Tarun Bharat

पीव्ही सिंधू, के.श्रीकांतची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ बाली, इंडोनेशिया

भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांनी वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मात्र महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांना पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

महिला एकेरीत दोन ऑलिम्पिक पदके जिंकणाऱया सिंधूने गट अ मधील पहिल्या सामन्यात डेन्मार्कच्या लिने ख्रिस्तोफर्सनवर 21-14, 21-16 अशी सहज मात केली. तिची पुढील लढत जर्मनीच्या योव्होन ली हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत गट ब मधून खेळणाऱया के. श्रीकांतनेही विजयी सलामी देताना फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हचा 42 मिनिटांच्या खेळात 21-14, 21-16 अशा गेम्सनी पराभव केला. श्रीकांतची पुढील लढत थायलंडच्या तीन वेळा ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धा जिंकणाऱया कुनलावत वितिडसर्नशी होणार आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांना मात्र जपानच्या दुसऱया मानांकित नामी मात्सुयामा व चिहारु शिदा यांच्याकडून 14-21, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला.

ख्रिस्तोफर्सनविरुद्ध सिंधूने प्रारंभापासूनच वर्चस्व मिळवित 5-2 अशी झटपट आघाडी घेतली. ख्रिस्तोफर्सनने नंतर मुसंडी मारत 7-6 अशी बढत मिळविली. पण सिंधूने नंतर सलग 10 गुण घेत 16-8 अशी आघाडी घेतली आणि नंतर हा गेम आरामात घेतला. दुसऱया गेममध्ये ख्रिस्तोफर्सनने थोडासा सुधारित खेळ केला आणि एकवेळ 4-2 अशी आघाडीही घेतली होती. पण बेकपर्यंत सिंधूने 11-10 अशी केवळ एका गुणाची बढत घेतली. ब्रेकनंतर सिंधूने 17-13 अशी मुसंडी मारली आणि नंतर गेमसह सामनाही जिंकत विजय साकार केला.

श्रीकांतनेही पोपोव्हविरुद्ध शानदार खेळ केला. कोर्टवर त्याने अतिशय सावध व चपळ खेळ करीत आक्रमक फटक्यांवर गुण मिळविले. पहिल्या गेमच्या सुरुवातीला दोघांत जोरदार चुरस रंगली होती. बेकपर्यंत श्रीकांतने 11-9 अशी आघाडी घेण्यात कसेबसे यश मिळविले. बेकनंतर सलग पाच गुण घेत श्रीकांतने 16-10 अशी बढत मिळविली आणि नंतर हा गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱया गेममध्ये श्रीकांत प्रारंभी 1-4 असा पिछाडीवर पडला होता. पण यातून सावरत त्याने ब्रेकपर्यंत दोन गुणांची आघाडी मिळविली. पहिल्या गेमप्रमाणे श्रीकांतने ब्रेकनंतर 14-9 अशी भक्कम बढत घेतली, नंतर ती 19-14 अशी केली. पोपोव्हने एक फटका दूरवर मारल्यानंतर श्रीकांतला चार मॅचपॉईंट्स मिळाले. नेटजवळ शानदार खेळ करीत त्याने या गेमसह सामनाही जिंकला.

Related Stories

रिझवान, ब्यूमाँट वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

Patil_p

नीरज चोप्रा खेलरत्नसाठी नामांकित

Patil_p

प्रमोद भगत, मनीषा यांना सुवर्णपदके

Patil_p

न्यूझीलंडमध्ये जून महिन्यात टेनिस स्पर्धा

Patil_p

न्यूझीलंडचा पाकवर डावाने विजय

Omkar B

अमेरिकन महिला संघाच्या प्रशिक्षकपदी चंद्रपॉल

Patil_p