Tarun Bharat

पेट्रोलची शंभरी केक वाटून साजरी!

दरवाढीविरोधात आपचे अनोखे आंदोलन

प्रतिनिधी / पणजी

पेट्रोल व डिझेलच्या बेसुमार वाढणाऱया किंमतीच्या विरोधात आम आदमी पक्षाने राजधानीत जोरदार निदर्शने केली व मोर्चा काढून दरवाढीचा निषेध नोंदविला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा पेहराव केलेल्या आंदोलकांनी पेट्रोल दरवाढीचे शतक साजरे करण्यासाठी पेट्रोल भरणाऱया वाहनमालकांना केक वाटप केले.

राज्यात सध्या पेट्रोलची किंमत 100 रुपये पर्यंत पोहोचली आहे. तर स्वयंपाक गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपये पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. म्हणुनच या दरवाढीचा निषेध करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे आप गोवाचे संयोजक राहूल म्हांबरे यांनी सांगितले.

गोव्यात भाजप सरकार एका बाजूने दारिद्य्ररेषेखालील लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे स्वतःच सांगत आहे तर दुसऱया बाजूने अशा दारिद्य्रात जगणाऱया लोकांवर महागाईचा मारा करून त्यांचे जगणे असह्य करत आहे, अशी टीका म्हांबरे यांनी केली. पूर्वी गोव्यात बीपीएलचे केवळ 30 हजार लोक होते, ती संख्या आता पाच लाखांवर पोहोचली असल्याचे भाजपनेच सांगितले आहे, असे ते म्हणाले.

अशा दारिद्य्रात पिचलेल्या लोकांच्या दुखःवर फुंकर घालण्यासाठी आम आदमी प्रयत्नरत आहे. म्हणुनच आम आदमीने दरमहा 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा ऐकून भाजप नेते पूर्णपणे हादरले आहेत.

2012 मध्ये भाजपने गोव्यात 60 रुपयांपेक्षा जास्त दराने पेट्रोल विकणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासनाला स्वतःच हरताळ फासत भाजपने आज पेट्रोलच्या किंमती शंभरीकडे नेऊन ठेवल्या आहेत. वास्तविक पेट्रोलचा दर केवळ 30 ते 40 रुपये प्रती लिटर एवढाच आहे. पण त्यावर 75 टक्के कर आकारला जातो. त्यामुळे पेट्रोल 100 रुपयांवर पोहोचले आहे, असे वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.

या दरवाढीचा निषेध म्हणून काढण्यात आलेल्या मोर्चात आपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पणजीतील जुने सचिवालय आणि मडगावात जुना बसस्थानक या भागात असलेल्या पेट्रोल पंपवर मोर्चा काढून ही निदर्शने करण्यात आली.

Related Stories

डोंगरमाथ्यावरील आग विझवण्यासाठी सरसावले सरपंच विनायक गावस

Amit Kulkarni

कंत्राट नकोच, कायमस्वरुपी नोकरी द्या !

Patil_p

आयाराम-गयाराम संस्कृतीस मूठमाती देणार

Omkar B

कुडचडे येथे आज रक्तदान शिबिर

Amit Kulkarni

रोबोटिक्स आणि कोडिंग अभ्यासक्रमवार मार्गदर्शन

Amit Kulkarni

काणकोणात निवडणुकीच्या दृष्टीने विरोधी गट सक्रिय

Amit Kulkarni