Tarun Bharat

पुण्यात स्कूलबस चालकांच्या कुटुंबांना धान्यरुपी मदत

ऑनलाईन टीम / पुणे :

कोविड काळात समाजातील तळागाळातील व्यक्तींना त्यांचा संसार सांभाळण्यासाठी खूप झगडावे लागत आहे. याच काळात शाळाही बंद असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करणारे शिक्षकेत्तर कर्मचारी व बसचालकांवर अत्यंत बिकट परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे पुण्यातील तरुणांनी एकत्र येत अशा कुटुंबांना मदत स्वरूपात धान्याच्या किटचे वाटप केले.


माणुसकीचे दूत व्यासपीठातर्फे विश्रामबाग वाडयासमोरील झांजले विठ्ठल मंदिरात स्कूलबस चालकांना धान्य किट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, सरस्वती मंदिर शिक्षण संस्थेचे संचालक अनिल शिदोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, उद्योजक प्रशांत तळेकर, कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर, कार्यक्रमाचे संयोजक सारंग सराफ, नृपेश गायकवाड, संग्राम बिडलान, महादेव बिद्री उपस्थित होते. 


व्यासपीठातर्फे एकूण ११०० कुटुंबांना धान्याच्या किटची मदत देण्यात येणार आहे. यापूर्वी दगडखाण कामगार, दृष्टीहिन व्यक्ती आणि शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी अशा ७०० कुटुंबांना धान्यरूपी मदत देण्यात आली आहे.


विशाल सोलंकी म्हणाले, पुण्यातील तरुणांनी एकत्र येत माणुसकीचे दूत हे व्यासपीठ तयार केले आणि कोरोना काळात आर्थिक संकट ओढावलेल्या कुटुंबांना मदत करीत आहेत, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांना त्यांच्या पुढील उपक्रमांसाठी अनेक शुभेच्छा. त्याचबरोबर कोरोनाचे हे संकट लवकर संपावे, अशी ईश्वर चरणी प्रार्थना त्यांनी केली. 


सारंग सराफ म्हणाले, शाळा महाविद्यालये बंद असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करणारे बस चालक, शाळेत काम करणारे शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यांना मदतीचा हात देण्याकरीता हा उपक्रम राबविण्यात येत असून दानशूरांनी मदतीकरीता पुढे यावे. आम्ही तरुणांनी एकत्र येऊन हे कार्य हाती घेतले असून सर्वांनी सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.  डॉ. स्वप्नील शेठ यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद माने यांनी आभार मानले.

Related Stories

OBC Reservation : महाविकास आघाडीच्या प्रयत्नांचा विजय – अजित पवार

Archana Banage

ओबीसी नेतृत्व तयार होऊ न देण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा डाव – हंसराज अहिर

Archana Banage

आत्मनिर्भर भारतासाठी युवकांना प्रोत्साहन द्या : राज्यपाल

Archana Banage

मुख्यमंत्री पदावर येताच एकनाथ शिंदेंच्या ‘या’ घोषणा

Abhijeet Khandekar

कोकणात तुरळक पाऊस; विदर्भात थंडी

datta jadhav

आर्थिकदृष्ट्या प्रभावी अर्थसंकल्प

datta jadhav