बेळगावसह महाराष्ट्र-केरळ सीमेवरील आठ जिल्हय़ांमध्ये निर्बंध : दुपारी 2 पर्यंत आवश्यक वस्तूंच्या विक्री : रात्री 9 पासून कर्फ्यू


प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा कठोर निर्बंध जारी केले आहेत. महाराष्ट्र आणि केरळ राज्यांच्या सीमेवर असणाऱया बेळगावसह विजापूर, गुलबर्गा, बिदर, मंगळूर, चामराजनगर, म्हैसूर आणि कोडगू या आठ जिल्हय़ांमध्ये विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 9 ते सोमवारी पहाटे 5 या कालावधीत तो लागू असेल. मात्र, पहाटे 5 ते दुपारी 2 पर्यंत अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, मांस, भाजी-फळे, दूध विक्रीला मुभा असणार आहे. तसेच हॉटेल आणि बारमध्ये केवळ पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आली आहे. सरकारी व खासगी बसेस केवळ अत्यावश्यक सेवांसाठी उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, नाईट कर्फ्यूच्या कालावधीत बदल करण्यात आला असून तो रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत असणार आहे. यासंबंधीची मार्गसूची 16 ऑगस्टपर्यंत जारी राहील.
राज्यातील काही जिल्हय़ांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. शेजारील महाराष्ट्र आणि केरळमध्ये संसर्ग अधिक आहे. तज्ञांनी देखील कोरोनाची तिसरी लाट सुरू होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शुक्रवारी कोविड टास्क फोर्स आणि विविध खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी राज्याच्या सीमेवरील जिल्हय़ांमध्ये विकेंड कर्फ्यू आणि संपूर्ण राज्यात दररोज नाईट कर्फ्यू जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, आगामी दिवसांत कोरोना पॉझिटिव्हिटी दरात वाढ होईल की कमी होईल?, याविषयी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला आहे. केरळ आणि महाराष्ट्र सीमेवरील जिल्हय़ांमध्ये विकेंड कर्फ्यू आणि राज्यभरात नाईट कर्फ्यू रात्री 10 ऐवजी 9 पासून जारी केला जात आहे. नाईट कर्फ्यूची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना पोलीस महासंचालकांना दिल्याचे ते म्हणाले.
आवश्यक सेवांनाच परवानगी
विकेंड कर्फ्यूसंबंधीची मार्गसूची सायंकाळी जारी करण्यात आली. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी सकाळी 5 ते दुपारी 2 पर्यंतच किराणा दुकाने, फळे-भाजी विक्री, दूध विक्री करता येणार आहे. तर हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सेवा उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे मद्यविक्रीला परवानगी असली तरी बारमध्ये बसून मद्यप्राशन करता येणार नाही. मद्य देखील पार्सल स्वरुपात विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा असणारे मेडिकल, हॉस्पिटल, विमानसेवा, रेल्वे, प्रवासी वाहतूक आदी पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. विमान, रेल्वेस्थानकापर्यंत प्रवासी किंवा खासगी वाहनाने जाण्याची मुभा आहे. त्यासाठी तिकीट व इतर माहिती सादर करावी लागेल. कारखाने, कंपन्या, संस्था सुरू राहणार असून कामगारांनी कामावर जाण्यासाठी स्वतःजवळ कंपनीचे ओळखपत्र बाळगणे बंधनकारक असणार आहे.
धार्मिक स्थळी पूजा करण्यास परवानगी
यापूर्वी निश्चित झालेल्या विवाह समारंभांना परवानगी आहे. मात्र, 100 पेक्षा अधिक जणांची उपस्थिती असू नये, असे मार्गसूचीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तर अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. अधिक लोकांची गर्दी होणारे जत्रा, उत्सव, मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रम, मिरवणूक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, सभांना विकेंड कर्फ्यू कालावधीत परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, सर्व धार्मिक स्थळी पूजा करण्यास परवानगी असणार आहे.