प्रतिनिधी / शिरोळ
पूरग्रस्त नागरिकांना सरकार सर्वतोपरी मदत करणार असून कुणीही वंचित राहणार नाही. पूर ओसरल्यानंतर तातडीचे पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर, कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवल्यामुळे अलमट्टी धरणाचा विसर्ग केला जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.
शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका मोठ्या प्रमाणांत बसला आहे. याठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी सकाळी आठ वाजता पद्माराजे विद्यालयात पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन विचारपूस केली. व झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शहरातील जनता हायस्कूल व अर्जुनवाड या भागांना भेटी दिल्या. यावेळी अर्जुनवाड ते शिरोळ सुरू असलेल्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे याकरिता मोरी वजा पुलाचे बांधकाम करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी पवार यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित आदेश दिले. तर, जनावरांच्या चारा करीता साखर कारखान्यांनी चारा उपलब्ध करण्याचा आदेशही दिला.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजू बाबा आवळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक एस एम लोहिया, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, माजी आमदार उल्हास पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे- धुमाळ, गट विकास अधिकारी शंकर कवितके, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने आदी उपस्थित होते.


next post