Tarun Bharat

पोलिसांसाठी तीन ‘कोव्हिड केअर सेंटर’

जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांचा पुढाकार : ओरोस, सावंतवाडी व कणकवलीची निवड

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वाधिक जोखीम पत्करणाऱया सिंधुदुर्ग पोलिसांसाठी आता जिल्हय़ाच्या राजधानीत म्हणजेच सिंधुदुर्गनगरीत 40 कॉट क्षमतेचे विशेष कोव्हिड केअर सेंटर उभारण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे. त्यानंतर सावंतवाडी व कणकवली येथेही पोलिसांसाठी अशा प्रकारची कोव्हिड केअर सेंटर्स उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी या कामी पुढाकार घेतला आहे.

जिल्हय़ाच्या सीमेपासून ते गावागावांत, शहरांमध्ये तसेच विविध हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी पोलिसांना 24 तास बंदोबस्तासाठी तैनात राहवे लागते. या कर्मचाऱयांचा नागरिकांशी सातत्याने संपर्क येत असतो. त्यामुळे जोखीमही तितकीच वाढते. आतापर्यंत जिल्हय़ात कुठल्याही पोलीस कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र आतापर्यंत हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. दिवसागणिक कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पोलिसांची जोखीम कित्येक पटीने वाढली आहे. राज्यात कोरोनामुळे काही पोलिसांचे बळी देखील गेले आहेत. त्यामुळे खाकीवर्दीतील या कोरोना वॉरियर्सच्या जीवाला काही बाधा पोहोचू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अनेक पाऊले उचलली आहेत. त्यातील पहिले पाऊल म्हणजे त्यांनी जिल्हय़ातल्या सर्व पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीची यंत्रणा उभी केली आहे. पुढचे पाऊल म्हणून आता जिल्हय़ात कुडाळ, सावंतवाडी व कणकवली या तीन तालुक्यात कोव्हिड केअर सेंटर्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या काही दिवसांत सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या अद्ययावत इमारतींमध्ये पहिले कोव्हिड केअर सेंटर उभे राहणार आहे. यामध्ये कोरोना सस्पेक्टेड व पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. हे सेंटर कुडाळ, मालवण व वेंगुर्ल्यातील पोलिसांसाठी असून, सावंतवाडी, बांदा व देडामार्ग येथील पोलिसांसाठी सावंतवाडी येथे, तर देवगड, वैभववाडी व कणकवली या तीन तालुक्यांसाठी कणकवली येथे अशी आणखी दोन सेंटर लवकरच उभी केली जाणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या निर्णयामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

गॅस डिलरशीपच्या बहाण्याने फसवणूक करणाऱयाला अटक

Patil_p

लॉकडाऊन 8 जुलैपर्यंतच, मुदतवाढ नाही – जिल्हाधिकारी

NIKHIL_N

कणकवली – कळसुली एसटीवर पुन्हा दगडफेक

Anuja Kudatarkar

अभिनेत्री प्रेमा किरण यांना जीवनगौरव तर भाषांतरकार सुनिता डागांना नारायण सुर्वे पुरस्कार

Archana Banage

दत्तक मुले घेण्यात चंद्रकांत सावंत यांचे राज्यात रेकॉर्ड

NIKHIL_N

कशेडी घाटात बसवर आदळून दुचाकीस्वार जागीच ठार

Patil_p