Tarun Bharat

पेडणेत मगोच्या वाढत्या प्रभावाने भाजपात अस्वस्थता

मगोच्या प्रचारात कार्यकर्त्यांचा उत्साह : दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप अशी स्थिती,पेडणेत राजन कोरगावकर तर मांद्रेत लक्ष्मीकांत पार्सेकर सक्रिय

प्रतिनिधी /पणजी

पेडणे तालुक्यातील दोन्ही मतदारसंघात मगो पक्षाला मिळू लागलेल्या उदंड प्रतिसादामुळे भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे. त्यातच दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप अशी स्थिती निर्माण झाल्याने प्रदेश भाजपा नेतेही अडचणीत आले आहेत.

कोरगावात मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजन कोरगावकर यांनाच भाजपची उमेदवारी द्यावी अशी मागणी करीत मगो पक्षातून आलेल्या उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना खुले आव्हान दिल्याने बाबू आजगावकर यांची डोकेदुखी वाढली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बाबू आजगावकर यांच्या अनेक समर्थकांनी राजन कोरगावकर यांचे समर्थन ते देखील खुल्या कार्यक्रमात केले असल्याने यावेळी पेडणे मतदारसंघात वेगळेच चित्र पाहावयाला मिळणार आहे.

पेडणेमध्ये मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी गेल्या आठवडय़ात आपल्या प्रचार कार्याला प्रारंभ केला असता मगोच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आर्लेकर यांच्या समर्थनार्थ मिरवणुकीत सहभाग दाखविला असल्याने पेडणे मतदारसंघात मगोच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या मतदारसंघात आजगावकर यांच्या विरुद्ध खुद्द भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱयांनी शड्डू ठोकल्याने आजगावकर यांचा प्रभाव या मतदारसंघात ओसरलेला आहे. भाजपच्या अनेक मूळ कार्यकर्ते व पदाधिकाऱयांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांविरोधात आपल्या कैफियती मांडल्या असून भाजपची उमेदवारी केवळ राजन कोरगावकर यांनाच द्यावी अन्यथा भाजपला पश्चात्तापाची पाळी येईल, असे कळविले आहे.

मोरजीत मगोला प्रतिसाद

दरम्यान, पेडणे तालुक्यातील मांद्रेमध्ये मगो कार्यकर्त्यांनी आपला ढोल बडविण्यास प्रारंभ केला आहे. मांद्रे हा एकेकाळी मगोचा बालेकिल्ला. गेल्या चारवेळा भाजप आणि एकदा काँग्रेस पक्षातर्फे 2017 मध्ये मुख्यमंत्र्यांचा पराभव करुन दयानंद सोपटे विजयी झाले होते. आता मांद्रे मतदारसंघात मगोचे जीत आरोलकर यांनी भाजपचे विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांच्यासमोर आतापासून एक आव्हान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. परवा मोरजीमध्ये त्यांनी मगो पक्षाच्या प्रचारास प्रारंभ केला तेव्हा निघालेली मिरवणूक व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाने भाजपला धडकी भरली आहे.

माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी उमेदवारीसाठी कसली कंबर

भाजपसाठी पेडणे तालुक्यातील समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी कंबर कसली आहे. त्यातून या देखील मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप हा संघर्ष वाढत जाण्याची शक्यता आहे. भाजपसमोर पेडणे तालुका जिंकणे हे दिवसेंदिवस आव्हान बनत आहे. त्यातच मगोने या दोन्ही मतदारसंघात भाजपपेक्षाही एक पाउल पुढे टाकले आहे. भाजपला मगोचे आव्हान आहे त्याही पेक्षा सर्वात गंभीर धोका भाजपला हा भाजपकडूनच निर्माण झाला आहे. दोन्ही मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली आहे आणि मगोने आपला जोर वाढविला आहे. यामुळे भाजपसमोर गंभीर पेच प्रसंग निर्माण झाला आहे.

Related Stories

सराफ स्वप्नील वाळके खून प्रकरणी जामीन नाकारला

Patil_p

हिंदू राष्ट्र स्थापण्यासाठी कृतीशील व्हा!

Amit Kulkarni

भाजपच्या कोणत्याच उमेदवाराला मतदान न करण्याचा टॅक्सी चालकांचा निर्णय

Patil_p

गोव्यात 2022 मध्ये काँग्रेसचे राज्य यावे ही गोमंतकीयांची इच्छा

Patil_p

चेन्नईन एफसीच्या ताफ्यात पोलंडचा लुकास गिकीविक्झ

Patil_p

इथॅन वाझचा पश्चिम आशियाई बुद्धिबळमध्ये सुवर्णपदकांचा डबल धमाका

Amit Kulkarni