Tarun Bharat

पूर्व वर्धमान -तृणमूलचा प्रभाव ओसरतोय

8 मतदारसंघांमधील धुवीकरण भाजपच्या बाजूने – कटमनीशिवाय कामे होत नसल्याची लोकांची तक्रार

कटमनी (लाच) दिल्यास कुठलेच काम होत नसल्याची तक्रार पश्चिम बंगालमधील सर्वसामान्यांची आहे. तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त होत लोक आता भाजपकडे एक नवा पर्याय म्हणून पाहत आहेत. पण या लोकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविषयी संताप नाही. याचमुळे तृणमूल काँग्रेस अद्याप लढतीत कायम आहे, पण त्याला प्रत्येक मतदारसंघात भाजपकडून तीव्र आव्हान मिळत आहे.

पूर्व वर्धमान जिल्हय़ात 8 मतदारसंघ आहेत. खंडाघोष, वर्धमान दक्षिण, रैना, जमालपूर, मंतेश्वर, कालना, मेमारी आणि वर्धमान उत्तर या ठिकाणी 17 एप्रिल रोजी मतदान पार पडले आहे. एकेकाळी माकपचा गड राहिलेल्या वर्धमान जिल्हय़ाने ममता बॅनर्जी यांनाही प्रचंड पाठिंबा दिला, पण यंदा येथील राजकारणावर भगव्या रंगाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला आहे. तृणमूलच्या स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी, हिंदू-मुस्लीम ध्रूवीकरण आणि भाजपला एक संधी देण्याचा विचार या तीन गोष्टींमुळे लोकांचा भाजपकडील ओढा वाढला आहे. वर्धमानमध्ये शहरी भागात तृणमूल तर ग्रामीण भागात भाजपचा प्रभाव दिसून आला आहे.

बाउरी समुदाय भाजपसोबत

जिल्हय़ातील मागास समुदाय प्रथम माकपला मतदान करत होता. पण आता हा समुदाय भाजपच्या दिशेने वळला आहे. अनुसूचित जातीत मोडणाऱया बाउरी समुदायादरम्यान भाजपने मागील काही वर्षांमध्ये स्वतःचा मोठा प्रभाव निर्माण केला आहे. तृणमूलचे नेते वातानुकुलित कार्यालयांमध्ये रमले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे कार्यकर्ते मागास समुदायांना स्वतःसोबत घेण्यासाठी काम करत होते. मागास समुदायादरम्यान स्वतःचे स्थान निर्माण करण्यात तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये आलेल्या मुकुल रॉय यांनी मोठी भूमिका बजावली आहे. भाजपमध्ये आल्यावर त्यांनी या भागातील मागास समुदायादरम्यान सभा घेण्यास सुरुवात केली होती, याचा प्रभाव आता तळागाळात दिसून येत आहे.

भाजपचे पारडे जड

राजकीय जाणकारांनुसार वर्धमान दक्षिण, खंडाघोष आणि मेमोरीमध्ये तृणमूल काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊ शकतो. तर उर्वरित मतदारसंघांमध्ये भाजप मजबूत स्थितीत दिसून येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने वर्धमान जिल्हय़ातील 4 पैकी 2 मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. तर उर्वरित दोन मतदारसंघांमध्येही लक्षणीय मते मिळविली होती.

Related Stories

कोरोना वॉरियर्सवर समाजकंटकांचा हल्ला

Patil_p

इलेक्ट्रिक कार्सवर 1 लाख रुपयांची सूट

Amit Kulkarni

राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी

datta jadhav

15 वर्षे जुनी शासकीय वाहने जाणार भंगारात

Amit Kulkarni

देशात आणखी 18 हजार बाधित

datta jadhav

‘योद्धय़ां’ना 13 रोजी लसीचा दुसरा डोस

Patil_p