Tarun Bharat

पूरग्रस्तांना दोन महिन्यात घरे

कमी नुकस्तांना 50 हजारांपासून 1 लाख पर्यंत मदत / बळी गेलेल्या प्रत्येक कुटंबास सानुग्रह चार लाख / शेती, बागायती नुकसाग्रस्तांना देणार मदतीचा हात

प्रतिनिधी / पणजी

संपूर्ण घर कोसळून सर्वस्व गमावलेल्या प्रत्येक पूरग्रस्ताला दोन महिन्यांच्या आत पक्के घर बांधून देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. याकामी रोटरी डिस्ट्रिक्ट इंटरनॅशनलनेही मदतीचा हात पुढे केला असून त्यांच्याच संयुक्त विद्यमाने ही घरे बांधून देण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. महापुरात एकूण 93 घरे पूर्णतः कोसळल्याची माहिती त्यांनी दिली.

दि. 23 जुलै रोजी राज्याच्या विविध भागांना तडाखा दिलेल्या महापुरात घरे गमावलेल्या लोकांना मदतनिधी वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. संपूर्ण घर कोसळलेल्यांना प्रत्येकी दोन लाख, त्यापेक्षा कमी नुकसान झालेल्यांना प्रत्येकी एक लाख ते 50 हजार, तसेच बळी गेलेल्यांच्या कुटुंबास प्रत्येकी चार लाख, त्याशिवाय शेती-बागायती आणि अन्य मालमत्तेचे नुकसान झालेल्यांनाही योग्य भरपाई देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

काल गुरुवारी पणजीतील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित या कार्यक्रमास आरोग्यमंत्री विश्वजित राणे, साबांखामंत्री दीपक पाऊसकर, रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड, कन्व्हेनर सचिन मनसे यांची उपस्थिती होती. त्याशिवाय उपस्थितांमध्ये रोटरी क्लबचे अजय मेनन, राजेश साळगावकर यांच्यासह उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, मामलेदार, तलाठी, आपत्ती व्यवस्थापन खात्याचे अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

रोटरी क्लबचीही मिळणार मदत

1982 मध्ये आलेल्या महापुरानंतर आजपर्यंत म्हादई, मांडवी, वाळवंटी या नद्या एवढय़ा कोपलेल्या कधीच पाहिल्या नव्हत्या. दि. 23 रोजी जसा काही निसर्गच कोपला आणि या नद्यांनी रौद्ररूप घेतले. त्यांच्या या तांडवात काठावर राहणाऱया लोकांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्थ झाले. त्यांनी सर्वस्व गमावले. राज्यात दोघांचे बळीही गेले. आता या संकटाचा तडाखा सोसलेल्या लोकांपुढे संपूर्ण संसार पुन्हा नव्याने उभा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी कर्तव्यभावनेने सरकार त्यांना पाठबळ देणार आहे. त्यात रोटरी क्लबनेही मदतीसाठी पुढाकार घेतला असून स्वतःचा दोन लाख मदतनिधी घालून प्रत्येकाला चार लाखात घर बांधून देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विविध खात्यांच्या तत्परतेचा गौरव

पूरग्रस्तांची सुरक्षा आणि जीवितहानी टाळण्यासाठी सर्व नौदळ, पोलीस, अग्निशामक दल यासारख्या खात्यांनी दाखविलेली तत्परता आणि केलेल्या कार्याचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. याकामी आपत्ती व्यवस्थापन खात्याचा त्यांनी खास उल्लेख केला. राज्यात प्रथमच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरही वापरण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वतःचे घर कोसळताना पहावे लागण्याचे दुःख

स्वतःचे घर कोसळताना पहावे लागणे यासारखे दुःख नसते. परंतु पुरामुळे राज्यातील अनेकांच्या नशिबी तो प्रसंग आला. कुंभारवाडा पाळी येथे आपण स्वतःही असे एक घर कोसळताना पाहिले आणि ज्यांची घरे कोसळली त्यांच्या भावनांची कल्पना आपणासही आली. म्हणुनच या सर्वांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी अगदी दुसऱयाच दिवसापासून सर्व कर्मचाऱयांना अविरत कामाला लावले. म्हणुनच विधानसभेत आश्वासन दिलेल्या तारखेपूर्वीच प्रत्येकाच्या बँक खात्यात मदतनिधी जमा करणे शक्य झाले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात प्रथमच तत्परतेने मदतनिधी

गोव्याच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे एवढय़ा तत्परतेने मदतनिधी देण्यात आल्याचेही ते म्हणाले. महापुरात एकूण 93 घरे पूर्णतः कोसळली असून राज्य सरकार व रोटरीच्या सहकार्याने पुढील दोन महिन्यात सर्वांना घरे बांधून देण्यात येतील, असे सांगून याकामी आपग्रस्तांनीही सहकार्य करावे, तसेच उर्वरित नुकसानग्रस्तांना प्राप्त मदतनिधीचा त्यांनी स्वतःच्या आवश्यकतेनुसार वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

अजून कुणीही पुरग्रस्त असल्यास संपर्क करावा

या कार्यक्रमात काही नुकसानग्रस्तांना प्रातिनिधिक स्वरुपात मदतीची मंजूरीपत्रे देण्यात आली. उर्वरित लोकांना त्यांच्या संबंधित परिसरात जाऊन मदतीचे धनादेश वितरित करण्यात येतील. पुराचा तडाखा बसलेल्यापैकी एकसुद्धा कुटुंब मदतीविना राहणार नाही याची दखल सरकार घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच तरीही कुणी राहिले असतील तर त्यांनी स्थानिक तलाठय़ाशी संपर्क करावा, असे आवाहन केले.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे, दीपक पाऊसकर यांनीही यावेळी विचार मांडले. डिचोलीचे मामलेदार प्रविणजय पंडित यांनी स्वागत केले. दत्तप्रसाद जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सांखळी मतदारसंघातील चावडी, खाजन, भामई, सत्तरी, यासह अन्य विविध भागातील पूरग्रस्तांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते मदतनिधी वितरित करण्यात आला.

Related Stories

कोलवेकर यांचा विजय हा भाजपासाठी योग्य धडा

Amit Kulkarni

भाजपकडून गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांचा निषेध

Omkar B

राजेश फळदेसाई यांचा वाढदिवस उत्साहात

Amit Kulkarni

दाबोळी विमानतळासमोरील उड्डाण पुलाचे काम पूर्ण, मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून पाहणी

Omkar B

भूमिपुत्र विधेयक राज्यपालांकडे संमतीसाठी पाठविणार नाही : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

कवळेत गोदाम-घराला भीषण आग

Amit Kulkarni