Tarun Bharat

पूरग्रस्तांचे 50 एकरात पुनर्वसन

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची घोषणा : संकेश्वर येथे पूरस्थितीची पाहणी : नुकसानीचा सर्व्हे करून भरपाई देण्याचे आदेश

प्रतिनिधी /संकेश्वर

महापुरामुळे येथील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याची दखल घेत कायमस्वरुपी यावर तोडगा काढण्यासाठी येथील 630 कुटुंबांचे 50 एकर जागेत पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासंबंधी तसा आदेश आपण जिल्हाधिकाऱयांना दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली. रविवारी त्यांनी संकेश्वरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून येथील शंकरलिंग भवनातील निवारा केंद्राला भेट देऊन पूरग्रस्त कुटुंबीयांची विचारपूस केली. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री येडियुराप्पा पुढे म्हणाले, सन 2019 सालीही या भागाला महापुराचा मोठा फटका बसला होता. त्यावेळीही आपण आपल्या भेटीसाठी येताना योग्य ती नुकसान भरपाई आपल्यापर्यंत पोहचवली होती. पण महापुराचे तांडव असे वारंवार येण्याची शक्यता आहे. त्यातून आपले जीवन असहय़ होऊ नये, यासाठी आपल्याला कायमस्वरुपी सुरक्षित निवारा मिळवून देण्यासाठी सोलापूर हद्दीत घेतलेल्या 50 एकर जमिनीत येथील पूरग्रस्त 630 कुटुंबियांना हक्काचे घरकुल उभे करून पुनर्वसन करण्यात येणार आहे. शिवाय पूरग्रस्तांना कपडे, जेवण व राहण्याची सोय निवारा केंद्रात केली जाणार आहे. पाऊस थांबताच झालेल्या नुकसानीचा सर्व्हे तातडीने करून भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पूरस्थितीला धैर्याने तोंड द्या!

पूरग्रस्तांनी घाबरुन जाऊ नये, धैर्याने संकटाला तोंड द्यावे, आम्ही तुमच्या पाठिशी सदैव आहोत, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. रविवारी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे संकेश्वरात आगमन झाले. त्यांनी आपल्या ताफ्यासह गांधी चौक लक्ष्मी मंदिरानजीक असलेल्या बंधाऱयाला भेट देऊन पुराचा फटका बसलेल्या घरांची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, लक्ष्मण सवदी, मंत्री आर. अशोक, उमेश कत्ती, नगराध्यक्षा सीमा हत्तनूरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, भाजप चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजेश नेर्ली, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हत्तनूरी, अमर नलवडे, संजय नष्टी, संजय शिरकोळी, स्थायी समिती अध्यक्ष सुनील पर्वतराव, गजानन क्वळ्ळी, शंकर हेगडे, पुष्पराज माने, शिवशंकर ढंग, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत मुन्याळ, अशोक गुराणी, तहसीलदार डॉ. शिवानंद हुगार व मुख्याधिकारी जगदीश ईटी आदी उपस्थित होते.

पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देणार,यमगर्णी, कोडणी गावांना मुख्यमंत्र्यांची भेट : निवारा केंद्रांना भेट देऊन विचारपूस

संततधार पावसामुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. निपाणी-चिकोडी तालुक्मयाला पूरस्थितीचा मोठा फटका बसला आहे. पूरस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा पूरग्रस्तांना मदतनिधी देण्याबरोबरच पुनर्वसन करणे गरजेचे आहे. याची गांभीर्याने दखल घेतली आहे. सदर नुकसानीचा सर्व्हे करून सर्व पूरग्रस्तांना अधिकाधिक नुकसान भरपाई देणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी रविवारी पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी बेळगाव जिल्हा दौरा केला. याप्रसंगी त्यांनी निपाणी तालुक्मयाला भेट देताना यमगर्णी व कोडणी या वेदगंगा काठावरील दोन गावांमध्ये जाताना पूरस्थितीचा आढावा घेतला. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या महापुराची पाहणी करून माहिती घेतली.

यमगर्णा व कोडणी येथील निवारा केंद्रांना भेट देताना तेथे असणाऱया पूरग्रस्तांची विचारपूस केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे अभियंते सी. डी. पाटील यांनी महापुराची स्थिती, वाढलेली पाणीपातळी, धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग आणि पडलेला पाऊस याची संपूर्ण माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले, कर्नाटक शासन पूरग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार आहे. पूरस्थितीची माहिती केंद्र शासनाला पाठवून केंद्राकडूनही मदत मिळवण्याचा आपला प्रयत्न राहील. ऊस व सोयाबीन अशा पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱयांना आर्थिक मदत दिली जाईल. घरकुलांची नुकसान भरपाईदेखील दिली जाणार आहे, असे सांगितले. यावेळी विधानपरिषदेतील मुख्य पक्षप्रतोद आमदार महांतेश कवठगीमठ यांनी देखील मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना पूरस्थितीची माहिती देताना पूरग्रस्तांना लवकरात लवकर निधी मंजूर करण्याची विनंती केली.

यावेळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, पालकमंत्री गोविंद कारजोळ, महसूल मंत्री आर. अशोक, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश नेर्ली, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम. पी. पाटील, संचालक पप्पू पाटील, अविनाश पाटील, समित सासणे, सिद्धू नराटे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा निता बागडे, नगरसेवक राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, विनायक वडे, प्रणव मानवी, बंडा घोरपडे, राजू कानडे, सदाशिव बुदिहाळे, ज्ञानदेव खवरे, ग्रा. पं. अध्यक्षा ललिता तोरणे, जयश्री पोवार, उपाध्यक्ष राजू खवरे, प्रवीण कांबळे, नासिरखान इनामदार, रवींद्र खोत, विठ्ठल नाईक, विठ्ठल कोले, सुनील खवरे, के. डी. कुंभार, उत्तम बोरगावे, रिजवान सय्यद, पिंटू पोवार, अरुण पोवार, महेश डोळे यांच्यासह ग्रा. पं. सदस्य, पूरग्रस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

जीएसएसतर्फे वन्यजीव सप्ताहाला प्रारंभ

Omkar B

राणी चन्नम्मा नगरातील रस्त्यांची झाली वाताहत

Patil_p

कॅन्टोन्मेंटच्या पथदिपांचा विद्युत पुरवठा बंद

Amit Kulkarni

पाकचे सहा खेळाडू नव्या चाचणीत ‘निगेटिव्ह’

Patil_p

मुसळधार पावसाने कोसळलं घर

mithun mane

दहा दिवस उलटले…बिबटय़ाची प्रतीक्षाच

Patil_p