Tarun Bharat

पॅरा-पॉवरलिफ्टर सुधीरला ऐतिहासिक सुवर्ण

Advertisements

मुरली श्रीशंकरला लांब उडीत रौप्य, भाविना पटेल अंतिम फेरीत कुस्ती-मुष्टियुद्धात घोडदौड कायम

बर्मिंगहम / वृत्तसंस्था

पॅरा-पॉवरलिफ्टर सुधीरने पुरुषांच्या हेविवेट फायनलमध्ये गुरुवारी ऐतिहासिक सुवर्ण जिंकले. त्याने 212 किलोग्रॅम वजनाच्या सर्वोत्तम लिफ्टसह हा पराक्रम गाजवला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या रोमांचक फायनलमध्ये त्याने नायजेरियाच्या ओबिचुकूचा अवघ्या 0.9 गुणफरकाने पराभव केला. ओबिचुकूने 133.6 गुण मिळवले तर सुधीरने 134.5 गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला.

सुधीरने 208 किलोग्रॅम लिफ्टसह जोरदार सुरुवात केली आणि 132.0 गुणांची कमाई केली. त्यानंतर दुसऱया प्रयत्नात त्याने 212 किलोग्रॅम लिफ्टसह 134.5 गुण मिळवले. तिसऱया व शेवटच्या प्रयत्नात त्याला 217 किलोग्रॅम वजन लिफ्ट करता आले नाही. पण, यानंतरही त्याने 134.5 गुणांसह सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली.

तत्पूर्वी, अन्य भारतीय पॅरा-पॉवरलिफ्टर्स पदक जिंकण्यात अपयशी ठरले. मनप्रीत कौरने 87 किलोग्रॅमच्या यशस्वी लिफ्टसह 88.6 गुण मिळवले. त्यानंतर दुसऱया लिफ्टमध्ये 88 किलो लिफ्टसह 89.6 गुण मिळवले. मात्र, तिसऱया प्रयत्नात तिला 90 किलोग्रॅम लिफ्टमध्ये अपयश आले. महिला पॅरा पॉवरलिफ्टर मनप्रीत कौर व सकिना खातून यांना चौथे व पाचवे स्थान मिळाले तर पुरुषांमध्ये  परमजीत कुमारही फारशी चमक दाखवू शकला नाही.

मुरली श्रीशंकरचेही ऐतिहासिक यश

पुरुषांच्या लांब उडी इव्हेंटमध्ये मुरली श्रीशंकरने रौप्य जिंकत भारताला ऍथलेटिक्समधील दुसरे पदक मिळवून दिले. 23 वर्षीय राष्ट्रीय विक्रमधारक मुरलीने पाचव्या प्रयत्नात 8.08 मीटर्सची उडी घेतली आणि याच बळावर तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला. बहामाजच्या लॅक्यून नैर्नने या इव्हेंटमध्ये सुवर्ण जिंकले. लॅक्यूनची सर्वोत्तम झेप 8.08 मीटर्स इतकीच होती. पण, त्याची 7.98 मीटर्सची दुसरी सर्वोत्तम झेप अधिक सरस ठरली. श्रीशंकरची दुसरी सर्वोत्तम झेप 7.84 मीटर्स इतकी होती. नियमाप्रमाणे दोन ऍथलिटनी एकाच अंतराची झेप घेतल्यास त्यांची दुसऱया क्रमांकाची सर्वोत्तम झेप विचारात घेतली जाते. यानुसार, लॅक्यून सरस ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या जोव्हॅन व्हान व्हूरेनने (8.06 मीटर्स) कांस्यपदकाची कमाई केली. या इव्हेंटमध्ये मोहम्मद अनिस याहियाने 7.97 मीटर्सची सर्वोत्तम झेप नोंदवली.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून प्रशंसा

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱया सुधीरचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. पॅरा-पॉवरलिफ्ंिटगमध्ये सुवर्ण जिंकणाऱया सुधीरचे खास अभिनंदन. भविष्यातील वाटचालीबद्दलही शुभेच्छा, असे ट्वीट राष्ट्रपती मुर्मू यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधीरला समर्पित भावनेने घेतलेल्या मेहनतीचे फळ सुवर्णपदकाच्या रुपाने मिळाले असल्याचे नमूद केले. शिवाय, रौप्यजेत्या श्रीशंकरचे देखील अभिनंदन केले.

बजरंग पुनिया, दीपक पुनिया उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा स्टार मल्ल बजरंग पुनियाला 65 किलोग्रॅम वजनगटातील उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी अवघी दोन मिनिटे पुरेशी ठरली. त्याने सलामी लढतीत लोव्हे बिंघमला सहज चीत केले. विद्यमान विजेता असलेल्या बजरंगची पुढील लढत मॉरिशसच्या जीनविरुद्ध होईल.

बजरंगप्रमाणेच दीपक पुनियाने देखील पुरुषांच्या 86 किलोग्रॅम फ्री स्टाईल वजनगटात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याने न्यूझीलंडच्या मॅथ्यू ऑक्झेनहमविरुद्ध 10-0 फरकाने सहज विजय मिळवला. 3 मिनिटे 22 सेकंद चाललेल्या या लढतीत दीपकने जोरदार वर्चस्व गाजवले. याशिवाय साक्षी मलिक, अंशू मलिक यांनीही उपांत्य फेरी गाठत पदके निश्चित केली आहेत.

बात्रा-साथियन, शरथ-श्रीजाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

भारताच्या मनिका बात्रा व साथियन जी यांनी मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. याचवेळी अचंता शरथ कमल आणि अकुला श्रीजा यांनीही शेवटच्या आठमध्ये सहज स्थान मिळवले. बात्रा व साथियन यांनी नायजेरियन ओमातायो व ओजोमू यांचा 11-7, 11-6, 11-7 अशा फरकाने पराभव केला. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत या उभयतांची लढत मलेशियाच्या च्यूंग व कॅरेन लिन यांच्याविरुद्ध होईल. अन्य लढतीत शरथ व अकुला यांनी मलेशियाच्या लिओंद ची फँग व हो यिंग यांच्याविरुद्ध 5-11, 11-2, 11-6, 11-5 अशा फरकाने विजय मिळविला.

भाविना पटेल अंतिम फेरीत, आता सुवर्णपदकासाठी लढणार

भारताच्या भाविना पटेलने महिला एकेरी पॅरा टेटे स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून आता ती सुवर्णपदकासाठी आव्हान उभे करेल. टोकियो पॅरालिम्पिक्स रौप्यजेत्या भाविनाने इंग्लंडच्या स्यू बेलीला 11-6, 11-6, 11-6 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. गुजरातची ही पॅडलर आता शनिवारी होणाऱया फायनलमध्ये नायजेरियाच्या ख्रिस्तियाना इकपेओईविरुद्ध लढत देईल.

अन्य लढतीत सोनलबेन पटेलला इकपेओईविरुद्ध 11-8, 6-11, 4-11, 7-11 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. आता कांस्यपदकासाठी तिची प्ले ऑफ लढत बेलीविरुद्ध होणार आहे. पुरुषांच्या गटात राज अरविंदन अलागरला नायजेरियाच्या नसिरुविरुद्ध 11-7, 8-11, 4-11, 7-11 पराभव पत्करावा लागला. त्याची कांस्यपदकाची लढत नायजेरियाच्या इसाऊविरुद्ध होणार आहे.

सिंधू, श्रीकांत, सेन, कश्यप उपउपांत्यपूर्व फेरीत

पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन यांनी एकेरीतील उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. दोनवेळची ऑलिम्पिक पदकजेती सिंधूने मालदिवच्या फातिमा रझाकचे आव्हान 21-4, 21-11 तर श्रीकांतने युगांडाच्या डॅनिएलचे आव्हान 21-9, 21-9 अशा फरकाने संपुष्टात आणले.

आपल्यापेक्षा दुपटीने अधिक वय असलेल्या 45 वर्षीय व्हरनॉन स्मीडविरुद्ध खेळताना वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यजेत्या लक्ष्य सेनने 21-1, 21-6 असा एकतर्फी विजय मिळवला. आकर्षी कश्यपला मात्र महूर शहजादविरुद्ध पहिल्या गेममध्ये संघर्ष करावा लागला. मात्र दुसऱया गेममध्ये शहजादला दुखापत झाल्याने त्याने माघार घ्यावी लागली. त्यावेळी ती 1-8 अशी पिछाडीवर होती.

आता पुढील फेरीत सिंधूची लढत युगांडाच्या कोबुगबविरुद्ध, श्रीकांतची लढत लंकेच्या दुमिंदूविरुद्ध, सेनची लढत ऑस्ट्रेलियाच्या लिय यिंग झियांगविरुद्ध तर कश्यपची लढत सायप्रसच्या इव्हा कॅटिर्झीविरुद्ध होणार आहे. अश्विनी पोनप्पा व बी. सुमित रेड्डी यांचे मिश्र दुहेरीतील आव्हान मात्र संपुष्टात आले. त्यांना कॅलम हेमिंग-जेसिका यांच्याविरुद्ध 18-21, 16-21 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.

मुष्टियुद्धात सागर, टोकास यांचे पदक निश्चित

पदार्पणवीर सागर अहलावत, रोहित टोकास व जास्मिन लाम्बोरिया यांनी राष्ट्रकुल मुष्टियुद्धात उपांत्य फेरीत धडक मारत आणखी दोन पदके निश्चित केली. या दोघांच्या यशामुळे भारताची मुष्टियुद्धातील पदकसंख्या सातवर पोहोचली.

1 ऑगस्ट रोजी 29 व्या वर्षी पदार्पण करणाऱया रोहित टोकासने झेवियरचा 5-0 असा एकतर्फी फडशा पाडत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळवले. अहलावतने 91 किलोवरील गटात दमदार प्रदर्शन साकारले. जास्मिनने न्यूझीलंडच्या ट्रॉयविरुद्ध महिला लाईटवेट (60 किलो) गटात 4-1 फरकाने विजय मिळवला.

अमित पांघलने देखील आगेकूच केली असून त्याने स्कॉटलंडच्या लेनॉनचा धुव्वा उडवला. त्याची उपांत्य लढत टोकियो ऑलिम्पियन पॅट्रिक चिनेम्बाविरुद्ध होणार आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत निखत झरीन (50 किलोग्रॅम), नीतू गंगाहास (48 किलोग्रॅम), मोहम्मद हुसामुद्दिन (57 किलोग्रॅम) यांनीही तीन पदके निश्चित केली आहेत.

Related Stories

‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुलचे 61 धावात 7 बळी

Patil_p

डे-नाईट कसोटीला 27 हजार प्रेक्षकांना परवानगी

Patil_p

भारत-श्रीलंका यांच्यात आज पहिली वनडे

Patil_p

कर्नाटक, तामिळनाडूची अंतिम फेरीत धडक

Patil_p

युरोपियन चॅम्पियनशिप्स, स्विस ओपन स्पर्धा रद्द

Patil_p

भावी कर्णधारांमध्ये रंगणार आजची आयपीएल लढत

Patil_p
error: Content is protected !!