ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेगासस हेरगिरी प्रकरणावरून सुरू असलेला वाद काही थांबायचे नाव घेत नाही आहे. त्यातच आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.


याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी आपला फोन टॅप केला असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, ही केवळ माझ्या गोपनीयतेची गोष्ट नाही तर लोकांच्या आवाजावर हल्ला आहे. त्यामुळे याबाबत न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली आहे.
पुढे ते म्हणाले, पेगासस एक शस्त्र आहे. इस्त्रायली सरकार हे एक शस्त्र मानते. हे शस्त्र दहशतवादी आणि गुन्हेगारांवर वापरले जाते. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी हे शस्त्र भारतीय संस्था आणि लोकशाहीविरूद्ध वापरले आहे. या सॉफ्टवेअरमुळे हेरगिरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. तसेच या प्रकरणी अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, पेगासस स्पायवेअरचा वापर करत राहुल गांधी यांची जासुसी केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखित न्यायालयीन चौकशी व्हावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या खासदारांनी शुक्रवारी संसदेच्या आवारात निदर्शने केली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेसचे अनेक खासदार या वेळी उपस्थित होते.