Tarun Bharat

पोयरेत शाळकरी मुलाची आत्महत्या

Advertisements

कारण अस्पष्टः काकांच्या मदतीला जात असे बागेत

प्रतिनिधी / मुणगे:

देवगड तालुक्यातील पोयरे गोंदापूरवाडी येथील गणपत विनोद सावंत (15) या शाळकरी मुलाने तेथीलच ‘कुबलाचे परडे’ या ठिकाणाच्या आंबा बागेमध्ये झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 वा. च्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. याबाबत देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, गणपत सावंत याचे काका प्रमोद विठ्ठल सावंत यांनी ‘कुबलाचे परडे’ याठिकाणी कलम बाग करारावर घेतली आहे. या बागेमध्ये माकडांचा उपद्रव वाढला होता. या बागेची राखण व इतर मदत करण्यासाठी गणपत हा प्रमोद सावंत यांच्यासोबत बागेमध्ये गेले तीन महिने जात होता. मंगळवारी दुपारी जेवण आटोपल्यानंतर गणपत हा नेहमीप्रमाणे प्रमोद काकांसोबत बागेत गेला. दरम्यान, काही वेळाने प्रमोद सावंत हे खुडी येथील आपल्या दुसऱया बागेमध्ये आंबे काढण्यासाठी गेले. तेथून ते सायंकाळी उशीरा पोयरे येथील घरी थेट परतले. यावेळी त्यांना गणपत हा घरी आला नसल्याचे समजले. त्यांनी तात्काळ गणपतच्या लहान बहिणीसोबत ‘कुबलाचे परडे’ येथील बाग गाठली. तेथे त्यांनी गणपतचा शोध घेतला. मात्र, बागेत हाका मारूनही त्याचा काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर, बागेत ज्याठिकाणी गणपत हा आपला वेळ घालवायचा, तेथे प्रमोद सावंत व गणपतच्या बहिणीने शोधाशोध करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना गणपत हा एका आंबा कलमाला गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला.

काकांसह बहिणीला मानसिक धक्का

अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे गणपतच्या काकांना व त्याच्या बहिणीला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यांनी तात्काळ झाडाचा फास सोडवून गणपतला जमिनीवर उतरविले. मात्र, गणपतचा मृत्यू झाला होता. प्रमोद सावंत यांनी या घटनेची माहिती पोलीस पाटील संतोष केसरकर यांना दिली. यानंतर सरपंच, पोलीस पाटील, स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, पोलीस पाटील केसरकर यांनी देवगड पोलीस स्थानकाला घटनेची माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण व हवालदार के. व्ही. कांबळी हे घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. बुधवारी सकाळी मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची फिर्याद प्रमोद सावंत यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. पश्चात आई, तीन बहिणी, आजी- आजोबा, काका असा मोठा परिवार आहे. गणपतच्या अकाली मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आईचा आक्रोश हृदय पिळवटणारा!

गणपत हा मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होता. तो अत्यंत मनमिळावू, हुशार, शांत स्वभावाचा होता. लहानपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे तो काकांसमवेत आजी- आजोबा, आई, तीन बहिणी यांच्यासोबत राहत होता. प्रमोद सावंत यांनीच या सर्वांची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, गणपतच्या अकाली मृत्यूमुळे सर्वांनाच मानसिक धक्का बसला. गणपतचा मृतदेह पाहून त्याच्या आईने केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.

Related Stories

शिमगोत्सवासाठी गावी आलेले दोघेजण बावनदीत बुडाले

Patil_p

पंधरा हजार वीज बिलांत केली सुधारणा

NIKHIL_N

संगमेश्वरमधे सापडला पहिला कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

जिल्हा रूग्णालयातील कोरानाग्रस्तांसाठी रोबोटची मदत

Patil_p

देवरूखात दागिन्यांसाठी महिलेचा निर्घृण खून

Patil_p

कणकवलीत वादावादीतून युवकावर चाकूहल्ला

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!