Tarun Bharat

पुणे मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचीच बाजी

पुरुष गटात लेट गुटेटा, तर महिला गटात डेरार्टू केबेडेची सरशी, भारतीय धावपटूंचीही मुसंडी

पुणे / प्रतिनिधी

 36 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये इथिओपियन धावपटूंनीच रविवारी वर्चस्व राखले. पूर्ण मॅरेथॉनमध्ये (42 किलो मीटर) लेट गुटेटाने 2 तास 17 मिनिटे 27 सेकंद, तर महिला गटात डेरार्टू केबेडेने 2 तास 47 मिनिटे 2 सेंकद अशी वेळ नोंदवित बाजी मारली. मात्र, दुसऱया व तिसऱया क्रमांकावर भारतीय धावपटूंनी मुसंडी मारली. अर्ध मॅरेथॉनमध्ये (21 किलोमीटर) पुरूष गटात इथिओपियन, तर महिला गटात भारतीय धावपटू सरस ठरले.

 अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरूष गटात शुन्मेसा इथिचा हा 1 तास 5 मिनिटे 2 सेंकद वेळेसह विजेता ठरला, तर महिलांमध्ये मराठमोळी रेश्मा केवटेने 1 तास 19 मिनिटे 54 सेकंद वेळेसह प्रथम क्रमांक पटकाविला. देशातील सर्वात जुनी मॅरेथॉन असलेली पुणे मॅरेथॉन ही डिसेंबरमध्ये पहिल्या रविवारी घेण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये ही स्पर्धा खंडीत झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये 2021 ची मॅरेथान स्पर्धा घेण्यात आली होती.

 बाबूराव सणस मैदानाच्या बाहेरून यंदाच्या पुणे मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. मुख्य स्पर्धेला सुरुवात होताच इथिओपियाच्या धावपटूंनी अपेक्षेप्रमाणे मुसंडी घेतली. सुरुवातीला 13 धावपटूंचा जथ्था सोबत धावत होता. दांडेकर पुलावरून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर विठ्ठल मंदिरापर्यंत हा जथ्था विखुरला गेला. यातील दोन धावपटू मागे पडले. वडगाव पुलापर्यंत पुन्हा यातील एक-एक धावपटू मागे पडत गेल्याने आघाडीच्या जथ्थ्यात केवळ तीनच धावपटू राहिले. यात उर्गा अब्दू केबेबे आघाडीवर होता. वांजळे पुलावर 8 किलोमीटरच्या अंतरापर्यंत हे तिघे धावपटू एकमेकांचा अंदाज घेत धावत होते. मात्र, केबेबेने आपली आघाडी आणखी वाढविली होती. नांदेड सिटीतून यू टर्न घेईपर्यंत हेच चित्र कायम होते.

 संतोष हॉल ओलांडल्यानंतर 20 किलोमीटरपर्यंत अब्दू केबेबेने आपली आघाडी टिकवून ठेवली होती. पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी असलेल्या धावपटूंना सिंहगड रोड ते नांदेड सिटी मार्गावर दोन फेऱया मारायच्या असल्याने इतर गटातील धावपटूही मार्गावर दिसू लागल्याने संपूर्ण मार्गच मॅरेथॉनमय झाला होता. परतीच्या मार्गावर अखेरच्या साडेतीन ते चार किलोमीटरच्या टप्प्यात लेट तेस्फाये गुटेटाने अब्दू केबेबेला पिछाडीवर टाकत धावण्याचा वेग वाढविला. अखेरच्या टप्प्यासाठी राखून ठेवलेल्या ऊर्जेचा वापर करत गुटेटाने अब्दू केबेबे पुढे जाणार नाही, याची खबरदारी घेत एका मिनिटांच्या फरकाने ही शर्यत जिंकली.

Related Stories

बेंगळूर एफसी बरोबर प्रबिर दास करारबद्ध

Patil_p

हॅपी बर्थडे, विराट!

Patil_p

ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड? फैसला आज!

Patil_p

आयपीएल लंकेत भरवण्याचा विचार नाही : बीसीसीआय

Patil_p

हार्दिक, क्रुणाल पांड्याच्या वडिलांचे निधन

datta jadhav

माजी ऑलिम्पियन्सना प्रशिक्षणासाठी निमंत्रण

Patil_p