Tarun Bharat

पीव्ही सिंधू, लोवलिनाचे पदक निश्चित!

Advertisements

बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक, मुष्टियुद्धात लोवलिनाचे देखील ऐतिहासिक यश, पदकसंख्या 3 वर पोहोचणार

टोकियो / वृत्तसंस्था

बॅडमिंटन महिला एकेरीत विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू तर मुष्टियुद्धात पदार्पणवीर लोवलिना बोर्गोहेन यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक मारत किमान पदक निश्चित केले असून आता ते सुवर्ण जिंकण्याच्या मोहिमेला नव्याने प्रारंभ करतील. बॅडमिंटनमध्ये सिंधूने जपानच्या चौथ्या मानांकित यामागुचीला 56 मिनिटात 21-13, 22-20 अशा फरकाने मात दिली तर मुष्टियुद्धात लोवलिनाने चायनीज तैपेईची माजी वर्ल्ड चॅम्पियन निएन-चिन चेन हिचा 4-1 असा धुव्वा उडवत शेवटच्या चारमधील आपले स्थान निश्चित केले.

यापूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणाऱया पीव्ही सिंधूने या सर्वोच्च व्यासपीठावर सलग दुसऱयांदा उपांत्य फेरी गाठताना एकतर्फी वर्चस्व गाजवले. दुसऱया गेममध्ये बरीच जुगलबंदी रंगली असली तरी अंतिम क्षणी सिंधूने बाजी मारत हा सामना तिसऱया गेमपर्यंत लांबणार नाही, याची काटेकोर दक्षता घेतली. आता उपांत्य फेरीत सिंधूची लढत थायलंडची रॅशनोक इन्टेनॉन व चायनीज तैपेईच्या तई त्झू यिंग यापैकी एकीशी होईल.

सहाव्या मानांकित सिंधूने जापनीज प्रतिस्पर्धी यामागुचीविरुद्ध यापूर्वी झालेल्या लढतीत 11-7 असे वर्चस्व गाजवले होते. तीच परंपरा येथेही कायम राहिली. यंदा मार्चमध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये देखील सिंधूने यामागुचीला नमवले होते.

यामागुचीचा प्रतिकार निष्फळ

यामागुचीने येथे आक्रमक खेळ साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, सिंधूने संयमी खेळ साकारत तिला फारशी संधी दिली नाही. आक्रमक स्मॅश व हाफ स्मॅश फटक्यांचा योग्य मिलाफ साधत तिने यामागुचीवर दडपण राखले. सिंधूने या लढतीत देखील उत्तम कोर्ट कव्हरेजचा दाखला दिला तर तिच्या फटक्यातील वैविध्यामुळे यामागुचीची बरीच दमछाक झाली. वास्तविक, या प्रतिकूल स्थितीत देखील यामागुचीने दुसऱया गेममध्ये सिंधूला बरेच झुंजवले. एकवेळ 8-13 फरकाने पिछाडीवर असलेल्या जापनीज प्रतिस्पर्धीने पुढे 16-15 अशी आघाडी घेतली. उभय प्रतिस्पर्ध्यातील एक रॅली तर 54 स्ट्रोक्सपर्यंत रंगली. दोघींमधील एकेक गुणासाठी झालेला संघर्ष तर निव्वळ लक्षवेधी होता.

अंतिम क्षणी 20-20 अशी बरोबरी असताना सिंधूने अप्रतिम हाफ स्मॅशवर मॅच पॉईंट मिळवला आणि त्यानंतर य ामागुचीचा एक फटका नेटमध्ये थोपल्यानंतर सिंधूच्या धडाकेबाज विजयावर शिक्कामोर्तब झाले.

कोरोनावर मात करणाऱया लोवलिनाचे लक्षवेधी यश!

लोवलिना बोर्गोहेनने 69 किलोग्रॅम वजनगटात महिला बॉक्सिंगमध्ये भारताचे आणखी एक पदक निश्चित केल्यानंतर देशभरात याचा आनंद साजरा केला गेला. आसामच्या 23 वर्षीय लोवलिनाने 4-1 फरकाने बाजी मारली. आता ती तुर्कीच्या विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन बुसेनेझ सुर्मेनेलीविरुद्ध उपांत्य फेरीत लढेल. वास्तविक, लोवलिना कोरोनाचा संसर्ग झाल्याने युरोपला सरावासाठी देखील जाऊ शकली नव्हती. पण, तरीही ही बाब आपल्या कामगिरीच्या आड येणार नाही, याची तिने खात्री करुन घेतल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले.

दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्य जिंकणाऱया बोर्गोहेनने येथे अत्यंत संयमी मात्र आक्रमक खेळावर भर देत विजयश्री खेचून आणली. लोवलिनाने आक्रमणावर भर देताना काऊंटर-ऍटॅकमध्ये आपण कमी पडणार नाही, याचीही काटेकोर काळजी घेतली. शेवटच्या 3 मिनिटात तर तिने अतिशय शिस्तबद्ध खेळ साकारला, हे विशेष महत्त्वाचे ठरले. भारताला यापूर्वी विजेंदर सिंग (2008) व एमसी मेरी कोम (2012) यांनी मुष्टियुद्धात ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे.

अर्थात, यापुढे आणखी खडतर आव्हाने असतील, याची बोर्गोहेनला उत्तम जाणीव आहे. तिच्याकडे काही कालावधी हाताशी असल्याने प्रतिस्पर्ध्याचे व्हीडिओ पाहून आपण रणनीती निश्चित करणार असल्याचे ती सांगते. 2017 पासून ध्यान करत असल्याने त्याचा येथे लाभ झाल्याचे लोवलिनाने आवर्जून नमूद केले.

अभी क्या बोलू, मेडल तो बस गोल्ड होता है!

या स्पर्धेत पुढील लक्ष्य काय असेल, या प्रश्नावर लोवलिनाने अभी क्या बोलू, मेडल तो बस गोल्ड होता है, इतके सूचक उत्तर देऊन आपले इरादे स्पष्ट केले. भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग यांनी देखील तिच्या खेळाची प्रशंसा करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

लोवलिना ही महम्मद अली व एमसी मेरी कोम यांची चाहती राहिली असून अलीप्रमाणे फूटवर्क व लाँग पंच मारण्यावर तिचा भर राहत आला आहे. मेरी दीदीकडून बरीच प्रेरणा मिळत आली आहे, याचाही ती उल्लेख करते.

लोवलिनाचे प्रशिक्षक म्हणाले, वो आरामसे जितेगी, कोई टेन्शन नही है!

लोवलिना उपांत्यपूर्व फेरीत लढण्याच्या एक दिवस आधीच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक पदम बोरो यांनी ‘वो आरामसे जितेगी, कोई टेन्शन नही है,’ अशा शब्दात तिच्या विजयाची खात्री व्यक्त केली होती. लोवलिना बॉक्ंिसगपूर्वी किक बॉक्ंिसगचा सराव करत असे. बोरो यांनीच तिला बॉक्सिंगकडे वळवले.

लोवलिनाच्या दोघी मोठय़ा बहिणी लिचा व लिमा या किक-बॉक्सर असून ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये आसामतर्फे पदक जिंकणारी लोवलिना पहिलीच ऍथलिट ठरली आहे. 23 वर्षीय लोवलिनाच्या या यशामुळे भारतीय महिला बॉक्ंिसगमध्ये नव्या पर्वाची देखील ही नांदी मानली जाते.

क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, ऑलिम्पिक सुवर्णजेता बॉक्सर विजेंदर सिंग व मेरी कोम, नेमबाज अभिनव बिंद्रा, ऑलिम्पिक कांस्यजेता मल्ल योगेश्वर दत्त, माजी वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज हिना सिद्धू, माजी हॉकी कर्णधार विरेन रस्किन्हा, बीसीसीआय सचिव जय शाह, नेमबाज जॉयदीप करमाकर आदींनी लोवलिनाचे यावेळी अभिनंदन केले.

Related Stories

व्हेगातर्फे पोलिसांना पीपीई किटस्, मास्क

Patil_p

देशभरात ऑनलाईन क्लासेसची चलती : माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन

Patil_p

नेदरलँड टी-20 वर्ल्डकप संघात रोलेफ, कॉलिनचे पुनरागमन

Patil_p

भारत-सर्बिया महिला फुटबॉल सामना आज

Patil_p

सध्याच्या संघात केवळ दोनच रोल मॉडेल

Rohan_P

आज फातोडर्य़ात होणार एफसी गोवा आणि मुंबई सिटीत स्फोटक लढत

Patil_p
error: Content is protected !!