पुलाची शिरोली/प्रतिनिधी
पुलाची शिरोली सह परिसरात डेंग्यू सदृश्य आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. यामुळे नागरीकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा मुकाबला करण्यासाठी शिरोली ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिरोली व नागाव परिसरात डेंग्यू तापाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अनेक रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार करून घेत आहेत. शिरोली ग्रामपंचायत प्रशासन विभागाने कोरडा दिवस पाळण्यासाठी पाणी पुरवठा बंद केला होता. तसेच फाॅगिंग मशिन द्वारे प्रभागवार औषध फवारणी सुरू केली आहे. तसेच कर्मचारी वर्ग घरोघरी जाऊन पाण्याची भांडी कोरडी करण्यास आवाहन करीत आहेत. तसेच खराब टाय, प्लास्टीक बाॅटल व पिशव्या नष्ट करण्याच्या सुचना देत आहेत.
तर शिरोली आरोग्य केंद्राच्या आशा स्वंयसेविका व आरोग्य सेवक घरोघरी जाऊन पाणी स्वच्छ होणारे औषध, फ्रिजच्या आऊटलेटची स्वच्छता, तसेच घ्यावयाची काळजी आदी बाबत मार्गदर्शन करण्यासाठी घरोघरी पोहचत आहेत. तसेच सरपंच शशिकांत खवरे, ग्रामविकास अधिकारी एस.एस.कठारे , वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका ॲन्ड्रूस यांनी नागरीकांना डेंग्यू आजाराबाबत जनजागृती व दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. एकूणच कोरोना आजारामुळे हैराण झालेल्या नागरीकांची डेंग्यू आजारामुळे झोप उडाली आहे.


previous post
next post