Tarun Bharat

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनीच मागितला जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रवासाचा परवाना

शेतकऱ्यांना चिकुर्डे – कोडोली चेकपोष्टवर रोज होतोय त्रास

वारणानगर / प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी सुरू असलेल्या लॉकडॉऊन मधून केंद्रासह राज्य शासनाने प्रारंभा पासून शेतीसह,शेती पूरक उद्योगांना मोकळीक दिली असलीतरी सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या वारणा नदीच्या दोन्ही तिरावरील गावातील नदीच्या जवळपास असणारी अली – पलीकडील शेती करण्यासाठी चिकुर्डे – कोडोली असा संयुक्त चेकपोष्ट वरील पोलीस शेतकऱ्यांनाच त्रास देत आहेत या त्रासाला कंटाळूनच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे प्रवासाच्या पासची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

वारणा नदी काठच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना दिलेल्या निवेदनात सर्व शेतकरी मुळचे चिकुर्डे ता. वाळवा गावचे रहिवासी असून सध्या मुलांच्या शिक्षणाच्या व नोकरीच्या निमित्ताने अमृतनगर वारणानगर ता. पन्हाळा येथे स्थायिक झालो आहोत. आमची वडिलोपार्जित जमीन नदीच्या पलीकडे चिकुर्डे शिवारात आहे. आम्हा शेतकऱ्यांची सर्वच जमीन बागायती असून ऊस हळद भाजीपाला कलिंगड कोबी अशी पिके आम्ही नियमितपणे घेत आहोत. याशिवाय आमच्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांची दुभती जनावरे आहेत. आम्ही सर्वजण ये – जा करून आमची शेती करत आहोत. शेतावर पिकांना पाणी देणे, ठिबक संच चालविणे, उन्हाळी पिकांची काढणी, वाळवण, साठवण ही कामे तर चालू आहेतच याशिवाय जनावरांची वैरण धारपाणी दुध काढणे डेअरीत घालणे ही दैनंदिन कामे करावीच लागतात. पावसाळा हंगाम जेमतेम एक महिन्यावर आला आहे. शेताच्या मशागतीची कामे गतीने आवरून पेरणीची तयारी करावी लागणार आहेत.

गेल्या पावसाळी हंगामात महापुराने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या महासंकटातून आम्ही अजूनही सावरलेलो नाही तेव्हढ्यात कोरोना रोगाने गाठले आहे. लॉक डाऊन चालू झाल्यापासून आम्हास शेतावर जाण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे आमच्या शेतीची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. जनावरे उपाशी पोटी आहेत. पिकविलेला भाजीपाला बाजारात जावू शकला नसल्याने मोठे नुकसान झाले आहे. आणि येणाऱ्या खरीप हंगामाची मशागतीची कामेही खोळंबली आहेत असे निवेदनात नमूद केले आहे. शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना ऑन लाईन पास काढण्याबद्दल सांगितले जातेय. पण शेतीच्या कामासाठी ऑन लाईन पास काढण्याची व्यवस्थाच त्या व्यवस्थेत नाही ही वस्तुस्थिती आहे. आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून आम्हास आमच्या शेतावरील दैनंदिन कामावर जाण्यासाठी परवानगी पास द्यावा अशी विनंती करून आम्हास परवानगी पास मिळाल्यास आम्ही त्याचा फक्त आमच्या शेती कामासाठीच वापर करू आणि कोरोना प्रसार प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करू याची आम्ही आपणास हमी देखील सह्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी निवेदनात दिली आहे.

शेतीसाठी परवान्याची गरज नाही : प्रशासनाचा दावा खोटा
केंद्र व राज्य शासन शेती सह शेती उद्योगाला परवान्याची गरज नाही असे वारंवार जाहीर करीत आहे त्यामुळे ऑनलाईन परवान्यासाठी असलेल्या पर्यायामध्ये शेती हा पर्याय येत नसल्याने शेतकऱ्यासाठी प्रवासी पास निघू शकत नाही जिल्ह्यात शेतकऱ्यांना अडथळा येत नसलातरी जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या
वारणा नदी तिरावरील दोन्ही गांवातील शेतकरी लॉकडाऊन सुरू झालेपासून भरडले जात आहेत याकडे प्रशासनाने तक्रारी करुन देखील दुर्लक्ष केले आहे त्यामुळे पोलीसांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण ? ही भरपाई शासन देणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यातून विचारला जात आसून शेती सह उद्योगाला परवान्याची गरज नाही हा प्रशासनाचा दावा खोटा ठरला आहे.

लोकप्रतिनिधीच्या सुचनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकप्रतिनिधीच्या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये खा. धैर्यशील माने यानी शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे ती थांबवण्याची सूचना मांडली होती तसेच वारणा काठच्या शेतकऱ्यानी पालकमंत्री ना. सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी यासह पोलीस अधिकारी यांना मोबाईलवर, प्रत्यक्ष भेटून विनंती केल्यावर शेती कामासाठी अडवणूक करणार नाही तसे घडल्यास कळवा असे आश्वासन दिले जायचे प्रत्यक्षात चेकपोस्टवर अडवणूक व अपमानास्पद वागणूक दिली जात आहे ही वस्तुस्थिती पहाण्यास व समजून घेण्यास अधिकाऱ्यानी तस्दी न घेता लोकप्रतिनिधीच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचे शेतकरी माजी प्रा.एस.के. पाटील यानी सांगीतले.

औषधाच्या गोळ्या पलिकडे दिल्यातर आम्ही गोळ्या घालू
वारणा नदीवरील कांदे – सावार्डे पुलावर चेकपोष्ट आहे त्या चेकपोष्टवर एक सरकारी कर्मचारी कांदे येथील नातेवाईक यांना औषधाच्या गोळ्या देण्यास गेले होते त्या गोळ्या नेण्यास नातेवाईक आले होते त्या औषधाच्या गोळ्या त्यांना पोहच केल्या तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालू अशी धमकी कोडोली पोलीसातील हावलदाराने दोन दिवसा पूर्वी दिली. चिकुर्डे चेकपोष्टवर आज देखील पलीकडील गांवातील मेडीकल स्टोअर्सने मागवलेली औषधे देवून दिली नाहीत.

तक्रारीचा महापूर : चौकशी होण्याची मागणी
शेती मशागतीसाठी नदीच्या अलीकडे पलीकडे वहाणे जाऊन द्यायची नाहीत, शेती मालाची तसेच मालवाहातूक वहाणे परवान्याची गरज नसताना देखील सोडायची नाहीत शेतकऱ्यांना ये – जा करून द्यायचे नाही याची चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी जनसुनावनी घेतलीतर तक्रारीचा महापूर येईल एवढा त्रास सिमेवर असणाऱ्या वारणा काठच्या शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.

Related Stories

योग्य प्रश्न विचारणे हेच इतिहासकारांसमोरील खरे आव्हान : प्रा. स्टीवर्ट गॉर्डन

Archana Banage

साताऱ्यात शनिवारी पाणी पुरवठा राहणार बंद राहणार

Archana Banage

सातारा जिल्ह्यातील 47 नागरिकांना डिस्चार्ज; आज सोडले घरी

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यातील लसीकरणाची वेळ वाढणार

Abhijeet Khandekar

गुहागर येथे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन

Archana Banage

सामर्थ्य सोशल फौंडेशन समाजोपयोगी कार्य करेल

Patil_p