Tarun Bharat

पीव्ही सिंधू, समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था / बँकॉक

भारताचे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व समीर वर्मा यांनी टोयोटा थायलंड ओपन सुपर 1000 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आधीच्या फेरीत जोनातन ख्रिस्तीला पराभवाचा धक्का देणाऱया एचएस प्रणॉयचे आव्हान मात्र संपुष्टात आले तर सात्विकसाईराजने मिश्र व पुरुष दुहेरी असे दोन्ही विभागात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

Advertisements

ऑलिम्पिक रौप्यजेत्या सिंधूने मलेशियाच्या किसोना सेल्वादुरायचा 21-10, 21-12 असा केवळ 35 मिनिटांत पराभव करून शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. तिची पुढील लढत थायलंडची रॅटचॅनोक इंटेनॉन किंवा कोरियाची सुंग जि हय़ुन यापैकी एकीशी होईल. ‘पहिला गेम फारच सोपा गेला. पण दुसऱया गेममध्ये मला वाऱयाच्या दिशेने खेळताना फटक्यावर नियंत्रण ठेवावे लागत होते. या गेममध्ये माझ्याकडून काही साध्या चुकाही झाल्या, ज्या माझ्याकडून व्हायलाच नको होत्या. वारा फार असल्याने मला सावध खेळ करावा लागला,’ असे सिंधू सामन्यानंतर म्हणाली.

जागतिक 31 वा मानांकित समीर वर्माने प्रभावी कामगिरी पुढे चालू ठेवताना जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर असणाऱया डेन्मार्कच्या रासमुस गेम्केला केवळ 39 मिनिटांच्या खेळात 21-12, 21-9 असे चकित केले. गेम्केवरील समीरचा हा एकंदर तिसरा विजय आहे. समीरने पहिल्या फेरीत मलेशियाच्या आठव्या मानांकित ली झी जियाला धक्का दिला होता. त्याची पुढील लढत डेन्मार्कच्या तिसऱया मानांकित अँडर्स अँटोनसेनशी होणार आहे. अँडर्सला उपांत्यपूर्व फेरीसाठी पुढे चाल मिळाली होती. ‘पूर्ण तयारीनिशी उतरल्याने मला जिंकण्याची खात्री वाटत होती. पुढील फेरीत अँटोनसेनचे कठीण आव्हान आहे. मात्र मी सर्वोत्तम प्रयत्न करेन, यश नक्की मिळेल, असा विश्वास वाटतो,’ असे समीर नंतर म्हणाला. मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज रनकिरेड्डी व अश्विनी पोनप्पा यांनीही धक्कादायक निकाल देताना जर्मनीची जागतिक 17 वी मानांकित जोडी मार्क लॅम्सफुस व इजाबेल हेर्ट्रिच यांचा 22-20, 14-21, 21-16 असा पराभव केला. सुमारे तासभर ही झुंज रंगली होती. पुरुष दुहेरीतही सात्विकसाईराजने चिराग शेट्टीसमवेत खेळताना कोरियाच्या सातव्या मानांकित चोई सॉल्ग्यू व सीओ स्युंग जेइ यांना 21-18, 23-21 असा धक्का देत आगेकूच केली. पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयला मात्र दुसरी फेरी पार करता आली नाही. मलेशियाच्या डॅरेन ल्यूने त्याला 21-17, 21-18 असे नमवित स्पर्धेबाहेर घालविले.

Related Stories

बायो-बबलचा भंग केल्यास 1 कोटीचा दंड

Patil_p

लखनौचा दिल्ली कॅपिटल्सवर विजय

Patil_p

पी.टी. उषाची केरळ मुख्यमंत्र्यांना विनंती

Patil_p

पीसीबीच्या संचालकपदी पहिली महिला

Patil_p

भारतीय क्रिकेट संघाला दंड

Patil_p

पुनित बिस्तचा सर्वाधिक 17 षटकारांचा विक्रम

Patil_p
error: Content is protected !!