Tarun Bharat

पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणपती मंडळांनी घेतला ‘हा’ निर्णय

ऑनलाइन टीम / पुणे :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी मानाच्या व प्रमुख गणपतींची प्राणप्रतिष्ठापना गणेश मंडळाचे अध्यक्ष-पदाधिकारी यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

याबाबत माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेला श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, केसरी वाडा गणपतीचे अनिल सकपाळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे,  पुनीत बालन यांसह सुनील रासने, नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी आदी उपस्थित होते.

मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला आहे. 


मात्र, यंदा कोरोनाचे सावट पाहता उत्सव साधेपणाने साजरा करीत असतानाच मानाची व प्रमुख गणपती मंडळे गणेश मंडळांच्याच पदाधिका-यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. आठ गणेश मंडळांचे पदाधिकारी एकमेकांच्या मंडळांच्या गणेशाचे विधीवत पूजन करतील. 


श्री कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या शुभहस्ते तर श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची प्राणप्रतिष्ठापना अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या शुभहस्ते तर अखिल मंडई मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या शुभहस्ते होणार आहे. श्री गुरुजी तालीम मंडळाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या शुभहस्ते तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ची प्राणप्रतिष्ठा गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होईल. 


श्री तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या वंशजातील केसरी वाडा गणपतीचे डॉ. दीपक टिळक यांच्या शुभहस्ते तर केसरी वाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना व आरती तुळशीबाग मंडळाच्या पदाधिका-यांच्या शुभहस्ते होणार आहे. गेल्या 128 वर्षात प्रथमच असे घडणार असून याद्वारे मंडळातील आपापसातील स्नेहभाव आणखी वृद्धींगत होणार आहे. तसेच गणेश मंडळांनी सत्यविनायक पूजा देखील करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.  

Related Stories

सेनेकडून आता शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग

datta jadhav

मुख्यमंत्री घरोघरी जाऊन फोटो काढण्यात व्यस्त, सुप्रिया सुळेंची टीका

datta jadhav

सोलापुरात बुधवारी नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्ण

Archana Banage

न्यू इंग्लिश स्कूलचा 141 वा वर्धापनदिन साजरा

Tousif Mujawar

महाराष्ट्रात 4,268 नवे कोरोनाबाधित ; 87 मृत्यू

Tousif Mujawar

लॉकअपमध्ये कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav