Tarun Bharat

पोलिसांची 24 तास ऑन डय़ुटी

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

कोरोनाच्या युद्धात सध्यस्थितीत सर्वात जास्त योगदान कोण देत असेल तर ते पोलीस. ना घर, ना कुटुंब अशा स्थितीत ते 24 तास अखंड डय़ूटी बजावत आहेत. सार्वजनिक ठिकाणी लोक एकत्र येणार नाही याच्यावर कडक पाळत ठेवून आपल्या कर्तव्यात कुठेही कसर होणार नाही, याची दक्षता घेत आहेत.

निरीक्षकापासून अधीक्षकापर्यंत सगळेच अधिकारी आणि कर्मचारी सकाळी विनाखंड डय़ूटी बजावत आहेत. कधी नव्हे तो संपूर्ण पोलीस फौजफाटा रस्त्यावर उतरला असून पोलीस खात्याच्या इतिहासात बहुदा असा प्रकार प्रथमच घडला असावा. पोलीस कर्मचारी केवळ काही तासांची विश्रांती घेऊन काम करीत असल्याने त्यांच्या कार्याची आता लोकही दखल घेताना दिसत आहेत. काही कर्मचाऱयांना तर प्रसंगी पाणी पिऊन वा अर्धपोटी किंवा उपाशी पोटीसुद्धा डय़ूटी करावी लागत आहे. कोरोना महामारीमुळे सध्या सर्वांच्याच जीवनाच्या वेळापत्रकाचा खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत आहे.

उच्चशिक्षित लोकच दाखवतात अशिक्षितपणा

कोरोना विरोधातील युद्ध हे केवळ पोलिसांचे नव्हे तर प्रत्येक व्यक्तीचे आहे, याची जाणीव अद्याप लोकांना झालेली नसल्याचे दिसून येत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अनेक उच्चशिक्षित आणि श्रीमंत लोकसुद्धा कोणतीही सुरक्षासाधने न वापरता खुलेआम रस्त्यावरून फिरताना दिसतात आहेत. गावागावातून सर्वसामान्य गरीब लोकांना कोरोना संकटाची जाणीव झाली आहे. गावातील लोक घरात बसून नियमांचे पालन करीत आहेत. परंतु शहरातील उच्चशिक्षित लोक मात्र चक्क अशिक्षितपणाचे दर्शन घडवित असून त्यांच्यावर कारवाई करावी लागते, याचे दुःख वाटते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांने सांगितले.

लॉकडाऊनचे काटेकोर पालन करा

आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जगात काय स्थिती आहे याची सखोल माहिती मिळू शकते. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन पुकारल्यानंतर खरे तर प्रत्येकाने स्वतः लॉकडाऊनचे काटेकोर पालन करायला हवे. मात्र येथेही सुशिक्षित आमि उच्च शिक्षित लोक सुद्धा अशिक्षितपणाच दाखवत आहेत. ही अशी माणसेच डय़ूटी बजावणाऱया पोलिसांशी हुज्जत घालणे, त्यांना अटकाव करणे असे प्रकार करत आहेत, याचा प्रत्ययही पोलिसांना येत आहे, असे सदर अधिकाऱयाने सांगितले.

पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम

शुक्रवारी असाच एक वरिष्ठ सरकारी अधिकारी आपल्या कुटुंबासह जीपमधून शहरात फिरत होता. पोलिसांनी त्याला अडविले आणि कुठे जात असल्याचे विचारले असता त्याने दिलेले उत्तर ऐकून पोलिसही अचंबित झाले, तो अधिकारी म्हणाला की, लॉकडाऊनमुळे सर्व रस्ते बंद आहेत. त्यामुळे कुटुंबासह फिरायला निघालोय. पोलिसांनी त्याला त्वरित माघारी पाठविले. त्यावेळी त्याने आवाज वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे सदर अधिकाऱयाला परत जाणे भाग पाडले. उच्चशिक्षितांचे असे अनेक किस्से सदर अधिकाऱयाने सांगितले.

लोकांचे सहकार्य नितांत गरजेचे

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकार आपल्या परीने काम करीत आहे. त्याला लोकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. जीवनावश्यक गोष्टी प्रत्येकाला पाहिजे यात शंकाच नाही. सरकार त्याच्यावरही उपाययोजना करीत आहे. परंतु लोक संयम पाळत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत. एखादे दुकान उघडले की लगेच तेथे ग्राहकांची झुंबड उडते. त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागते. जीवनावश्यक वस्तू लोकांना मिळवून देणे यासाठी पोलिसही काम करीत आहेत, तसेच अनेक संस्थाही काम करीत आहेत. त्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे नितांत गरजेचे आहे, असे आवाहन सदर पोलीस अधिकाऱयाने केले आहे.

Related Stories

ममता बॅनर्जी 28 रोजी गोव्यात

Amit Kulkarni

कोपार्डे येथे वीज ट्रान्सफॉर्मर जळून लाखोंचे नुकसान

Omkar B

यंदा निवडणुकीत ‘व्होट फ्रॉम होम’!

Patil_p

भाजपात जाण्याचा अद्याप तरी विचार नाही : गावडे

Amit Kulkarni

दाभाळ येथील सभेत भूमिपुत्र विधेयकाला समर्थन

Amit Kulkarni

देशाबाहेर न जाण्याचा आदेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!