Tarun Bharat

पुण्याच्या भरवस्तीत थरारनाटय़ानंतर गवा जेरबंद

पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न : जखमी झाल्याने अखेर प्राणास मुकला

प्रतिनिधी / पुणे

पुण्याच्या कोथरूड भागातील महात्मा सोसायटी परिसरात रानगव्याचे दर्शन घडल्याने बुधवारी एकच धावपळ उडाली. वनक्षेत्रातून वाट चुकलेल्या या गव्याला पाहण्यासाठी बघ्यांनी केलेली गर्दी, भेदरलेल्या या गव्याने जीव वाचविण्यासाठी केलेल्या पळापळीत संरक्षक भिंतीना व वाहनांना त्याची बसलेली धडक, अखेर वनविभागामार्फत त्याला पकडण्यात आलेले यश अन् इतक्या साऱया थरारनाटय़ानंतर या रानगव्याचा झालेला दुर्दैवी मृत्यू…अशा प्रकारे माणसांच्या विचित्र प्रकाराचा अनुभव घेत या मुक्या प्राण्यास आपले प्राण गमवावे लागले.

 थंडीच्या हंगामात बुधवारी भल्या पहाटे पुण्याच्या कोथरूड परिसरात एक गवा अवतरला. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा चार वर्षाचा गवा दिसला. सुरुवातीला नागरिकांना ही एखादी गाय असावी अथवा म्हैस असावी असे वाटले. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. पण काही वेळानंतर तो गवा असल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी या गव्यापासून दूर पळ काढला. त्यानंतर पुण्यात गवा आल्याचा सर्वत्र गवगवा झाला. त्यानंतर गव्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली. तब्बल दहा फूट उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून हा गवा मोकळय़ा जागेमध्ये शिरला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

 नागरिकांनी तातडीने याची माहिती वनविभाग आणि पुणे महापालिकेला कळवली. वन विभागाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गव्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले. गवा भेदरल्याने त्याने घरांच्या संरक्षक भिंतींना धडक दिली. काही गाडय़ांनाही तो धडकला. त्यात तो जखमी झाला. दोरी व जाळी टाकून त्याला पकडण्याचेही प्रयत्न केले. भूलचे तीन डोस दिल्यानंतर तो बेशुद्ध झाल्यावर त्याला वन विभाग कर्मचाऱयांनी जेरबंद केले.

साडेचार तासांच्या प्रयत्नांनंतर गाडीत टाकून पुढील उपचार करून त्याला भूगाव येथील रेस्क्मयू सेंटरमध्ये नेण्यात आले. परंतु काही वेळातच या गव्याचा मृत्यू झाला.

Related Stories

राजस्थानमध्ये 772 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

सट्टाबाजाराचे अनुमान भाजप विजयाचे

Patil_p

दिल्लीत ‘दुमका’सारखे क्रौर्य

Amit Kulkarni

राहुल गांधींच्या आरोपांना मोदींचे रोखठोक प्रत्युत्तर

Patil_p

ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ

Amit Kulkarni

पंजाबमध्ये तैनात होणार एस-400

Patil_p