Tarun Bharat

पोलीस असल्याचे भासवून वृद्ध दाम्पत्याची लूट

विवाह कार्यक्रमाला जाताना गणेशपूरजवळ अडवून पळविले दागिने

प्रतिनिधी /बेळगाव

दुचाकीवरुन विवाह कार्यक्रमाला निघालेल्या जुने बेळगाव येथील एका वृद्ध दाम्पत्याची गणेशपूरजवळ लूट झाली आहे. पोलीस असल्याचे सांगून दोघा भामटय़ांनी पाच तोळय़ांचे दागिने पळविले आहेत. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

शारदा गणपती पाटील (वय 70), गणपती पाटील (वय 76, दोघेही रा. जुने बेळगाव) हे दाम्पत्य नातेवाईकांच्या विवाह कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दुचाकीवरुन बेळगुंदीला निघाले होते. सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास गणेशपूरजवळ मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा भामटय़ांनी त्यांना अडवून त्यांच्या जवळील सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे पाच तोळय़ाचे दागिने पळविले आहेत.

या परिसरात गांजासंदर्भात एफआयआर दाखल झाला आहे. आम्ही त्या प्रकरणाच्या तपासासाठी आलो असून आपण पोलीस आहोत. पुढे दागिने काढून घेण्यात येत आहेत. त्यामुळे दागिने सांभाळा, असा सल्ला देत भामटय़ांनी त्यांचा विश्वास संपादन केला. कन्नड व मराठी भाषेतून ते संभाषण करीत होते. थोडय़ाच वेळात भामटय़ांच्या बोलण्यावर दाम्पत्याचा विश्वास बसला. शारदा यांनी आपल्या अंगावरील दागिने काढले. त्यावेळी एका भामटय़ाने मावशी आम्ही ते बांधून देतो, घरी जाऊन उघडा, असे सांगत रुमालात दागिने बांधले. दागिने बांधलेला रुमाल दुचाकीच्या डिक्कीत ठेवून आता तुम्ही निघा, असा सल्ला देऊन भामटे तेथून निघाले.

थोडय़ावेळात दाम्पत्याने आपल्या दुचाकीची डिक्की खोलून रुमालाला बांधलेली गाठ सोडली. त्यावेळी त्याच्यात दागिने नव्हते. या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला. शारदा यांना तर रडू कोसळले. काय करावे, हे कळेनासे झाले. त्यांची आरडाओरड पाहून गर्दी जमली. कॅम्प पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

इराणी टोळी पुन्हा सक्रिय?

पोलीस किंवा सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून वृद्धांना लुटण्यात इराणी टोळीतील गुन्हेगार पटाईत आहेत. वेगवेगळय़ा राज्यात या टोळीतील गुन्हेगार सक्रिय आहेत. सोमवारी गणेशपूर येथे वृद्धांना लुटण्यामागेही इराणी गुन्हेगार सक्रिय असल्याचा संशय बळावला आहे. सर्व शक्मयता पडताळण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.

Related Stories

एपीएमसी बाजारात कांदा दरात घट

Omkar B

पत्रकार विकास अकादमीच्यावतीने आज पत्रकार दिन

Patil_p

विनय कुलकर्णी यांची अखेर सुटका

Patil_p

ज्ञानी व्यक्ती देवांसाठीसुद्धा वंदनीय ठरते!

Amit Kulkarni

दहावी पुरवणी परीक्षेचे मूल्यमापन पूर्ण

Omkar B

कोगनोळीनजीक दीड कोटीची रोकड जप्त

Omkar B
error: Content is protected !!