वृत्तसंस्था/ कतार
इराणचा एकमेव गोलने पराभव करून अमेरिकेने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम 16 संघात स्थान मिळविले. अल-थुमामा स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात अमेरिकेचा विजयी गोल खिस्तियान पुलिसिकने केला. या विजयाने अमेरिकेला 3 गुण प्राप्त झाले.
या सामन्यापूर्वी अमेरिकेने वेल्सला 1-1 आणि इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. इंग्लंडकडून 6-2 असा दारुण पराभव स्वीकारल्यानंतर इराणने आपल्या दुसऱया लढतीत वेल्सचा 2-0 असा पराभव करून या गटातून दुसरे मिळविण्यासाठी चुरस निर्माण केली होती. मात्र दोन सामन्यांतून दोन गुणांची कमाई केलेल्या अमेरिकेने आपल्या शेवटच्या लीग सामन्यात इराणवर मात केली व विजयाच्या तीन गुणांनी आपण गुणसंख्या पाचवर नेऊन गटात दुसरे स्थान मिळविले व स्पर्धेची ‘नॉकआऊट’ फेरी गाठली. आता उप-उपान्त्यपूर्व फेरीत अमेरिकेची गाठ नेदरलँडशी होईल.
पूर्ण सामन्यात अमेरिकेने इराणवर वर्चस्व राखले. सामन्यातील पहिली धोकादायक चाल रचली ती मात्र इराणने. यावेळी सामन्याच्या 9 व्या मिनिटाला त्यांच्या सरदार आझमौनने अमेरिकेच्या ‘डी’ कक्षेत प्रवेश मिळविला. मात्र यावेळी अमेरिकेच्या बचावळीने केलेल्या उत्कृष्ट बचावामुळे त्याला फटका हाणता आला नाही.
त्यानंतरच्या पहिल्या सत्रातील खेळावर अमेरिकेचीच छाप राहिली. त्यांनी 7 फटके ‘ऑन टार्गेट’ हाणले. प्रथम जोश सार्जंटने दिलेल्या पासवर तिमोथी वेहचा फटका सरळ गोलरक्षकाच्या हातात गेला. सामन्याच्या 38 व्या मिनिटाला अमेरिकेने विजयी गोलाची नोंद केली. मिडफिल्डमधून मॅकिनीने चेंडूचा ताबा घेत केलेल्या क्रॉसवर डॅस्टने हेडरने पुलिसिकला दिला. त्याने चेंडूवर अचूक नियंत्रण ठेवत चेंडूला गोलमध्ये टाकले.
या गोलनंतर अमेरिकेला आपली आघाडी वाढविण्याची संधीही मिळाली होती. मात्र यावेळी त्यांचे जोश सार्जंट व तिमोथी वेह हे मोक्याच्या क्षणी गोल करण्यास असमर्थ ठरले. मध्यंतराच्या ठोक्याला तर जोशने केलेला गोल ‘ऑफसाईड’ ठरवण्यात आला. अमेरिकेच्या मिडफिल्डर्स वेस्टन मॅकिनी आणि डॅस्ट यांनी चांगला खेळ केला व दोन्ही बगलेतून आपल्या स्ट्रायकर्सना चांगले चेंडू पुरविले.
दुसऱया सत्रात इराणचे आरंभाच्या खेळावर काही प्रमाणात वर्चस्व दिसले. प्रामुख्याने समान घोड्डोसच्या समावेशानंतर त्यांचा खेळ काही प्रमाणात बहरला. अशाच एक यत्नात त्याचा गोल करण्याचा प्रयत्नही हुकला. 71 व्या मिनिटाला अमेरिकेच्या मुसाहचा फ्री किकवर गोलबारवरून गेला. शेवटच्या पंधरा मिनिटांच्या खेळात अमेरिकेने चार बदल केले. आठ मिनिटांच्या इंज्युरी खेळात इराणला गोल बाद करण्यात अपयश आले व त्यांना स्पर्धेतून गारद व्हावे लागले.