Tarun Bharat

पुन्हा टाळेबंदी…पाच तालुक्यात शुकशुकाट

निपाणीत सर्व व्यवहार ठप्प : रस्ते पडले ओस : पोलिसांचा विनाकारण फिरणाऱयांवर वॉच

 प्रतिनिधी/  निपाणी

 वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे जिल्हाधिकाऱयांनी निपाणी, अथणी, कागवाड, गोकाक, मुडलगी तालुक्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. बुधवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या पाचही तालुक्यातील शहरी भागात पहिल्या दिवशी शुकशुकाट पहायला मिळाला. 24 मार्चनंतर जाहीर झालेल्या पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनप्रमाणे बुधवारी सर्वत्र चित्र दिसून आले.

 जिल्हय़ात कोरोना नियंत्रणात येत असताना गेल्या महिन्याभरात पुन्हा फैलाव वाढला. अथणीसह निपाणी, गोकाक तालुक्यामध्ये शहरी व ग्रामीण भागात रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. यातच शहरी भागात खरेदीच्या निमित्ताने होणारी गर्दी व नियमांचे उल्लंघन लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी जिल्हय़ातील पाच तालुक्यांमध्ये एक आठवडय़ाचा लॉकडाऊन जाहीर केला. निपाणीत याची काटेकोर अंमलबजावणी झाल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले.

 लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सोमवारी व मंगळवारी निपाणीत खरेदीसाठी गर्दी उसळली होती. बुधवारी मात्र बसस्थानकासह शहरातील सर्वच रस्ते ओस पडल्याचे पहायला मिळाले. संभाजीराजे चौक, नगरपालिका, बेळगाव नाका, चन्नम्मा सर्कल, कोठीवाले कॉर्नर आदी प्रमुख ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दवाखाने, औषध दुकाने, शासकीय कार्यालये, बँका वगळता सर्वच व्यवहार ठप्प असल्याचे पहायला मिळाले.  

ग्रामीण भागात सवलत

एकीकडे निपाणी शहरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होत असताना ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये सकाळच्या सत्रात सर्व व्यवहार सुरू असल्याचे पहायला मिळाले. काही ठिकाणी ग्रामपंचायतींच्या वरदहस्ताने सर्व दुकाने सकाळी 7 ते 10 या वेळेत सुरू होती. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानंतर तहसीलदार प्रकाश गायकवड यांनी तालुक्यात सर्वच ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र ग्रामीण भागात त्याला वाटाण्याच्या अक्षता मिळाल्याचे पहायला मिळाले. शहरात वाहनधारक, नागरिकांची मोठी वर्दळ होत होती. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देश्याने शहरी भागात कडक लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण सापडले आहेत. हे लक्षात घेऊन आठवडाभर लॉकडाऊनची अंमलबजावणी शहराबरोबरच ग्रामीण भागातही काटेकोरपणे व्हावी, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Related Stories

भुतरामहट्टी जवळ अपघातात तरुणाचा मृत्यू

Tousif Mujawar

सदाशिवनगरमधील ‘त्या’ अतिक्रमणावर कारवाई

Amit Kulkarni

माहेश्वरी समाजाचा प्र-वर्गात समावेश करा

Amit Kulkarni

चोरीप्रकरणी हुनशीकट्टी येथील युवकाला अटक

Patil_p

कंत्राटी सफाई कर्मचाऱयांचे 1 जुलैपासून कामबंद आंदोलन

Amit Kulkarni

मुंगेत्री नदीच्या अस्तित्वासाठी नियोजन करण्याची गरज

Amit Kulkarni