचा त्रास होत असल्याचे जाणवत होते, त्यामुळे तिच्या फटक्यावर मर्यादा आल्या. सिंधू 15-11 वर असताना यामागुचीने परतीच्या फटक्यावर चुका केल्या आणि सिंधूला मॅचपॉइट्स मिळाले. त्यातील दुसऱयावर सिंधूने यश मिळवित विजय साकार केला.

Related Stories

लकी मैदानावर राजस्थान दिल्ली कॅपिटल्सला रोखणार?

Patil_p

सनरायजर्स-आरसीबी एलिमिनेटर लढत आज

Patil_p

मालिकाविजयासाठी भारतीय संघ सज्ज

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघात आज दुसरी टी-20

Patil_p

कॅचेनोव्ह, इव्हान्स दुसऱया फेरीत

Patil_p

विनेश फोगटची शिबिरातून माघार

Patil_p
error: Content is protected !!