Tarun Bharat

पुरळला झाले आगळे ‘शुभमंगल सावधान’

ग्रामपंचायतीमध्ये झाला लग्न सोहळा : लग्नाचा खर्च कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी

प्रशांत वाडेकर / देवगड:

कोरोनामुळे देशभरात झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रात दिसून येत आहे. कोरोनामुळे लग्नसराईचा काळही यामध्ये निघून गेला. अनेकांना ठरलेली लग्नं पुढे ढकलावी लागली. असे असताना देवगड तालुक्यातील पुरळ ग्रामपंचायतीने पुढाकार घेत लॉकडाऊनमध्ये रखडलेला एक लग्न सोहळा ग्रामपंचायत कार्यालयातच पार पाडला. लग्न सोहळय़ासाठी होणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचे नवदांपत्याने जाहीर केले. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पुरळ ग्रामपंचायतीने सिंधुदुर्ग जिल्हय़ात एक वेगळा आदर्श निर्माण केला.

पुरळ गावचे सरपंच सुनील तेली व ग्राम समितीच्या पुढाकाराने गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयातच ‘शुभमंगल’ झाले. लॉकडाऊनमुळे पुरळ-हुर्शी येथील शशिकांत गणपत थोटम यांच्या मुलाचे लग्न रखडले होते. एके दिवशी शशिकांत थोटम यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सरपंच सुनील तेली यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कैफियत मांडली. त्यानंतर सरपंच तेली, उपसरपंच विकास देवळेकर, तलाठी डांगे, ग्रामसेवक एन. आर. तांबे व ग्रा. पं. सदस्य, कोरोना सनियंत्रण ग्राम कमिटीचे बाळू मुळम व त्यांच्या सदस्यांनी याबाबत पुढाकार घेऊन ग्रामपंचायत कार्यालयातच लग्न सोहळा आयोजित करण्याचे ठरविले. यासाठी चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या संकटात मोठय़ा लग्न सोहळय़ासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा साधेपणात ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हा लग्न सोहळा पार पाडूया. मोठय़ा लग्न सोहळय़ासाठी करण्यात येणाऱया खर्चाची रक्कम तुम्ही कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शासनाला द्या, अशी प्रबोधन वजा विनंती सरपंच व ग्राम समितीने मुलाच्या व मुलीकडील नातेवाईकांना केली. मुलाचे वडील शशिकांत थोटम व तिर्लोट-केरपोई येथील मुलीचे वडील भगवान भगवान माळगवे यांनी सरपंच, ग्रामसमितीच्या विनंतीला मान देऊन आपल्या मुलांचा लग्न सोहळा साधेपणात आणि तेही ग्रा. पं. कार्यालयात करण्याचे ठरविले.

तहसीलदारांनी दिली परवानगी

11 जून रोजी सकाळी 9.30 वा. मुहुर्त ठरला. लग्नासाठी लागणारी परवानगी सरपंच तेली यांनी तहसीलदार मारुती कांबळे यांची भेट घेऊन घेतली. मुलीकडील दहा व मुलाकडील दहा माणसे अशी 20 माणसेच लग्नासाठी उपस्थित ठेवून व सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटींवर तहसीलदारांनी या लग्नसोहळय़ाला परवानगी दिली. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळून लग्न करण्याची सर्व तयारी झाली.

ग्रा. पं. कार्यालयात उरकला लग्नसोहळा

गुरुवारी पुरळ-हुर्शी येथील वर चि. अक्षय थोटम व तिर्लोट येथील वधू चि. सौ. कां. पूजा यांचा सकाळी 9.30 वाजण्याच्या शुभमुहुर्तावर दोन्हीकडील मिळून 20 वऱहाडी लग्न सोहळय़ाला उपस्थित होती. लग्नाचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले. यावेळी तिर्लोट सरपंच राजन गिरकर हेही उपस्थित होते. लग्न सोहळय़ामध्ये सर्वजण मास्क वापरून व सोशल डिस्टन्सिंग पाळले होते. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून पुरळ ग्रामपंचायतीने एक वेगळा पायंडा पाडून एक नवा आदर्श जिल्हय़ासमोर ठेवला.

Related Stories

रत्नागिरीत लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी, वृध्दांना चक्कर

Patil_p

एन. एम. एम .एस परीक्षेत ओटवणे हायस्कूलचे सुयश

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : पूरमुक्त साखरप्यासाठी ‘नाम’चा पुढाकार!

Archana Banage

जिह्यात कोरोनाचे तब्बल 155 नवे रूग्ण!

Patil_p

हुमरमळा येथे 2 कोटीची दारू जप्त

NIKHIL_N

रत्नागिरीत 15 ते 18 वयोगटातील 1774 मुलांचे लसीकरण

Patil_p