शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी : प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये संताप


प्रतिनिधी /बेळगाव
कोणतीही पूर्वसूचना न देता पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने मंगळवारी अचानक ठिकठिकाणी रस्ते बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. परिणामी शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी झाल्याने नागरिक वैतागून गेले. विधानपरिषदेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने बॅरिकेड्स ठेवून रस्ते अडविले. मात्र त्याची कोणतीही पूर्वकल्पना प्रशासनाने नागरिकांना दिली नव्हती. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
बेळगाव शहराच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यातच वाहनांची प्रचंड गर्दी, वाहतुकीचे धाब्यावर बसविले जाणारे नियम, वाहनधारकांना अडवून कागदपत्रांच्या तपासणीतच धन्यता मानून वाहतुकीला शिस्त लावण्याकडे झालेले वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, यामुळे शहरातील वाहतूक समस्येवर आणि वाहतूक कोंडीवर दीर्घकाळापासून कोणतीच ठोस उपाययोजना झालेली नाही.
पहिल्या रेल्वेगेटजवळ बॅरिकेड्स घालून प्रवाशांची गैरसोय करण्यात आली आहे. त्याठिकाणी सतत आंदोलन करून बॅरिकेड्स हटविण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा बॅरिकेड्स हलवणार नाही, परंतु त्या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमले जातील, सिग्नल्स बसविले जातील, अशी सर्व आश्वासने देण्यात आली.
खडेबाजार, मारुती गल्ली, गणपत गल्ली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगला शिस्त लावली जाईल व जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाहीसुद्धा वाहतूक पोलीस खात्याने दिली. परंतु चर्चेव्यतिरिक्त काहीच निष्पन्न झाले नाही. नाटक दोन दिवसांचे व समस्या कायमची याचा अनुभव बेळगावकरांना वारंवार येत आहे.
निवडणूक असो, वा मंत्र्यांचे दौरे, दरवेळी कोणतीही पूर्वसूचना न देताच बॅरिकेड्स घालून रस्ते बंद केले जातात. मंगळवारी अचानक रस्ते बंद केले गेले. त्यामुळे शाळेची वर्दी करणाऱया रिक्षाचालकांची, बसचालकांची गैरसोय झाली. त्यांना वळसा घालून यावे लागले. प्रवाशांनी मात्र त्यांच्यावर राग काढला. बस वळसा घालून येत असल्याने नागरिकांना कॅम्प परिसरात उतरावे लागले. पण तेथून येण्यासाठी रिक्षा करण्यापलीकडे पर्याय नव्हता. एकूणच वेळेचा अपव्यय, रिक्षाला द्यावे लागलेले दुप्पट भाडे आणि निष्कारण मनस्ताप याबद्दल प्रवाशांनी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या नावाने शिमगाच केला.
जिल्हा प्रशासनाने दखल घेणे गरजेचे
कोरोनानंतर आता कोठे सर्व जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव आपला व्यवसाय, दुकाने बंद राहणार नाहीत, यावर प्रत्येकाचाच कटाक्ष आहे. अशावेळी रस्ते अडविल्याने नागरिक बाजारपेठेत येण्यास तयार नसतात आणि त्याचा नकळतपणे व्यवसायावर परिणाम होतो. तेव्हा जिल्हा प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी आणि यापुढे रस्ते अडविताना पूर्वकल्पना द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.