आयजीपी राघवेंद्र सुहास यांची उचलबांगडी : आणखी तीन अधिकाऱयांनाही हलविले : सोने चोरी प्रकरणाची चौकशी सुरूच


प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांची राज्य सरकारने तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. तसेच गोकाकच्या पोलीस उपअधीक्षकासह आणखी तीन पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या असून केवळ 24 तासांमध्ये पीएसआय ते आयजीपीपर्यंत अधिकाऱयांच्या बदल्या कोणत्या कारणासाठी करण्यात आल्या? याची चर्चा सुरू आहे.
एकीकडे पाच किलो सोने चोरी प्रकरणाची सीआयडीने चौकशी तीव्र केली असतानाच दुसरीकडे अधिकाऱयांच्या बदल्या झाल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरा गोकाकचे डीएसपी जावेद इनामदार यांची आयएसडी विभागात बदली करण्यात आली आहे. तर हुक्केरीचे यापूर्वीचे मंडल पोलीस निरीक्षक व सध्या बेळगाव येथील डीएसबी विभागात सेवा बजाविणारे गुरुराज कल्याणशेट्टी यांची बदली हुबळी पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली आहे.
यमकनमर्डीचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील यांची बदली हुबळी-धारवाड सीईएन विभागात करण्यात आली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी सीआयडीच्या अधिकाऱयांनी यमकनमर्डी पोलीस स्थानकातील पोलीस-अधिकाऱयांची जबानी घेतली. मंगळूरहून सांगलीला निघालेल्या कारमधील 4 किलो 900 ग्रॅम वजनाचे सोने चोरून त्याची विक्री करणारे खाकी वर्दीतील दरोडेखोर कोण? याची चौकशी सुरू असून गेले तीन दिवस बेळगाव परिसरात ठाण मांडून असलेले सीआयडीचे पथक शुक्रवारी बेंगळूरला रवाना झाले आहे.
शुक्रवारी दुपारी आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्यांची यादी जाहीर झाली असून त्यामध्ये बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास एच. जी. यांची बदली बेंगळूर येथील अंतर्गत सुरक्षा विभागात करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर गुलबर्ग्याचे पोलीस महानिरीक्षक एन. सतीशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तडकाफडकी बदल्यांमुळे पोलीस दलाला धक्काच बसला आहे.
तिलक पुजारी यांचीही सीआयडीने घेतली जबानी
सोने चोरी प्रकरणाची चौकशी कुठेपर्यंत जाऊन पोहोचणार? याचा सध्या तरी अंदाज नाही. मंगळूर येथील तिलक पुजारी यांचीही सीआयडीने जबानी घेतली असून त्यांच्या जबानीत धक्कादायक माहिती बाहेर पडली आहे. मात्र, सध्या चौकशी सुरू असल्यामुळे सीआयडीने या प्रकरणाची माहिती जाहीर केलेली नाही. पाच किलो सोन्याची चोरी कोणी केली? पोलीस दलाला बट्टा लावण्याचे काम कोणत्या अधिकाऱयाने केले? याची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गृहमंत्र्यांकडून प्रकरणाची गांभीर्याने दखल
गृहमंत्री बसवराज बोम्माई, राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून एकीकडे सोने चोरी व विक्री प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे अधिकाऱयांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. यावरून खरा चोर कोण? याची माहिती गृहखात्याला आहे, हे लक्षात येते. मात्र, सीआयडीचा चौकशी अहवाल बाहेर पडल्यानंतरच चोराचा चेहरा उघड होणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार नळिनकुमार कटिल यांच्याकडे या चोरी प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधितांशी चर्चा केली असून या प्रकरणाचे सत्य बाहेर आणा, अशी भूमिका घेऊन ठाम राहिल्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू आहे. एकीकडे सीआयडीचे पथक चौकशीत गुंतले असतानाच दुसरीकडे चोरी प्रकरणात अडकलेले काही अधिकारी व दलाल या प्रकरणावर पडदा कसा टाकता येईल? यासाठी धडपडताना दिसत आहेत. ज्या तिलक पुजारी यांच्यासंबंधीचे सोने चोरीला गेले आहे, ते मंगळूरचे आहेत. त्यांनीही या प्रकरणी ठाम भूमिका घेऊन तक्रार केल्यामुळे चोरांचे धाबे दणाणले आहेत.
सोन्याची विक्री करणारा किरण अधिकाऱयांचा दलाल
यमकनमर्डी पोलीस स्थानकासमोर उभ्या करण्यात आलेल्या कारची काच फोडून 4 किलो 900 ग्रॅम सोने चोरून त्याची विक्री हुबळीत करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. बडय़ा पोलीस अधिकाऱयांची दलाली करणाऱया व गुन्हेगारी प्रकरणात गुन्हेगार आणि पोलीस अधिकारी यांच्यात मांडवली करणाऱया हुबळी येथील किरण नामक युवकाने आपल्या परिचयातील सराफाकडे सोन्याची विक्री केल्याचे उघडकीस आले असून किरणच्या कारचालकानेही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका वठविली आहे. सीआयडी चौकशी सुरू झाल्यापासून कारचालक फरारी आहे. कारचालकाला ताब्यात घेतल्यास या संपूर्ण प्रकरणाची माहिती बाहेर पडणार आहे.