प्रतिनिधी / गारगोटी
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदत वाढविण्यात आली आहे. अद्याप दहावीची मुळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 13 आँगस्ट अखेर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. 17 पहिली तर 23 आँगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर पॉलिटेक्निक आणि अभ्यासक्रम निवडण्यासाठी पसंतीक्रम भरण्याच्या फेरीला (कँप राऊँड) सुरवात होईल.
यंदा दहावीची परिक्षा कोरोनामुळे रद्द झाली. वार्षिक मुल्यमापनाव्दारे ऑनलाईन निकाल लागला आहे. केंद्रीय पध्दतीने पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यावर्षी 30 जुनपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची प्रकिया सुरु झाली. कोरोनामुळे गतवर्षापासून विद्यार्थ्याना कोणत्याही संस्थेत न जाता इंटरनेट असणाया मोबाईल, काँम्युटरवरुन अर्ज भरण्याची सोय तंत्रशिक्षण संचालनालयाने उपलब्ध केली आहे. महापूरामुळे विविध प्रकारचे दाखले अद्याप विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेले नाहीत यासह अन्य कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरता आलेले नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेऊन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ करण्यात आली आहे.
दहावी परीक्षा रद्द झाल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेशपुर्व परिक्षा (सीईटी) परिक्षा होणार आहे. मात्र, पाँलिटेक्निकसाठी दहावीच्या गुणावरच प्रवेश दिला जाणार असल्याचे येथील इन्सटियुट आँफ सिव्हील अँन्ड रुरल इंजिनिअरिंगचे (आयसीआरई) प्राचार्य जयंत घेवडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना 13 आँगस्ट अखेर http://poly21.dtemaharashtra.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे आहेत.
पहिल्या यादीवर 21 ऑगस्ट अखेर हरकत घेण्यासाठी मुदत आहे. आयसीआरईत सिव्हील अँन्ड रुरल इंजिनिअरिंग , काँम्युटर, इलेक्ट्राँनिक्स अँऩ्ड टेलिकम्युनिकेशन, मँकेनिकल, इलेक्ट्रीकल, सिव्हील हे अभ्यासक्रम आहेत. पक्की गुणवत्ता यादी लागल्यानंतर कँप राऊँडचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

