Tarun Bharat

पी. एन. जोशी एक द्रष्टे अर्थतज्ञ

श्रीयुत प्रभाकर नारायण जोशी उर्फ पी. एन. जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आणि माझ्या डोळ्यासमोर सुमारे बत्तीस वर्षांचा त्यांच्याबरोबर घालवलेल्या क्षणांचा चित्रपट उभा राहिला.

पी. एन. जोशी हे त्यांच्या प्रारंभीच्या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी होते. त्या काळात अनेक दिग्गज व अभ्यासू अशा व्यक्तींच्या (उदाहरणार्थ एम. नरसिहम, ए. रामन, डॉक्टर मीनाक्षी त्यागराजन, डॉक्टर ए हसिब) सहवासात त्यांची विचार करण्याची शैली व अभ्यासू वृत्ती तयार झाली. त्या काळात अनेक उच्चस्तरीय चर्चासत्रात भाग घेण्याची संधी मिळाली व त्यातूनच त्यांचे अर्थविषयक मनन व चिंतन वाढत गेले. 1990 साली त्यांनी जेव्हा युनायटेड वेस्टर्न बँकेची सूत्रे हातात घेतली त्यावेळी जे ते आम्हाला दिसले त्याची पार्श्वभूमी त्यांच्या भारतीय रिझर्व्ह बँकेतील या तपश्चर्येत होती. आर्थिक व बँकिंग क्षेत्रातील धोरणे व त्याचा समाजातील विविध घटकांवर होणारा परिणाम याचा ज्या संवेदनशीलतेने ते अभ्यास करीत असत, त्यामुळे मला ते सामान्यांचे अर्थतज्ञ वाटत असत. धोरण ठरविणाऱयांना काय साध्य करावयाचे याचा त्यांचा पुरेपूर अभ्यास असे. ज्या समाजाचे हीत जपावयाचे आहे त्यांचेसाठी ही धोरणे किती सक्षम आहेत हे ते पाहत असत. भारतीय रिझर्व्ह बँकेनंतर ते बँक ऑफ इंडियात वरिष्ठ अधिकारी म्हणून दाखल झाले. तेथे त्यांनी महाव्यवस्थापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी युनायटेड वेस्टर्न बँकेचे चेअरमन म्हणून सूत्रे हातात घेतली.

कर्नाटकातील चिकोडीजवळ एकसंबा या छोटय़ा खेडय़ातील संस्कारक्षम कुटुंबात 12 फेब्रुवारी 1933 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिकोडी येथे झाले. एस. एस. सी. परीक्षेसाठी त्यांना बेळगावला जावे लागले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. युनायटेड वेस्टर्न बँकेमधून ते निवृत्त झाल्यावर मला म्हणावयाचे की माझ्याकडे आता वेळ असल्याने मी जनसामान्यांसाठी आर्थिक विषयावर लेखन करणार आहे. त्यांच्या प्रत्येक लेखात अर्थशास्त्रातील बोजड आणि क्लिष्ट भाषा न वापरता त्यांनी सोप्या भाषेत विषयाची मांडणी केली. त्यामुळे अनेक दैनिकात येणारे त्यांचे लेख वाचक आवर्जून वाचत असत व त्यांना त्याची प्रतिक्रिया कळवत असत. जागतिकीकरणाच्या वाटचालीत बदलांच्या प्रक्रियेत अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांना असे वाटे की बँकिंग सामान्य माणसापासून दूर चालले आहे. काही वेळा ते म्हणत की, बँकांची सामाजिक बांधिलकी हरवली आहे. त्याचवेळी जुन्या खासगी बँकांच्या भवितव्याविषयी ते काळजी व्यक्त करत असत.

त्यांनी अनेक वेळेला ठामपणे राष्ट्रीय बँकिंग धोरणाच्या आवश्यकतेविषयी विचार मांडले. 2000 साली अर्थ जिज्ञासाच्या व्यासपीठावरून पुढील दशकातले बँकिंग या विषयावरच्या परिसंवादात त्यांनी भविष्यकाळातील बँकिंगचा वेध घेतला. तो पुस्तक रुपाने उपलब्ध आहे आणि आता त्यात या भविष्याची सत्यता मला जाणवत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावर अधिकारी व्यक्ती म्हणून जोशी सरांचे नाव घेतले जाई. सातारा, पुणे, मुंबई येथे बरेच वेळा अर्थसंकल्पावरील चर्चासत्रात ते अध्यक्ष असत आणि त्यांचे अशा कार्यक्रमात मार्गदर्शन ऐकण्याची संधी मला मिळाली. अग्रणी बँक योजना हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. रिझर्व्ह बँकेने जेव्हा या योजनेमध्ये अमुलाग्र बदल केले आणि सामाजिक नियंत्रणानंतर प्रत्येक जिह्यात ही योजना राबविण्याचे ठरवले त्यावेळी त्याचा मसुदा ठरवताना त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सातारा येथे मी अग्रणी बँक अधिकारी असताना पतपुरवठा लोकार्पण सोहळ्यात ते आवर्जून येत असत आणि आपले विचार मांडत. त्यांच्या स्वभावात परखडपणा होता. 25 वर्षांपूर्वीची एक घटना आहे, एकदा महाराष्ट्रभर कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने कांदा महागला आणि तत्कालीन शासनाने सरकारी कांदा विक्रीची दुकाने काढण्याचे ठरविले. त्यावेळी पी. एन. जोशी यांनी सरकारला जाणीव करून दिली की कांदा विक्री हे तुमचे काम नाही. त्याचे नियोजन करणे आणि शेतकऱयांचे हित साधून ग्राहकाला तो योग्य दरात मिळणे हे तुमचे काम आहे.

जोशी साहेबांची निवृत्त झाल्यावर देखील अभ्यासवृत्ती कायम राहिली होती. विशेषतः 2014 साली आर्थिक सामीलीकरण हा जो महत्त्वपूर्ण प्रयोग देशात सुरू झाला त्याची त्यांनी आस्थेवाईकपणे दखल घेतली आणि अनेक सूचना केल्या.

जोशी सर सकाळी फिरावयास बाहेर पडले की सर्वांशी बोलत असत. त्यामुळे भाजीवाला सुद्धा त्यांना विचारायचा अण्णा तुम्ही बरेच दिवसात दिसला नाहीत, मग ते म्हणत की मुलाकडे अमेरिकेला गेलो होतो. एवढय़ा मोठय़ा पदावर काम करून सर्वसामान्य लोकांबरोबर त्यांनी संवाद ठेवला. मोठय़ा पदावर असतानासुद्धा त्यांची कार्यसंस्कृती विलक्षण होती. माझी कोणतीही ओळख नसताना मी पहिल्यांदा त्यांच्या केबिनमध्ये त्यांना भेटावयास गेलो होतो. भेट संपल्यावर ते स्वतः खुर्चीवरून उठून मला सोडण्यासाठी केबिनच्या दरवाजापर्यंत आले. या कार्य संस्कृतीचा मला माझ्या बँकिंग जीवनात फार उपयोग झाला. अर्थतज्ञ व एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्याप्रमाणे आपण नम्रता, अभ्यासू वृत्ती आणि सर्वसामान्य लोकांबद्दल आपुलकी ठेवूया. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

श्रीराम नानल,

माजी अग्रणी बँक अधिकारी, सातारा

Related Stories

सिद्धीच्या सर्व साधनांचा आणि सिद्धीचा निर्माता मीच आहे

Patil_p

महिमा ड्रायव्हिंग सीटचा!

Patil_p

अशक्त भारत

Omkar B

‘महिला शिक्षण दिन’ : महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन

Patil_p

नोकरीतील निमूटपणे काम करणे

Patil_p

आधी वंदू तुज मोरया!

Patil_p