Tarun Bharat

पोलिसांच्या सतर्कतने अपहरणाचा बेत उधळला

मुलीचे कारमधून अपहरण : तीन युवक पोलिसांच्या ताब्यात : वाहतूक शाखा पोलिसांची कामगिरी

प्रतिनिधी/ सातारा

शांत साताऱयात अचानक सकाळी 9.30 च्या दरम्यान पोलीस यंत्रणेची धावपळ सुरु झाली. शहरातील एका शाळेच्या परिसरातून काही युवकांनी स्वीफ्ट डिझायर कारमधून एका मुलीचे अपहरण केल्याचे समजल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणले. यामध्ये स्वतः एसपींनी लक्ष घातल्याने सातारा पोलीस अलर्ट झाले होते. सर्व शहरात अपहरणकर्त्यांची कार बाहेर जावू नये म्हणून नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे ही कार मोती चौकात अडवण्यात यश आल्यानंतर पळून जाणारे तीन युवक वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतल्यानंतर त्यांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळी 8.30 वाजता एका मुलीला तिच्या आईने शाळेत सोडल्यानंतर ती घरी गेली. त्यानंतर काही वेळाने त्या महिलेला तुमची मुलगी शाळेत हजर नसल्याचा फोन आला. ही चर्चा सुरु झाल्यावर शाळेच्या वॉचमनने शाळा प्रशासनाला एका कारमधून ही मुलगी गेल्याचे सांगितले. त्यावेळी ही अपहरणाची घटना समोर आल्याने मग शाळेसह त्या मुलीच्या कुटुंबियांचे धाबे दणाणले. त्यांनी तातडीने ही घटना कारच्या क्रमांकासह पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली.

नियंत्रण कक्षाने तातडीने शहरातील वाहतूक शाखेसह सर्व पोलीस यंत्रणेला संदेश पोहोचवत यंत्रणा अर्लट केली. दरम्यान, ही मुलगी प्रतिष्ठीत अधिकाऱयांची असल्याने स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख जातीने तपासकार्यात सहभागी झाल्याने सर्वच पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. 9.30 पासून सुरु झालेला खेळ कसा संपणार की अपकरणकर्ते दूरवर जाणार अशी चिंता शाळा प्रशासनासह तिच्या कुटुंबियांना लागली होती.

मात्र ही कार शहरातून खालच्या रस्त्याने मोती चौकाकडे जावू लागली होती. वाहतूक शाखेचे कर्मचारी विनायक मानवी यांच्या नजरेतून ही कार सुटली नाही. त्यांनी कारचा पाठलाग सुरु केला आणि शेवटी मोती चौकात या कारला दुचाकी आडवी मारुन ती थांबवण्यात मानवी यांना यश आले. त्यांनी तातडीने चालकाला उतरवून त्याच्या कानाखाली जाळ काढला. तोपर्यंत गाडीतील तीन युवक पळून जावू लागले होते. मात्र तेवढय़ात वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार त्याठिकाणी फौजफाटय़ासह पोहोचले आणि पळून जाणाऱया युवकांना त्यांनी ताब्यात घेतले. या सर्व प्रकारामुळे मोती चौक व राजवाडा परिसरात सकाळी थरार निर्माण झाला होता.

मोती चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी मानवी कारला अडवत असताना नागरिकही जमा झाले. नेमका काय प्रकार सुरु आहे कोणाला कळत नव्हते. पोलीस चालकाला का मारत आहे हा प्रश्न नागरिकांना पडला होता. मात्र मानवी नागरिकांना हा अपहरणाचा प्रकार असल्याचे सांगताच नागरिकदेखील त्यांना मदत करु लागले. तोपर्यंत संशयित युवकांची पळापळ, पोलिसांचा पाठलाग, त्यांना ताब्यात घेतल्यानंतर खुद्द एसपी सातपुतेंसह सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांची एंट्री यामुळे परिसरात गर्दी जमली होती. खरा प्रकार समोर येत गेल्यानंतर नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन झाले. 

रात्री उशिरापर्यंत शाहूपुरीत नोंद नव्हती

अपहरणाचा प्रकार सकाळी घडला व त्यानंतर ते अपहरणनाटय़ पोलिसांनी संपुष्टात आणल्यानंतर दिवसभर या प्रकाराची चर्चा शहरात सुरु होती. यासंदर्भात शाहूपुरी पोलीस ठाण्यात मात्र रात्री उशिरापर्यंत नोंद नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र पोलिसांनी संबंधित अपहरणकर्त्या युवकांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांची नावे रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही. वरिष्ठांकडून याबाबत माहिती न देण्याबाबत पोलिसांवर दबाव असल्याची कुजबुज सुरु होती. त्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे माध्यमांना मिळाली नाहीत.

Related Stories

मेडिकल कॉलेजला यशवंतरावांचे नाव द्या

Patil_p

फलटण सभापतींच्या घरातून चोरी

Patil_p

वाई तालुक्यात नव्याने 81 जण बाधित

Patil_p

रानडुक्कर शिकार प्रकरणी १६ जण वनविभागाच्या जाळ्यात

Archana Banage

पालिकेतील राजकारण थांबवून शहराकडे लक्ष द्या

Patil_p

कराडची मुख्य भाजी मंडई कधी सुरू होणार?

Patil_p