Tarun Bharat

पोलीस असल्याचे सांगून वृद्धाला लुटले

वैभवनगर येथील घटना : तीन तोळय़ाचे दागिने पळविले

प्रतिनिधी /बेळगाव

पोलीस असल्याचे सांगून सकाळी व्यायामासाठी निघालेल्या वृद्धाच्या अंगावरील तीन तोळय़ांचे दागिने पळविण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी वैभवनगर परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

वैभवनगर येथील जट्टय़ाप्पा गोरनाळ (वय 72) यांची लूट झाली आहे. त्यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून वृद्धाच्या अंगावरील दागिने पळविल्यानंतर दोघे भामटे एकाच मोटारसायकलवरून पसार झाले. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

जट्टय़ाप्पा हे हिंडाल्कोमधील निवृत्त सुपरवायझर आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून व्यायामासाठी ते हिंडाल्को गेस्टहाऊसला निघाले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका भामटय़ाने त्यांना गाठले. आपण क्राईम पोलीस आहोत. या परिसरात तस्करी सुरू आहे. तपासणीसाठी आलो आहोत, असे सांगितले.

मोटारसायकलवरून आलेला भामटा जट्टय़ाप्पा यांच्याशी बोलत होता. त्याचवेळी पायी चालत आणखी एक भामटा तेथे आला. क्राईम पोलीस असल्याचे सांगणाऱया भामटय़ाने त्यालाही दरडावले. अंगावरील दागिने उघडय़ावर दाखवू नका, माझ्याकडे द्या, मी तुम्हाला बांधून देतो, असे सांगितले. भामटय़ाने दोन अंगठय़ा काढून दिल्यानंतर त्याच्याच रुमालात बांधून त्याला ती गाठ दिली.

त्यानंतर भामटय़ाने जट्टय़ाप्पा यांच्याकडे दागिन्यांची मागणी केली. भामटय़ांवर विश्वास बसून त्यांनी आपल्या अंगावरील चेन व हातातील ब्रेसलेट काढून दिले. भामटय़ाने हे दागिने रुमालात बांधून दिले. त्यानंतर दोन्ही भामटे एकाच मोटारसायकलवरून निघून गेले. थोडय़ावेळात जट्टय़ाप्पा यांनी रुमालाची गाठ सोडली त्यावेळी रुमालात दागिने नव्हते. आपण फसलो गेलो हे लक्षात येताच त्यांनी एपीएमसी पोलिसांना माहिती दिली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

उचगावचे प्रवेशद्वार बनले खड्डय़ांचे आगार

Amit Kulkarni

हिंदूंच्या मंदिरांना हात लावाल तर याद राखा!

Amit Kulkarni

शिबिरांमुळे आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा

Amit Kulkarni

फौंड्री क्लस्टरमध्ये एकदिवसीय विकास कार्यक्रम

Omkar B

के. आर. शेट्टी, ऍडव्होकेट संघ विजयी

Amit Kulkarni

बाजारात खरेदीसाठी गर्दी

Patil_p