Tarun Bharat

पुणे-मिरज-लोंढा विद्युतीकरण ७० टक्के पूर्ण

Advertisements

पुढील वर्षाच्या दिवाळीमध्ये विजेवरील इंजिनाने रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न

संजय गायकवाड / सांगली

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या विकासातील मैलाचा दगड ठरणाऱ्या आणि सांगली, कोल्हापूरच्या दृष्टीने रेल्वेमार्गाने पुण्या-मुंबईला आणखी जवळ असणाऱ्या पुणे-मिरज ते लोंढा या रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाला चांगली गती आली आहे. रेल्वेमार्गावरील मातीकाम आणि भराव टाकण्याचे ७० टक्के, पुल उभारणीचे ५० टक्के तर रूळ टाकण्याचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यापैकी कोल्हापूर ते मिरज रेल्वे विद्युतीकरणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तर पुणे ते सातारा या मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

दरम्यान या मार्गावरून २०२२ च्या दिवाळीमध्ये विजेवरील इंजिने जोडून गाड्या सुरू करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केलेल्या पुणे, मिरज ते लोंढा या रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. यातील पुणे ते मिरज या २८० किलोमीटरमधील मातीकाम आणि भराव टाकण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. पूल उभारणीचे कामही ५० टक्के झाले आहे. मातीचा भराव आणि पुलाच्या कामापाठोपाठ प्रत्यक्ष रूळ टाकण्याचे काम अतिशय किचकट आणि तांत्रिक असले तरी तेही काम ३५ टक्के झाले आहे.

ताकारी ते शेणोली या १६ कि.मी.चे दुहेरीकरण व मिरज ते शेणोलीपर्यंत विद्युतीकरणाचेही काम पूर्ण झाले आहे. ताकारी ते किर्लोस्करवाडी या नऊ कि.मी.चे कामही पूर्ण झाले आहे. किर्लोस्करवाडी ते भिलवडी १३ कि.मी.पैकी दहा कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन कि.मी.चे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. महत्वाचा टप्पा असणाऱ्या सांगली ते मिरज या दहा कि.मी.अंतराचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम जून २०२१ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. पुणे ते जेजुरी व साताऱ्यापर्यंतच्या कामानेही वेग घेतला आहे. आळंदीपर्यंतचे कामही पूर्ण झाले आहे. कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाचे काम यापूर्वीच पूर्ण होऊन या मार्गावरही विजेवरील इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. सुमारे २२०० कोटी खर्चाच्या कामाला केंद्र सरकार व रेल्वेमंत्रालयाकडून टप्प्याटप्प्याने निधी मंजूर केला जात आहे.

मिरज ते कोल्हापूर दुहेरीकरणही आवश्यक

दरम्यान, मिरज ते कोल्हापूर हा रेल्वेमार्ग अद्यापही एकेरीच आहे. या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असले तरी महालक्ष्मी, कोयना, सह्याद्री, महाराष्ट्र गोंदिया, अहमहाबाद, सातारा व पुणे पॅसेंजर कोल्हापुरातून सुटतात. त्या कोल्हापूर, सांगली, मिरज, कराड आणि साताऱ्यातील प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. रेल्वेचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने आणि क्रॉसिंग टाळण्यासाठी कोल्हापूर ते मिरज जंक्शन हा मार्गही दुहेरीकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व राज्य शासनाने केंद्राकडे रेटा लावण्याची आवश्यकता आहे.

दुहेरीकरणानंतर अनेक नव्या रेल्वे

पुणे, मिरज ते लोंढा या रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामानंतर सांगली, मिरज, कोल्हापुरातून मुंबईपर्यंत जाण्याचा वेळ कमी होणार आहे. शिवाय कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव, बेंगळूर, हुबळीकडून मिरजमार्गे मुंबई तसेच गुजरात, दिल्ली, कोलकत्ता, जम्मू आदी भागाकडे नव्या रेल्वे सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Related Stories

लॉकडाऊनची मुदत 15 मे पर्यंत वाढवली

Abhijeet Shinde

सांगली : कोकरूड चेकपोस्टवर असणाऱ्या पोलिसांना, महिलांनी बांधल्या राख्या

Abhijeet Shinde

गृहमंत्र्यांनी तुमच्यासमोर १०० कोटींची मागणी केली का?; परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाचा सवाल

Abhijeet Shinde

‘एसटी महामंडळास 2 हजार कोटी आर्थिक सहाय्य करावे’

Abhijeet Shinde

शिरोलीतील काही तरुणांना गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक

Abhijeet Shinde

जिल्ह्यातील 46 जण पॉझिटिव्ह तर तीन बाधितांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!